आंदोलकांचा धुडगूस-दगडफेक, पोलिसांचा लाठीमार! दिवसभरात काय घडलं?

जे. पी. नड्डा यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा, सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरूच

    20-Jul-2026
CJP Protest Delhi Violent
 
नवी दिल्ली : (CJP Protest Delhi Violent) दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रोखताना संसद मार्ग, शास्त्री भवन आणि आसपासच्या परिसरात पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक आणि हिंसाचारात ५० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून ७० पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विविध ठिकाणी घडलेल्या घटनांप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
सकाळपासूनच जंतर-मंतरवर हजारो आंदोलनकर्ते जमा झाले होते. दुपारच्या सुमारास 'संसद चलो'च्या घोषणांसह आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा वळविला. संसद परिसरात आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते.
 
आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा दावा पोलिसांनी केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला, तर काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला.
 
दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आंदोलनकर्त्यांना हिंसक कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पाठवू नये, असेही नागरिकांना सांगितले. संसद मार्ग परिसरातील आंदोलनकर्त्यांची गर्दी दाखविणारा ड्रोन व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, तो ड्रोन विनापरवानगी उडविण्यात आल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, डिजिटल पुरावे आणि ड्रोनशी संबंधित माहिती तपासली जात आहे. विविध ठिकाणी प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात येत असून, कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.(CJP Protest Delhi Violent)
 
दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या बैठकीनंतर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पत्रकारांना सांगितले की, शिष्टमंडळाने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या. पहिली, पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांची तातडीने सुटका करून त्यांना व्हिडिओ संदेशाद्वारे जनतेशी संवाद साधण्याची परवानगी द्यावी. दुसरी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावे किंवा त्यांचा राजीनामा स्वीकारावा. तिसरी, नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी.(CJP Protest Delhi Violent)
 
या बैठकीनंतर जे. पी. नड्डा यांनी समाजमाध्यमावरील आपल्या अधिकृत संदेशात सांगितले की, शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्या सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडल्या जातील आणि त्यावर चर्चा केली जाईल. तसेच आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारची भूमिका वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतरच स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. या आंदोलनादरम्यान जंतर-मंतरवरील मुख्य आंदोलनस्थळावरही मोठी कारवाई करण्यात आली. संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी आंदोलनाचे मुख्य व्यासपीठ हटवून ते रिकामे केले. आंदोलनकर्त्यांनी याला लोकशाही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला, तर पोलिसांनी ही कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.(CJP Protest Delhi Violent)
 
आंदोलनाचे नेते अभिजित दीपके यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरूच आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे उपोषण सध्या जंतर-मंतरवर नसून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात सुरू आहे. १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून हलविल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथूनच त्यांनी हस्तलिखित संदेशाद्वारे आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, आपण बेकायदेशीररीत्या ताब्यात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.(CJP Protest Delhi Violent)
 
या संपूर्ण घडामोडींचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरून हलविण्याच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. तसेच विद्यार्थी आंदोलन, नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर सरकारला लक्ष्य केले. या मुद्द्यांवर चर्चा घेण्याची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. संसद परिसर, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, शास्त्री भवन आणि केंद्रीय मंत्रालयांच्या परिसरात दिवसभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. अतिरिक्त निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. अनेक मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली, तर काही मेट्रो स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली. दिल्लीतील या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले असून, संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाचे पडसाद पुढील काही दिवसही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(CJP Protest Delhi Violent)
 
 




संबंधित मजकूर