इस्रायल दूतावासाने दि. २७ जून ते दि. ३ जुलै यादरम्यान विशेष अभ्यास दौर्यासाठी इस्रायलला निमंत्रित केले होते. माझ्यासोबत विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक असे देशभरातील आणखी १५ जणही सोबत होते. दौर्यामध्ये इस्रायलची ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, सामाजिक अभिसरण, सुरक्षा, राष्ट्रनिष्ठा, तसेच प्रगतीचा आलेख अभ्यासायची संधी मिळाली. जेरुसलेम, तेल अवीव, हैफा, नेफा आणि गाझापट्टीच्या परिसरालाही भेट देता आली. या दौर्याच्या तीन भागांच्या लेखमालेपैकी आजचा पहिला लेख हा साधारणतः इस्रायलचे सामाजिक भान चित्रित करणारा आहे. इस्रायलमधला ज्यू, मुस्लीम आणि ख्रिस्ती इतिहास, जगभराच्या ज्यूंचे सामाजिक अभिसरण, समरसता आणि सुरक्षा याविषयी पुढील भागांत...
नमस्ते...” अबुधाबीच्या विमानतळावर चेकिंग करणार्या त्या तरुणीने तपासणी करताना अभिवादन केले. ती भारतीय असणार असे वाटले आणि त्याक्षणी ती म्हणाली, ‘मैं नेपाल से हूं, आप इंडियन होंगे ऐसा लगा|’ आपले दिसणे, पोशाख यांमध्ये आपली काही सांस्कृतिक राष्ट्रीय ओळख असू शकते का? तर नक्कीच आहे, असे मला इस्रायलच्या दौर्यामध्ये सातत्याने जाणवत राहिले. इस्रायलवर दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या हल्ल्यामध्ये भारतीय ज्यूंसोबत ठामपणे उभे राहिले. त्यांनी अगदी इस्रायलचे समर्थन केले. अगदी आजही सोशल मीडियावर लाखो-करोडो भारतीय सातत्याने ‘हमास’विरोधात प्रकट होतात. तसेच दि. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर जसा हल्ला झाला, तसाच हल्ला पाकिस्तानी इस्लामिक दहशतवाद्यांनी भारतावर दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी केला होता, हे सगळे-सगळे त्यांना माहिती असल्याचे दिसले. त्यामुळे मला आणि माझ्यासोबतच्या इतर भारतीय सहकार्यांना इस्रायलमध्ये प्रेमाची आणि आदराची वागणूक मिळाली, हे नमूद करायलाच हवे.
तर, अबुधाबीहून तेल अवीवच्या ‘बेन गुरियन’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. सुरक्षा तपासणी किती कठोर; पण नम्रतेने केली जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे या विमानतळावर आमची झालेली ‘इमिग्रेशन’ प्रक्रिया! आमच्या सोबत इस्रायल दूतावासाचे लोक हजर होते. त्यामुळे आम्हाला ही प्रक्रिया सोपी गेली. तिथे चौकशी करणारा अधिकारी समोर कोणत्याही देशाचा नागरिक आला, तरी जुजबी इंग्रजीचा वापर करत ‘हिब्रू’ भाषेला प्राधान्य देत तपासणी करत होता. प्रत्येक कर्मचारी, अधिकारी त्यांच्या अधिकृत ‘हिब्रू’ भाषेतूनच बोलत होते.
दुपारचा १ वाजला होता म्हणजे, आपल्या भारतीय वेळेनुसार दुपारचे ४ वाजले होते. विमानतळातून बाहेर आलो आणि लख्ख ऊन पडलेली इस्रायलची भूमी दृष्टीस पडली. दि. २७ जून ते दि. ३ जुलैपर्यंत आम्ही कुठे जाणार आहोत, या प्रवासाची योजना आधीच नियोजित होती. दि. २७ तारखेला आम्ही तेल अवीवहून जेरुसलेमला रवाना झालो. आमच्यासाठी बस आणि गाईड तैनात होते. बस जेरुसलेमच्या दिशेने जात होती आणि वातावरणात एक अपरिचित अनोखी भावना भरून राहिली. कारण, आपल्या भारतात निसर्ग-समृद्धीची काही कमी नाही. पण, इस्रायलचा निसर्ग, झाडी-डोंगर हे वेगळ्या धाटणीचे. आमच्या सोबतचे गाईड त्या सर्व भागांची माहिती देत होते. ‘स्वप्नामधील गावा जावे’ तसे आजूबाजूचे इस्रायलचे डोंगर-दरी, वसाहती पार करत शेवटी आम्ही जेरुसलेमला पोहोचलो. एका निसर्गरम्य ठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. हे असे ठिकाण होते की, तिथून खाली पाहिल्यावर मुस्लिमांची प्रसिद्ध अल अक्सा मशीद, येशू ख्रिस्ताला जिथे क्रुसावर चढवले ते चर्च आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या आजूबाजूला ज्यूंच्या अब्राहमचा वारसा सांगणारे पवित्र स्थळही दिसत होते. थोडक्यात, जेरुसलेम शहराचे धार्मिक महात्म्य, ऐतिहासिक सत्य समोर होते. अर्थात, हे सगळे आमच्यापासून दूरच होते.
इथेच पहिल्यांदा इस्रायली जेवणाची आणि माझी भेट झाली. वेगवेगळ्या प्रकारचे पाव, फलाफल म्हणजे आपल्याकडील एकप्रकारची भजी, लिंबू सरबत, लेट्युसची पाने घालून अगदी बाऊलभर बनवलेले सॅलड (हे इकडच्या जेवणाचे वैशिष्ट्य); काळे, लाल, गुलाबी आणि हिरव्या रंगांचे छोटे-मोठे गोड टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑईल नावापुरते टाकून शिजवलेले भरिताच्या वांग्याचे केलेले काप. मसूरची खिचडी वाटावी असा पदार्थ; पण त्यात मध टाकलेले, चण्याची डाळ वाटून केलेला एक पदार्थ, या सगळ्यामध्ये भारतीय चवीला सखा वाटावा, असा एक पदार्थ मला वाटला; तो म्हणजे बटाट्याचे काप (फिंगर चिप्स). बाकी पिझ्झा, पास्ता यांना खास इस्रायली टच! भरपूर आंबट सॉस आणि अंडे टाकायचे. सॅलोमन मासा आणि चिकन यांचा सढळ हाताने वापर. चीज तर शेकडो प्रकारचे. खजूर आणि अंजिरचीही रेलचेल. मात्र, इथे एक नियम पाळतात- दुधासोबत मांसाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. मांसाहार केला असेल, तर काही तासांनी दुधाचे पदार्थ खाल्ले जातात. कारण, त्यांच्यात म्हणच आहे की, ‘आईच्या दुधासोबत तिच्या लेकराचे मास खाऊ नये.’ मुस्लिमांची जशी ‘हलाल’ पद्धत आहे, नेमके त्याविरोधात इथे ‘कोशर’ पद्धत आहे. ‘कोशर’ म्हणजे पशूंना हालहाल करून नाही, तर तीक्ष्ण हत्याराने एक मुख्य नस कापून मारले जाते. जेणेकरून त्यांना जास्त त्रास होऊ नये, तर अशा पद्धतीचे मांसच इथले लोक खातात. तसेही इस्रायली खाण्यापिण्याचे शौकीनच! इस्रायली जेवणाची खुर्ची-टेबलाची पंगत बघितली, तर मन आणि डोळे तृप्त होतील, इतके पदार्थ टेबलावर विराजमान. मांसाहारींसाठी इस्रायली पद्धतीचे जेवण पर्वणीच. मात्र, माझ्यासारख्या शाकाहारी आणि मद्यपान वर्ज्य असलेल्या व्यक्तीसाठी खाण्यापिण्याच्या बाबतीत मर्यादाच! या सगळ्या प्रवासात इटालियन, इस्रालयीन, अरेबिक आणि भारतीय उपाहारगृहात जेवायचा योग आला. यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी वेटर्स किंवा इतर कर्मचारी म्हणून काम करत होते, तेही अतिशय तन्मयतेने. एक-दोन ठिकाणी अशीही दृश्ये पाहिली की, त्या वेटर्स किंवा कर्मचार्यांचे वर्गमित्र-मैत्रीण तिथे खाद्यपदार्थांचा रसास्वाद घ्यायला आले. आपण उपाहारगृहात वेटर्सचे काम करतो आणि आपलेच मित्र-मैत्रीण तिथे आलेत, याची खंत किंवा लाज (जी वाटूच नये) या किशोरवयीन-तरुण मुला-मुलींना नव्हती. तसेच आपले मित्र-मैत्रीण वेटर्सचे काम करतात म्हणजे काहीतरी वेगळे आहे, असे तिथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येणार्या तरुण-तरुणींना वाटत नव्हते. कष्ट करण्याची कसली लाज, हा भाव इस्रायली तरुण-तरुणींमध्ये प्रकर्षाने जाणवला.
इथल्या समाजाची खानपान, वेशभूषा आणि केशभूषाही तितकीच आधुनिक. मात्र, मुली-महिला गुडघ्याच्या वरचा भाग किंवा पोट दिसेल, अशी वेशभूषा करत नाहीत. त्यामुळे गुडघ्यापर्यंतचे मिडी, वनपीस, पॅण्ट वगैरे पेहराव करणार्या मुली-महिला इथे दिसतात. बाबागाडीमधून लहान बालकांशी ‘हिब्रू’ भाषेत लाडेलाडे बोलणारी आई आणि तिचा दुसरा हात पकडून चालणारे तीन ते चार वर्षांचे बालक, तिच्यासोबत तिचा पती आणि त्याच्या कडेवरही एक बालक असे दृश्य तर सर्रास दिसत होते. असेच एक दृश्य सातत्याने दिसत होते; ते म्हणजे वृद्धापकाळामुळे चालता न येणार्या आईला किंवा बाबाला व्हिलचेअरवर बसवून गार्डन किंवा उपाहारगृहात आणणारे त्यांची मुले-मुली. इकडचे लोक अतिशय कुटुंबवत्सल. इथे प्रत्येक क्षेत्रात स्त्री काम करते, अगदी सैन्यातही ती अग्रेसर. मात्र, त्यांना किमान चार ते सहा मुले. जास्तीत-जास्त मुले जन्माला घालून ज्यूंची लोकसंख्या वाढवावी, हा संकल्प इस्रायली कुटुंबांचा दिसतो. कारण, अर्थातच इस्रायलच्या आजूबाजूच्या मुस्लीम शत्रुराष्ट्रांमध्ये जन्मदरावर नियंत्रण नाही. त्यामुळे धर्मासाठी, देशासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या स्वसंरक्षणासाठी लोकसंख्या वाढवणे त्यांना गरजेचे वाटते. तर, जेरुसलेमच्या या मुली-महिलांना पाहताना लक्षात आले की, काही महिला विशिष्ट पद्धतीने डोके झाकतात. पुरुषही डोक्यावरची टाळू झाकेल, अशी छोटी टोपी घालतात. आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ शक्ती वर आहे, याची जाणीव कायम राहावी, म्हणून ते ही टोपी घालतात.
या महिलांची पारंपरिकता पाहून वाटले की, जगभरात महिलांच्या पाळीसंदर्भात नियमावली आहेच आहे. इथे काय असेल, अशी विचारणा केल्यावर कळाले की, मासिक पाळीदरम्यान ‘निद्दाह’ नावाचे नियम महिलांसाठी आहेत. मासिक पाळी सुरू झाल्यापासून ते ती संपेपर्यंत पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा शारीरिक संबंध पूर्णपणे वर्ज्य. ज्यू नियमांनुसार, मासिक पाळीचे पाच दिवस आणि त्यानंतरचे सात पूर्णपणे स्वच्छ दिवस असे मिळून साधारण १२ ते १४ दिवस पती-पत्नीला दूर राहावे लागते. याकाळात ती दररोज स्नान आणि प्रार्थना करते. मात्र, त्यानंतर ती महिला ‘मिक्वाह’ नावाच्या एका विशेष धार्मिक पाण्याचा हौद किंवा पवित्र स्नानगृहात जाऊन पूर्णपणे डुबकी मारून स्नान करते. हे स्नान केल्यानंतरच ती पुन्हा ‘शुद्ध’ मानली जाते आणि पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध पूर्ववत सुरू होतात. आजही असे ‘मिक्वाह’ इथे आहेत. तिथे ‘मिक्वाह’ नाही, तिथे स्नानगृहातच प्रतीक मानून असे स्नान केले जाते. तसेच हाच नियम मूल जन्माला आल्यानंतरही लागू होतो. मुलगा झाल्यास काही आठवडे आणि मुलगी झाल्यास त्याहून अधिक काळ शारीरिक अंतर राखणे सक्तीचे असते. अर्थात, आता आधुनिक समाजात हे नियम शिथिल आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जेरुसलेममध्ये अनेक ठिकाणी आधुनिक पोशाख केलेल्या ज्यूंमध्ये मला काही लोक उंचच उंच गोल काळी टोपी घातलेले लोक दिसले. ते आणि त्यांच्या सोबतच्या किशोरवयीन मुलांची केशभूषाही वेगळी होती. प्रत्येकी दोन्ही कानांच्या बाजूच्या बटांची वेणी घालून त्यांनी ती खांद्यापर्यंत सोडली होती. पुरुषांनी दाढी वाढवलेली होती. इतरांपेक्षा हे लोक उठून दिसत होते. हे कोण आहेत? त्यावेळी कळले की, हे ‘अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू’ ज्यांना ‘हिब्रू’मध्ये ‘हरेदी’ म्हणतात. आधुनिकतेच्या लाटेमुळे आपला मूळ धर्म नष्ट होईल, अशी भीती पारंपरिक ज्यू विद्वानांना वाटली. हंगेरी आणि पूर्व युरोपमधील रब्बी मोशे सोफर यांनी एक प्रसिद्ध घोषणा केली. त्यानुसार, "तौरातनुसार जे काही नवीन आहे, ते वर्ज्य आहे.” येथूनच, ‘हरेदी’ (ज्याचा अर्थ, ‘देवाच्या शब्दापुढे थरथरणारे’ असा होतो) हा गट तयार झाला. धर्मशुद्धीसाठी त्यांनी आधुनिक जगापासून स्वतःला पूर्णपणे वेगळे केले. यांच्यातील पुरुष हे ‘तौरात’ आणि ‘तालमूद’ यांसारख्या ज्यू धर्मग्रंथांचे तंतोतंत पालन करतात. तसे तर सगळेच ज्यू ‘शाब्बाथ’चे पालन करतात. पण, ‘अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू’चे ‘शाब्बाथ’ म्हणजे औरच म्हणावे लागेल. शनिवारी ते सगळ्याच कामांपासून रजा घेतात. दर आठवड्याच्या ‘शाब्बाथ’ काळात ते २४ तासांत विजेचा, टीव्ही, संगणक किंवा मोबाईल फोन वापरत नाहीत. शनिवारचे जेवण गरम करण्यासाठी ते आधीच सेट केलेल्या विशेष ‘शाब्बाथ ओव्हन’ किंवा ‘ऑटोमॅटिक टायमर’चा वापर करतात. या दिवशी गाडी चालवणे किंवा वाहनातून प्रवास करणेही पूर्णपणे निषिद्ध. ‘शाब्बाथ’दरम्यान, कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री करत नाहीत. पैशांना स्पर्श करणे किंवा व्यवसायाची चर्चा करणेदेखील टाळले जाते. फोटोबिटो काढणे तर दूरच! याकाळात ३९ कामे वर्ज्य आहेत. ती कामे हे लोक ‘शाब्बाथ’च्या दिवशी टाळतात. मात्र, ज्यू कायद्यानुसार, मानवी जीव वाचवणे सर्वांत महत्त्वाचे. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणी किंवा जीवाला धोका असल्यास हे नियम शिथिल केले जातात.
‘अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू’ आणि ‘शाब्बाथ’ परंपरेचाही रंजक इतिहास. ज्यू धर्मग्रंथ ‘तौरात’मध्ये देवाने सहा दिवसांत सृष्टी निर्माण केली आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली, असे मानले जाते. त्यामुळे मनुष्यानेही सातव्या दिवशी (शाब्बाथ) कोणतेही काम करू नये, हा नियम ‘अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू’ पाळतात. तसेच इसवी सन पूर्व काळात जेरुसलेममध्ये ज्यूंचे पवित्र मंदिर होते. ते मंदिर बांधण्यासाठी जी ३९ मुख्य कामे केली जात असत, तीच कामे ईश्वराने ‘शाब्बाथ’च्या दिवशी वर्ज्य केली आहेत. ती कामे ‘शाब्बाथ’च्या दिवशी हे ‘अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू’ टाळतात; नव्हे पारंपरिक प्राचीन ज्यू धर्म शुद्धस्वरूपात जगता यावा म्हणून त्यांच्या-त्यांच्या स्वतंत्र वसाहतीसुद्धा आहेत. तिथे प्रवेश करणार्यांना त्यांचे नियम पाळावेच लागतात.
हं, विषयांतर झाले पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळू. काही हॉटेलमध्ये वेटर्स म्हणून किंवा दुकानांमध्ये कामाला म्हणून मुस्लीम महिलाही दिसल्या. त्यांनी अंगभर बुरखा घातला होता. मात्र, त्यांनी चेहरा झाकला नव्हता. मुस्लीम महिला ज्या ओळखू येत होत्या आणि मुस्लीम पुरुष जे ओळखू येत नव्हते, असे हे लोक काही ठिकाणी चतुर्थ श्रेणीमध्ये कामाला होते. पुढे कळले की, दि. ७ ऑक्टोबर रोजी जो हल्ला झाला, त्याआधी इस्रायलमध्ये चतुर्थ किंवा कष्टाची काम करण्यामध्ये, त्यातही घरात हरकाम्या नोकर किंवा बागकाम करण्यासाठी ८० टक्के लोक हे गाझा-राफा पट्टीतले मुस्लीमच होते. मात्र, दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी हल्ले केले. त्यानंतर या कर्मचार्यांची संख्या जेमतेम १० ते १२ टक्क्यांवर आली. याचे कारण काय असेल, तर ‘हमास’च्या दहशतवांद्याकडे कोणत्या घरात कुठे दरवाजा आहे, किती माणसे राहतात, मुली किती, त्यात तरुणी किती, याची इत्यंभूत बातमी होती. हे कसे काय? तर काही लोकांच्या मते, इस्रायलमध्ये ज्यूंच्या घरी काम करणारी किंवा तत्सम सेवा देणारे लोक हे गाझापट्टी किंवा तशाच परिसरातील लोक होते. त्यांना ज्यूंच्या घरांची आणि परिसराची पूर्ण माहिती होती. स्वेच्छेने किंवा ‘हमास’च्या दबावामुळे यातल्या अनेकांनी ते जिथे काम करत होते, त्या घराचे-परिसराचे नकाशे बनवले, संवेदनशील माहिती मिळवली आणि ती ‘हमास’ला दिली. (काही लोक अपवाद होते, ज्यांनी हे कृतघ्न कृत्य केले नाही). याचमुळे पूर्वी इस्रायलच्या संपन्न ज्यू वस्त्यांमध्ये तृतीय-चतुर्थ श्रेणीचे काम करणारे ७० ते ८० टक्के गाझा पॅलेस्टाईनचे मुस्लीम होते, ते आता केवळ १० ते १५ टक्के उरले आहेत. हे सगळे ऐकून, पाहून वाटले की, दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करून ‘हमास’ने काय साध्य केले? त्यांचे लोक इस्रायलच्या ज्यूंकडे पोटापाण्यासाठी कामाला येत असत. त्यांचे घर चालत असे. ज्यू त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, भविष्याची आणि इतर सोयही करत होते. पण, आता ‘हमास’मुळे गाझापट्टीतील मुस्लिमांवर शंका-संशयाची सुई आहे. कारण, दि. ७ ऑक्टोबरचा हल्ला आणि त्याचे परिणाम आजही इस्रायलच्याच नव्हे, तर जगभरातल्या प्रत्येक ज्यूंच्या काळजात रुतून बसले आहेत, ताज्या जखमेसारखे!
‘दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पिण्या’ची सवय ज्यूंना जन्मजात असावी. त्यामुळे आपल्याकडे जसे हल्ला झाल्यावर झाले-गेले विसरून जाऊ, सगळेच लोक काय दहशवादी असतात का? असे प्रश्न विचारून ‘गंगा-जमुना-तहजिब’ सहिष्णुतेच्या नावाने काहीपण करण्याची वृत्ती असते, ही इस्रायलच्या ज्यूंमध्ये दिसली नाही. आता तिथे अगदी छोट्यातल्या छोट्या अशा प्रत्येक कामासाठी ज्यू समाजातल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाते, असेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडचे प्लंबर, गवंडी, फ्रीज, एसी रिपेअरिंग करणारा, गॅरेजवाला, भंगारवाला, भाजीविक्रेते, मासे-मटण विके्रते ते नारळ पाणी आणि फळ विकणारे ते प्रत्येक नित्य काम करणारे, सेवा देणारे विक्रेते कोण आहेत, ते आठवले. आपल्या बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात सुरक्षेच्या नियमासाठी आपल्या माणसाला काम द्या, हा विचार किती महत्त्वाचा आहे, हे जाणवले. आणखीन एक ‘अरब’ म्हटले की, ‘मुस्लीम’ असे आपल्या इथे सार्वत्रिक मत. पण, इस्रायलमध्ये ‘अरबी ज्यू’, ‘अरबी ख्रिश्चन’ही पाहिले. कारण, ‘अरबी’ ही संस्कृती आहे; ‘धर्म’ नाही, असे वास्तव इथे दिसले आणि ‘अरबी ज्यू’ हे इस्रायलशी प्राणपणाने एकनिष्ठ आहेत. तूर्तास इतकेच वाटते की, इस्रायली ज्यूंचाही स्वतंत्र सामाजिक बंध आहे, वैभव आहे, इतिहास आहे आणि या इतिहासातून त्यांनी वर्तमान घडवले आहे.
९५९४९६९६३८