मुंबई : (SIT Report) अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीबाबतचा तपास करणारे विशेष तपास पथक (एसआयटी) सोमवार, दि. २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला अंतरिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. तसेच तपास पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडे अतिरिक्त मुदतीची मागणीही करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नियुक्ती प्रक्रियेला सुद्धा वेग आला आहे.
राम मंदिर ट्रस्टने अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत शनिवार पर्यंत निश्चित करण्यात आली होती. अशी माहिती आहे की साधारण १९०० अर्ज प्राप्त झाले आहेत. सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या अर्जांची छाननी सुरू असून, प्राथमिक तपासणीनंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. त्याचबरोबर २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर होणाऱ्या एसआयटीच्या अंतरिम अहवालात आतापर्यंतच्या तपासाची प्रगती, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि निष्कर्षांचा तपशील दिला जाण्याची शक्यता आहे. याच अहवालाच्या आधारे ट्रस्टचे तत्कालीन अंतरिम महासचिव कृष्ण मोहन यांनी राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, असे मानले जाते. (SIT Report)
दि. १३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावली होती. तसेच एसआयटीला तपासाचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने २० जुलैपर्यंत हा अहवाल सादर करण्याची मुदत निश्चित केली होती. आता एसआयटीने अतिरिक्त मुदतीची मागणी केल्यामुळे २२ जुलै रोजी प्रस्तावित बैठक नियोजित वेळेत होणार की नाही, याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. (SIT Report)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक