संस्कृती, संवेदना आणि संस्कारांचा अमूल्य वारसा आपल्या नृत्यशैलीतून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणार्या तमन्ना नायर यांच्याविषयी...
काळ बदलतो, माध्यमे बदलतात, लोकप्रियतेचे निकषही बदलतात; पण काही कला या क्षणिक प्रसिद्धीवर नव्हे, तर आयुष्यभराच्या साधनेवर उभ्या असतात. शास्त्रीय नृत्य त्यापैकीच एक. या परंपरेचे पावित्र्य जपत, आधुनिक काळाशी संवाद साधत, नव्या पिढीला संस्कारांची दिशा देत, हा वारसा पुढे नेणार्या कलाकारांमध्ये तमन्ना नायर (पूर्वाश्रमीच्या मुरडेश्वर) यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. सांस्कृतिक विश्वात त्या कुशल नृत्यांगना असण्याबरोबरच, एक समर्पित गुरू आणि भारतीय कलेच्या अभिजात परंपरेच्या सक्षम वाहकही आहेत.
तमन्ना यांच्या आयुष्यात नृत्य हा त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या आई पूनम मुरडेश्वर या स्वतः एक प्रख्यात नृत्यगुरू होत्या. नृत्याविषयीची त्यांची निष्ठा पराकोटीची की, गरोदरपणातही त्यांनी नृत्य सादरीकरण सुरूच ठेवले. त्यामुळेच नृत्याची तमन्ना यांच्याशी नाळ खर्या अर्थाने जोडली गेली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी ‘स्वरसाधना समिती’च्या मंचावर पहिले सादरीकरण केले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत, असामान्य प्रतिभेची चुणूक दाखवली. ठाण्यातील शिक्षण पूर्ण केल्यावर, त्यांनी ‘एसएनडीटी’ महाविद्यालयातून ‘होम सायन्स सायकोलॉजी’मध्ये पदवी संपादन केली. या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि शिकण्याच्या प्रक्रियेतील बारकावे समजून घेता आले. त्यामुळे त्या आज नृत्य शिकवण्याबरोबरच, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वालाही आकार देतात.
बालपणी तमन्ना यांच्यासाठी नृत्य म्हणजे गतीमान हालचाली, आकर्षक पदन्यास आणि रंगमंचावरील उत्साह होता. मात्र, वयाच्या ११व्या वर्षी आलेल्या एका अनुभवाने, त्यांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आधारित एका नृत्यनाट्यात, त्यांच्या आईने लेकराला गमावलेल्या मातेची भूमिका साकारली होती. त्यावेळी सुरु असलेले ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गीत आणि आईच्या चेहर्यावरील वेदना व कारुण्य पाहून, तमन्ना भावविवश झाल्या. त्या इतक्या रडल्या की, सराव काही काळ थांबवावा लागला. त्या एका क्षणाने नृत्य म्हणजे मन, भावना आणि आत्म्याची अभिव्यक्ती असते, हे त्यांना उमगले. यानंतर त्यांनी भरतनाट्यम् आणि कथक या दोन्ही शास्त्रीय नृत्यशैलींचा, सखोल अभ्यास केला. तथापि, संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला शिस्त, सौंदर्य, अध्यात्म आणि अभिव्यक्तीची परिपूर्ण दिशा देणार्या भरतनाट्यम्ने, त्यांच्या मनावर कायमचीच मोहिनी घातली.
त्यांच्या सातत्यपूर्ण साधनेचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी झाला. ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’,पोलीस प्रशासनाचा ’व्यसनमुक्ती अभियान विशेष सन्मान’ आणि भुवनेश्वर येथील प्रतिष्ठित जयदेव समारोहातील ‘नृत्य चारुशिला’ हा मानाचा पुरस्कार त्यांच्या कलेची साक्ष देतात. मात्र त्यांच्या मते, कोणताही पुरस्कार हा पुढील प्रवासाची जबाबदारी अधिक वाढवणारा असतो.
आज त्या वाशीतील गांधर्व महाविद्यालयात, शेकडो विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचे धडे देत आहेत. आईचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्पणाने स्वीकारली. या प्रवासात त्यांच्या वडिलांचा खंबीर पाठिंबा त्यांच्यासाठी प्रेरणेचा आधारस्तंभच ठरला. मात्र, आजच्या डिजिटल युगात शास्त्रीय नृत्य शिकवणे आव्हानात्मक असल्याचे त्या सांगतात. समाज माध्यमांवरील ‘रील्स’, झटपट प्रसिद्धी आणि क्षणिक लोकप्रियतेच्या मोहात, अनेक पालक मुलांकडून त्यांच्या वयाला न शोभणार्या गाण्यांवर सादरीकरणे करून घेतात. यामुळे कलेचे सौंदर्य, तिची शिस्त आणि सांस्कृतिक मूल्ये बाधित होत असल्याची खंतही त्या व्यक्त करतात.
तमन्ना यांच्या मते, शास्त्रीय नृत्य हा भक्ती, साधना आणि आत्मशोधाचा मार्ग आहे. या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रतिभेपेक्षा संयम, सातत्य आणि गुरूवरील विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. पालकांनीही आपल्या मुलांना वेळ द्यावा, त्यांच्या प्रवासावर विश्वास ठेवावा आणि तत्कालिक प्रसिद्धीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावे, असाच त्यांचा आग्रह असतो. काळानुसार अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार त्या करतात; परंतु शास्त्रीय नृत्याचे व्याकरण, तंत्र आणि मूल्ये यांच्याशी त्या कधीही तडजोड करत नाहीत. आधुनिकता स्वीकारताना परंपरेची मुळे अधिक घट्ट रुजली पाहिजेत, हीच त्यांची भूमिका आहे.
आज तमन्ना नायर यांचे स्वप्न हे स्वतः कलाकार म्हणून प्रसिद्ध होण्यापेक्षा संस्कारक्षम, संवेदनशील आणि शास्त्रीय कलेचा अभिमान बाळगणारी नवी पिढी घडवण्याचे आहे. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी म्हणजे, सांस्कृतिक दूत आहे. त्यांनी लावलेले हे छोटेसे रोपटे, उद्या एका विशाल वटवृक्षात रूपांतरित व्हावे आणि त्याच्या सावलीत भारतीय संस्कृतीची परंपरा अधिक समृद्ध व्हावी, हीच त्यांची मनापासूनची इच्छा आहे.
आईकडून मिळालेला वारसा, गुरूंचे संस्कार, अथक परिश्रम आणि पायातील घुंगरांच्या अखंड निनादाची सांगड घालत, तमन्ना नायर आज भारतीय शास्त्रीय नृत्याची सुवर्णपरंपरा अधिक तेजस्वी करत आहेत. त्यांच्या साधनेतून संस्कृतीचा दीप सतत प्रज्वलित ठेवणारी, एक प्रेरणादायी परंपरा पुढे चालत राहते. तमन्ना नायर यांना त्यांच्या पुढील कलासाधनेसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!