मुंबई : (Sonam Wangchuk) दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना जंतर-मंतर येथून हटवून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या ‘अनिश्चितकालीन’ उपोषणाला २० दिवस पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी आधी स्वतःला मारहाण झाल्याचा आरोप केला आणि त्यानंतर स्वतःही उपोषणावर बसल्याची घोषणा केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि आवश्यक असल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या डीसीपी यांच्या अधिकृत एक्स हँडलवर जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, “माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.”
त्यात पुढे असेही म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत असताना काही आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी संयम राखत संपूर्ण कारवाई सुरक्षितपणे पूर्ण केली. जंतर-मंतरवर उपस्थित आंदोलकांनी शांततेने तेथून निघून जावे, असे आम्ही आवाहन करतो. (Sonam Wangchuk)
सीजेपीने सोनम वांगचुक यांच्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर लगेचच कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या सदस्यांनी लोकांना भडकवण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यास सुरुवात केली. सीजेपीचे वादग्रस्त प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दावा केला की, पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ‘अटक’ केली आहे. एका व्हिडिओमध्ये रांका म्हणताना दिसले की, सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. जंतर-मंतरकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी आपला खरा चेहरा दाखवला आहे. आता गप्प बसण्याची वेळ नाही. यानंतर सीजेपीच्या अधिकृत एक्स हँडलवरूनही दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांचे ‘अपहरण’ केल्याचा दावा करण्यात आला. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या कथित उद्देशाने सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी आरोप केला की, सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ‘अज्ञात स्थळी’ नेले आहे. (Sonam Wangchuk)
सोनम वांगचूक यांच्याबाबत दिपकेचा अजब दावा
स्वतःला ताब्यात घेतल्याचा दावा करणारे अभिजीत दिपके यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, “सकाळी ७ वाजता मी फ्रेश होण्यासाठी बाहेर पडलो होतो. तेव्हाच पोलिसांचे गुंड तिथे आले. त्यांनी सोनम सरांना शिवीगाळ करत जबरदस्तीने ओढत नेले. त्यांना कुठे नेले याची आम्हाला अजिबात माहिती नाही. मला याची माहिती मिळाल्यानंतर मी माझ्या एका मित्राच्या घरातून जंतर-मंतरकडे जात होतो. तेव्हा पोलिसांनी माझ्याशीही मारहाण केली, मी परदेशातून माझ्या देशात परत आलो आहे, मी काही गुन्हेगार आहे का? हे पोलीन नव्हे; गुंड आहेत.” (Sonam Wangchuk)
सीजेपीची नवी मागणी; पंतप्रधानांचा राजीनामा
जंतर-मंतरवरील हे आंदोलन सुरुवातीला नीट पेपरफुटीच्या विरोधात सुरू झाले होते. मात्र नंतर त्याचे स्वरूप बदलत गेले आणि त्यात ‘माझे लिंग, माझी मर्जी’ यांसारख्या घोषणांसह इतर मागण्यांचाही समावेश झाला. सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नसून आता हा मुद्दा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत पोहोचला आहे. तसेच, पूर्वी भोजन करतानाचे फोटो समोर आलेले अभिजीत दिपके यांनी आता स्वतःही ‘अनिश्चितकालीन’ उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.
२० जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्याबाबत प्रश्नचिन्ह
सीजेपीने २० जुलै रोजी संसद भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा आपला पूर्वनियोजित कार्यक्रम कायम असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी जंतर - मंतरवर घडलेला प्रकार, त्यातून सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली दिशाभूल करणारी भूमिका यावरून मोर्चादरम्यान तणाव आणि अव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सीजेपीचा दावा आहे की, या मोर्चात सहभागी होण्यासाठी दीड लाखांहून अधिक विद्यार्थी आणि समर्थकांनी मिस्ड कॉल आणि ऑनलाइन मोहिमेद्वारे नोंदणी केली आहे.
दीपकेवर शाईफेक!
याप्रसंगी अभिजीत दिपकेवर एका महिलेने शाईफेक केल्याचे निदर्शनास आले. त्या महिलेने दिपकेवर शाई फेकत त्यास थप्पड मारण्याचाही प्रयत्न केला. जंतर-मंतर येथे घडलेल्या या प्रकारानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये संबंधित महिला अचानक दिपके याच्याजवळ येऊन त्यांच्यावर शाई फेकताना दिसते. हा संपूर्ण प्रकार दिपके आंदोलनस्थळी उपस्थित लोकांशी संवाद साधत असताना घडला. तेथे उपस्थित स्वयंसेवकांनी तत्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले. (Sonam Wangchuk)
सीजेपीच्या आंदोलनाला पाठींबा द्या; ₹५०,००० मिळवा
सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडिया जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी डिजिटल क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्सना आमंत्रित केले जात आहे. मोहिमेअंतर्गत एक रील आणि एक पोस्ट तयार करावी लागणार असून, यासाठी ५०,००० रुपये मानधन दिले जाईल. सर्व कंटेंट यशस्वीपणे प्रकाशित झाल्यानंतर हे मानधन तात्काळ अदा केले जाईल. मोहिमेची सविस्तर माहिती (कॅम्पेन ब्रीफ) आणि वेळापत्रक मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपला संपर्क तपशील शेअर करावा, असे आवाहन ईमेलद्वारे करण्यात आले आहे. (Sonam Wangchuk)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक