साधेपणातून घडलेला संघकार्याचा महायज्ञ

    19-Jul-2026   
Rajabhau Kashelkar
 
स्वतःपेक्षा समाजाला प्राधान्य देत, आयुष्यभर संघकार्याचा ध्यास घेणाऱ्या अशा असंख्य स्वयंसेवकांनी संघकार्याची भक्कम पायाभरणी केली. कै. राजाभाऊ कशेळकर हे अशाच स्वयंसेवकांपैकी एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे संघाच्या 'इदं न मम' या जीवनमंत्राचे सजीव उदाहरण होते. त्यांच्या कार्याचा हा प्रेरणादायी जीवनपट.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे केवळ शाखेपुरते मर्यादित नसून ते स्वयंसेवकाच्या संपूर्ण जीवनात प्रकट होत असते. आपल्या आचार-विचारांतून, कुटुंबव्यवस्थेतून, समाजाशी असलेल्या व्यवहारातून आणि राष्ट्रकार्याच्या अखंड ध्यासातून हे कार्य जिवंत राहते. अशा जीवनमूल्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. राजाभाऊ कशेळकर. संघ स्वयंसेवकांसाठी राजाभाऊ हे एक वेगळेच रसायन होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रेम, आत्मीयता, शिस्त, कार्यकर्त्यांबद्दलची आपुलकी आणि संघकार्यासाठीची अखंड तळमळ यांचा सुंदर संगम होता. ते गृहस्थाश्रमी कार्यकर्ते होते; परंतु त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण संघकार्यासाठी वाहिलेला होता. त्यांचा व्यवहार इतका स्नेहपूर्ण आणि विश्वासार्ह होता की, त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक स्वयंसेवक त्यांच्याशी कायमचा जोडला जायचा.
 
मुंबईतील चिंचपोकळी येथील पानसरे चाळीत दोन छोट्या खोल्यांमध्ये त्यांना संसार उभा केला होता. जागा लहान असली तरी त्या घराचे दरवाजे स्वयंसेवक आणि प्रचारकांसाठी सदैव खुले असत. अनेक प्रचारकांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या घरी होत असे. घरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्वागत केले. राजाभाऊंच्या या कार्यात त्यांच्या सहचारिणींचे कशेळकर काकूंचे अमूल्य योगदान होते. त्यांनी संसार आणि संघकार्य यांचा अत्यंत समतोल साधला. प्रचारकांची सेवा, कार्यकर्त्यांचा पाहुणचार आणि घरातील जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी त्यांनी आनंदाने सांभाळल्या. त्यामुळे कशेळकर दाम्पत्याचे घर हे अनेक स्वयंसेवकांसाठी दुसरे घरच बनले होते.
 
पानसरे चाळीत राजाभाऊंचा मोठा मान होता. चाळीतील प्रत्येक घर आणि प्रत्येक सदस्य त्यांचा आदर करीत असे. त्यांच्या साधेपणामुळे, प्रामाणिक स्वभावामुळे आणि सर्वांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा न करता त्यांनी माणसे जोडली आणि आयुष्यभर ती जपली. राजाभाऊंची खरी ताकद म्हणजे कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते. राजाभाऊ दामले, बाबाजी देसाई, सावर्डेकर, नंदाजी शेडगे, संजीव परब यांसारखे अनेक स्वयंसेवक जणू त्यांचे मानसपुत्रच होते. त्यांनी केवळ कार्य करण्यास सांगितले नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होत त्याला घडवले. त्यांच्याकडे आलेला प्रत्येक स्वयंसेवक प्रेरणा, मार्गदर्शन आणि आत्मीयता घेऊनच परतत असे. त्यांच्या वागण्यात आणि कुटुंबातील वातावरणात संघाचे संस्कार स्पष्ट जाणवत. संघ ही केवळ संस्था नसून जीवनपद्धती आहे, हे त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले.
 
राजाभाऊंचा दिवस अत्यंत शिस्तबद्ध असे. सकाळी उठल्यानंतर रेडिओवर संगीत आणि बातम्या ऐकणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यानंतर आपली लुना घेऊन ते मुंबई महानगरात विविध भागांत संपर्कासाठी निघत असत. गृहसंपर्क हे त्यांचे अत्यंत आवडते कार्य होते. विविध स्वयंसेवकांच्या घरी जाणे, नवीन कुटुंबांशी ओळख करून घेणे, जुन्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणे, संघकार्याची माहिती देणे आणि समाजाशी सतत संवाद ठेवणे, हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य अंग बनले होते.
 
मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात प्रौढ साक्षरतेच्या अभियानात संघाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्या उपक्रमाची मुंबई महानगरातील जबाबदारी राजाभाऊंकडे सोपविण्यात आली. कामाठीपुरा सारख्या दाट वस्त्यांमध्ये तसेच इतर वंचित परिसरांत जाऊन त्यांनी प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू केले. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना अक्षरओळख करून देण्याचे कार्य त्यांनी अत्यंत समर्पितपणे केले. समाजपरिवर्तनासाठी शिक्षण किती आवश्यक आहे, याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
 
संघ शिक्षा वर्गाच्या व्यवस्था विभागात राजाभाऊंचे विशेष योगदान होते. वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुभवी, शिस्तप्रिय आणि समर्पित कार्यकर्त्यांची आवश्यकता असते, हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी अनेक सेवानिवृत्त स्वयंसेवकांना या कार्यात सहभागी करून घेतले. निवृत्तीनंतर समाजकार्यात सक्रिय राहण्याची प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे व्यवस्था विभाग अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनला.
 
निवृत्तीनंतर काही काळ ते मानसिकदृष्ट्या खचले असले, तरी त्यांनी समाजाशी असलेले नाते कधी तोडले नाही. चिंचपोकळीतील पानसरे चाळ सोडल्यानंतर ते दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळील अमृत भवन इमारतीत राहायला आले. नवीन परिसरातही त्यांनी शाखेत जाणे, स्वयंसेवकांशी संपर्क ठेवणे, परिसरातील नागरिकांशी संवाद साधणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे हे कार्य अखंड सुरू ठेवले. त्यांच्या आयुष्यातील शेवटपर्यंत संघकार्य त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू राहिले.
 
राजाभाऊंच्या जीवनातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे त्यांचा निस्पृह त्याग. पानसरे चाळ पुनर्विकासासाठी गेल्यानंतर त्यांना सुमारे ८५० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका मिळाली. ही मालमत्ता स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या उपयोगासाठी न राखता त्यांनी ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला दान केली. याशिवाय त्यांनी बँकांमधील स्वतःची बचतही विविध सामाजिक संस्थांना समर्पित केली. आयुष्यभर कमावलेले सर्व काही समाजाला अर्पण करण्याची ही भावना अत्यंत दुर्मीळ आहे. "इदं न मम" या संघसंस्काराचे त्यांनी आपल्या जीवनातून साक्षात दर्शन घडविले.
 
राजाभाऊ कशेळकर यांचे संपूर्ण जीवन हे संघकार्य, समाजसेवा, साधेपणा, आत्मीयता आणि त्याग यांचा सुंदर संगम होता. त्यांनी मोठमोठी पदे भूषविली नाहीत, प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही; पण हजारो कार्यकर्त्यांच्या मनात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले. त्यांच्या घरी राहिलेले प्रचारक, त्यांच्या सहवासात घडलेले स्वयंसेवक, त्यांनी उभारलेले संपर्कजाळे, प्रौढ साक्षरतेसारखे समाजोपयोगी उपक्रम, संघ शिक्षा वर्गासाठी घडविलेले कार्यकर्ते आणि शेवटी स्वतःची संपत्तीही समाजकार्यासाठी अर्पण करण्याची त्यांची वृत्ती—हे सर्व त्यांच्या जीवनाला असामान्य बनवते.
 
आजच्या स्वयंसेवकांसाठी राजाभाऊ कशेळकर यांचे जीवन हा एक मौन संदेश आहे की, संघकार्य हे केवळ कार्यक्रमांमध्ये नसते; ते आपल्या घरात, व्यवहारात, नात्यांत, समाजसेवेत आणि शेवटच्या श्वासापर्यंतच्या समर्पणात असते. कै. राजाभाऊ कशेळकर यांचे जीवन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ राहील. त्यांच्या कार्याची परंपरा आणि त्यागाची शिकवण संघकार्याला दिशा देत राहील.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर