‘आवड असली की सवड मिळते,’ ही मराठीतील म्हण. या म्हणीचा नेमका अर्थ म्हणजे अनेकांचे जीवन आहे. अनेकांनी फक्त आवडीला ध्यास करत, अतुलनीय यश संपादन केले. त्यामुळेच आजही कित्येकजण तुमची आवड जोपासा, असाच सल्ला तरुणांना देतात. आवड माणसाला कसे यश मिळवून देते, याचा मागोवा घेणारा हा लेख...
सागरासारखी अथांगता लाभलेले नाव प्राप्त केलेला एक युवक तरणतलावात पोहणे शिकून रोज घरी परतताना, त्याचे मन वाटेतील मैदानावरच्या जाळ्यात अडकते. तरणतलावातील पाण्यात पोहण्याचा आनंद लुटणारा तो युवक, बघता बघता अथांग सागर ओलांडून आपले व देशाचे नाव सगळ्यांच्या मुखी करतो. हिरवेगार गवत, लाल माती, हिरव्या मातीचे मैदान; त्या मैदानात दिसणारी ती मुलं, तेथे बांधलेल्या जाळीवरून एकमेकांकडे चेंडू टोलवतानाचे चित्र पाहून तो युवकही ठरवतो की, आपणही त्या मुलांचा खेळ शिकायचा. आपल्या पालकांकडे आपले तसे मनोगत तो व्यक्तही करतो. तसे म्हटले, तर शालेय अभ्यासाबरोबर त्याला खेळांचेही आकर्षण असतेच. त्यामुळेच पोहण्याव्यतिरिक्त टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांतच त्याला रुची अधिक असे. पण, शेवटी कोणतातरी एक खेळ निवडून त्यातच तो प्रावीण्य मिळवण्याचे तो ठरवतो. घरी जाताना थांबून टेनिसचा खेळ बघताना, तेथील प्रशिक्षक त्याला बघत असतात. ते त्या मुलाची ओढ बघून, त्याला तेथील मुलांमध्ये टेनिस खळण्यासाठी आत बोलावतात. त्यानंतर, तो मुलगा पालकांच्या संमतीने, टेनिस शिकण्यास सुरुवात करतो. व्यवसायाने अभियंता असलेले वडील विजय आणि आयुर्वेद चिकित्सक असलेली आई विजया; ही त्या युवकाची घरची पार्श्वभूमी. याचा तसा म्हटला, तर खेळाशी काहीच संबंध नाही. तरीही आपल्या मुलाची टेनिसची आवड बघून, पालक रोजच्या रस्त्यावरील टेनिस जिमखान्यात त्याला प्रवेश घेऊन देतात. अर्णव पापरकर हेच त्या युवा टेनिसपटूचे नाव.
पुढे तो छान टेनिस शिकतो. ते बघून ‘महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना’ आणि ‘महाटेनिस फाऊंडेशन’ यांचा अर्णवला पाठिंबाही मिळतो. त्याला ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत शासकीय मदत मिळते. तसेच त्याला ‘आर्यन पंप्स’कडूनही दीर्घकालीन कॉर्पोरेट प्रायोजकत्व मिळते. ‘हेमंत बेंद्रे टेनिस अकादमी’मध्ये प्रशिक्षक प्रोसनजीत पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तो प्रशिक्षण घेत आहे. अर्णव हा बघता बघता प्रथम देशांतर्गत स्पर्धेत, मग आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखवत, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत थेट प्रवेशासाठीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावतो. पात्रता फेरीतील सामने जिंकून तो प्रवेशही करतो. आणि त्यानंतर दि. ११ जुलै २०२६ रोजी, विम्बल्डनमध्ये खेळताना आपल्याला दिसतो.
सहा फुटांच्या आसपास उंचापुरा, ‘आयटीएफ ज्युनियर वर्ल्ड क्रमवारी’त १९व्या क्रमांकावर असलेल्या अर्णवने जपानच्या रयो ताबातावर ६-२, ६-१ असा विजय मिळवून, विम्बल्डन ज्युनियर पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा ३६ वर्षांतील पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. तत्पूर्वी, अर्णवने अमेरिकेच्या ज्युनियर वर्ल्ड क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या कीटन हॅन्सवर, ६-२, ६-३ असा विजय मिळवत सर्वांनाच चकित केले होते.
या १८ वर्षीय खेळाडूने, भारतीय टेनिसच्या इतिहासातील काही निवडक खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. यापूर्वी १९९० मध्ये लिएंडर पेसने अशी कामगिरी केली होती. २००८ मध्ये जन्मलेला अर्णव आपल्या प्रतिस्पर्धकांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्या नोंदी जपून ठेवण्यासाठी ओळखला जातो. अर्णवला पहिले मोठे यश २०२३ मध्ये, मेलबर्न येथील प्रतिष्ठित ’ऑस्ट्रेलियन ओपन अंडर-१४ एशिया-पॅसिफिक एलिट ट्रॉफी’मध्ये मिळाले. अर्णवने ‘आयटीएफ ज्युनियर सर्किट’मध्येही चमकदार कामगिरी करत, अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विदेशातील सामन्यात खेळायला विमानातून जाताना समुद्र ओलांडताना, बाहेरचे ढग कसे प्रवास करत आहेत हे अनुभवणार्या या युवकामुळे मला अजून नभप्रवासाची आठवण येते, ती बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या महाकवी कालिदास दिनाची. संस्कृत काव्यरचनाकार, नाटककार, कविकुलगुरू महाकवी कालिदास यांना वंदन करणारा ‘कालिदासो जने जने’ हा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘आषाढरंग’तील लेख आपण वाचला. त्या दिवशी सगळ्यांनाच आठवण येत होती, ती ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दांची!
खेळात सहभागी होण्यासाठी लंडनवारी करणार्या अर्णव या पुणेकराचे कौतुक झाल्यावर, कालिदासावर प्रेम करत मेघप्रवास करणार्या अजून एका पुणेकराचा विशेष उल्लेख, कालिदासांच्या साहित्यकृतीतील ‘क्रीडाविश्वा’चा आढावा घेऊन झाल्यावर करणार आहोत. ‘महाकवी कालिदास आणि खेळ-क्रीडाजगत्’ या विषयाचा थेट संबंध, कालिदासाच्या साहित्यात आलेल्या क्रीडावर्णनांशी आणि युद्धाच्या खेळांशी कसा जोडला जातो, ते बघताना मला काही प्रसंग जाणवतात. महाकवी कालिदासांच्या साहित्यात, धनुर्विद्या आणि रथारोहण अशा क्रीडाप्रकारांचा सुंदर उल्लेख आपल्याला आढळतो.
१) धनुर्विद्या आणि रथारोहण : कालिदासांच्या ‘रघुवंश’ आणि ‘कुमारसम्भवम्’ या महाकाव्यांमध्ये प्राचीन भारतीय युद्धकलेचा, विशेषतः धनुर्विद्या आणि अश्व-रथ शर्यतींचा (रथांच्या स्पर्धा) रोमांचक खेळ म्हणून उल्लेख येतो. प्राचीन काळात राजांसाठी हे युद्धकौशल्याचे खेळ, अत्यंत महत्त्वाचे मानले जात.
२) मल्लविद्या (कुस्ती) आणि शारीरिक खेळ : ‘रघुवंश’ या महाकाव्यात बलवान योद्धे आणि राजकुमार यांच्यातील शारीरिक कसरती, ताकदीचे खेळ आणि मल्लविद्येचे संदर्भ येतात. तत्कालीन समाजात शारीरिक बल आणि शौर्य यांना क्रीडास्वरूपही प्राप्त होते.
३) शिकार (क्रीडा म्हणून) : प्राचीन राजेशाहीत शिकार करणे, हा एक प्रमुख क्रीडाप्रकार भाग होता. कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ या जगप्रसिद्ध नाटकात, राजा दुष्यंत जंगलात शिकारीसाठी जातो; त्याचे अत्यंत सजीव वर्णन कालिदासाने केले आहे.
४) बुद्धिबळ आणि बैठे खेळ : कालिदासांच्या साहित्यात राजवाड्यात खेळल्या जाणार्या पटावरील खेळांचे संदर्भही सापडतात. प्राचीन काळी ‘चतुरंग’ (बुद्धिबळाचे मूळ रूप) आणि फासे (द्यूत) खेळले जात. त्याचा प्रभाव तत्कालीन दरबारी जीवनावर होता.
थोडक्यात सांगायचे, तर महाकवी कालिदासांच्या साहित्यात तत्कालीन युद्धकौशल्ये, धनुर्विद्या, शिकार, बुद्धीच्या आणि शारीरिक बल-पराक्रमाच्या खेळांना अधिक महत्त्व दिले गेले आहे. महाकवी कालिदासांच्या साहित्यकृती पाहून झाल्यावर, आपण त्यांच्या नभप्रवासाबद्दल शोधकार्य करणार्या अजून एका पुणेकराची माहिती करून घेऊ.
कालिदासांच्या ‘मेघदूता’च्या हवाईमार्गावरून १९९१ मध्ये, डॉ. सुरेश भावे यांनी प्रवास करून पाहिला. डिसेंबर २००१ मध्ये स्वर्गवासी झालेल्या डॉ. भावे यांनी, प्रभू श्रीरामाच्या आयोध्या ते लंका या पौराणिक यात्रेचाही हवाई प्रवास केला आहे. एवढेच नव्हे, तर सज्जनगडावरील सपाट पृष्ठभागाचा आकार, अखंड भारताच्या नकाशाप्रमाणे असल्याचंही विमानातून दिसल्याचे डॉ. भावे सांगतात.
नागपूरजवळील रामटेक गड (रामगिरी) हा, महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ या अजरामर महाकाव्याचे प्रेरणास्थान मानलं जातं. त्या गडावर काव्यजागर करुन, कालिदासांचे स्मरण केले जाते. तेव्हा आभाळात भिरभिरणार्या मेघाचेही दर्शन घेतले जाते. महाकवी कालिदासांनी आपल्या ‘मेघदूत’ या काव्यामध्ये, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे सुंदर वर्णन केले आहे. कालिदासाने ‘मेघदूता’त वर्णन केलेल्या नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे, डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून, छायाचित्रणही केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने नव्हती, तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल, असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविकच. कालिदासांच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून डॉ. भाव्यांनी, कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले.
या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या ‘कालिदास अकादमी’ने, डॉ. भाव्यांचा मोठाच सन्मान केला आहे. या सगळ्या अनुभवांचे थक्क करणारे वर्णन आणि भरपूर फोटो असलेले पुस्तक डॉ. भावे यांनी प्रसिद्ध केल्याचे या विषयावरचे अभ्यासक मकरंद करंदीकर सांगतात. त्यात डॉ. भावे कालिदासांबद्दल काय म्हणतात ते पाहू. "कालिदासा, मी तुझा मेघ, असे म्हणून तीच भरारी मी माझ्या विमानाने केली. तसेच जमिनीवरून प्रवास करून पडताळूनही पाहिली. त्या काव्यातील अलंकारशास्त्र तर चाखलेच, पण इतरांना जे उमजले नाही, ते त्याचे पर्यावरणज्ञान, पशुपक्षी यांचे बारकावे, शहरी आणि गावंढळ लोकांचे विशेषतः स्त्रियांचे रूप आणि वागणूक, दिशाशास्त्र, हवामानशास्त्र व त्यातील गणिते यांवरचे प्रभुत्व पाहून मी थक्क झालो. हा केवळ कवीच नाही, तर अस्सल पिंडाचा शास्त्रज्ञ आहे.”
अर्णवचा ध्यास, त्याची ती आवड त्याचे वरदान ठरते. अज्ञानी म्हणून हिणवला गेलेल्या कालिदासाने ज्ञानाच्या शोधात जे कठोर परिश्रम घेतले. तसेच डॉ. भाव्यांनी केलेला अवघड प्रवास, हे सगळे युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास व साधना आवश्यक आहे, हे आपण याच कथेतून शिकू शकतो का? हे पौराणिक व आजच्या काळातील विचार जो करतो, तो एक दिवस विम्बल्डन गाठण्यासारखे यश मिळवू शकणार नाही का? आम्हा क्रीडाप्रेमींच्या त्यासाठी कायमच शुभेच्छा असतीलच!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४