राजेशाहीतलं राजकारण

    20-Jul-2026   
 
 
Japan Imperial Family Reform
 
२१व्या शतकामध्ये लोकशाहीचं प्रारूप, जगभरातील अनेक देशांमध्ये प्रस्थापित झालं. मात्र, तिचा स्वीकार करताना कुठल्याही एका विशिष्ट पद्धतीला प्रमाण न मानता, अनेक राष्ट्रांनी आपला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारश्याचा विचार करूनच तिचे प्रारूप स्वीकारले. लोकशाहीची पुस्तकी व्याख्या आपल्याला करता येत असली, तरी तिचे समाजातील प्रकटीकरण हे त्या त्या देशातील समाजमनावरच अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जपानसारख्या देशात आज संसदीय लोकशाही आणि संविधानिक राजेशाहीचं मिश्रण असलेली शासनप्रणाली दिसते. या देशाने एकेकाळी रशिया आणि नंतर अमेरिका, अशा दोन्ही राष्ट्रांना सळो की पळो केल होतं. आज या देशात एक नवीन वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
 
जपानचे राजघराणे हे जगातील सर्वांत जुन्या राजघराण्यांपैकी एक. या राजघराण्याला जपानच्या संस्कृतीत अत्यंत आदराचे स्थान आहे. परंतु, सध्या हे राजघराणे एका मोठ्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राजघराण्यातील वारसा हक्काचे जुने आणि कठोर नियम. नुकतंच जपानमध्ये या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आणि एका नव्या विषयाला तोंड फुटले.
 
१९४७च्या ‘इम्पीरियल हाऊस लॉ’ या जपानी कायद्यानुसार, जपानच्या सम्राटाच्या गादीवर केवळ आणि केवळ पुरुषच बसू शकतो. म्हणजेच, राजघराण्यातील महिलांना सम्राज्ञी होण्याचा कोणताही अधिकार नाही. या नियमामुळे, जपानसमोर सध्या दोन मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यातील पहिली समस्या म्हणजे, जपानच्या राजघराण्यात सध्या पुरुषांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाली आहे. सध्याचे सम्राट नारुहितो यांना केवळ राजकुमारी ऐको हीच एक मुलगी आहे. त्यामुळे राजघराण्याचे अस्तित्व पुढे नेण्यासाठी, संपूर्ण कुटुंबात एकच तरुण पुरुष वारस शिल्लक आहे, तो म्हणजे सम्राटांचा १९ वर्षांचा पुतण्या प्रिन्स हिसाहितो. जर भविष्यात त्यांना मुलगा झाला नाही, तर जपानचे राजघराणेच समाप्त होण्याचा धोका आहे.
 
दुसरी समस्या म्हणजे, राजकुमारींवर होणारा अन्याय आणि सदस्यांची घटती संख्या. जुन्या नियमांनुसार, एखाद्या राजकुमारीने जर राजघराण्याबाहेरील सामान्य नागरिकाशी लग्न केल्यास, तिला तिचे राजकुमारी पद, राजघराण्याचे सदस्यत्व आणि सर्व मान-हक्क सोडावे लागतात. त्यामुळे लग्नानंतर ती एक सामान्य जपानी नागरिक होते. या जाचक नियमामुळे, अनेक राजकुमारींना लग्नानंतर राजघराणे सोडावे लागले आहे. परिणामी, राजघराण्यातील सदस्य संख्या घटली असून, विविध कार्यक्रमांमध्ये राजघराण्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठीही माणसे उरलेली नाहीत.
 
राजघराण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी, जपानी सरकारने नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल मंजूर केला. आता जर राजघराण्यातील राजकुमारीने सामान्य व्यक्तीशी लग्न केले, तरीही तिचे राजघराण्यातील सदस्यत्व रद्द होणार नाही. ती लग्नानंतरही ‘राजकुमारी’ म्हणूनच कायम राहील. तिच्या पतीला किंवा मुलांना राजघराण्याचे अधिकार मिळणार नाहीत; परंतु ती स्वतः राजघराण्याचा भाग असेल. यामुळे राजघराण्यातील महिलांची संख्या कमी होणार नाही आणि राजघराण्याचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालू राहील, अशी सरकारला आशा आहे.
 
या बदलामुळे जपानी सामान्य जनता आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कारण, सरकारने महिलांना राजघराण्यात राहण्याची परवानगी तर दिली, परंतु महिला जपानची सम्राट बनू शकत नाही, हा नियम बदलण्यास साफ नकार दिला. सध्याचे सम्राट नारुहितो यांची २४ वर्षांची कन्या राजकुमारी ऐको ही, जपानी जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. जपानमधील बहुतांश जनतेची इच्छा होती की, कायद्यात बदल करून राजकुमारी ऐकोला, पुढील सम्राज्ञी करण्याचा मार्ग मोकळा करावा. परंतु, सरकारने केवळ वरचे बदल करुन,पुरुषप्रधान नियम तसाच ठेवला.
 
जपानच्या राजघराण्यातील राजकुमारींचे सदस्यत्व लग्नानंतरही कायम ठेवून, जपानने परंपरा आणि राजघराण्याचे अस्तित्व टिकवण्याचा मध्यममार्ग निवडला. मात्र, महिला सम्राट बनू शकत नाही, हा नियम कायम ठेवल्यामुळे स्त्री-पुरुष समानतेचा जागतिक विचार आणि तिथली लोकभावना डावलल्याचे बोललं जात आहे. हा बदल राजघराण्याला तात्पुरता दिलासा देणारा ठरला असला, तरी भविष्यातील वारसा हक्काचा मूळ वाद पूर्णपणे संपवू शकलेला नाही.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर