शर्यत अजून संपलेली नाही; कारण मी अजून जिंकलेलो नाही; अर्जेंटिनाचे हे जणू यंदाच्या वर्ल्डकपमधील ब्रिदवाक्य ठरलंय. सामना संपल्याची शेवटची शिट्टीवाजेपर्यंत गाफील राहू नका, हेच स्वित्झर्लंड आणि फ्रान्सचे स्पेनला सांगणे असेल. स्वित्झर्लंडविरुद्ध शेवटची ११ मिनिटे, तर इंग्लंडविरुद्ध शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना अर्जेंटिनाने बाजी पलटवत फायनलमध्ये धडक दिलीय. या दोन्ही अविश्वसनीय विजयात दोन लिओनेलचे योगदान मोठे आहे. एक मैदानातील सम्राट लिओनेल मेस्सी आणि दुसरा मैदानाबाहेरील शहनशाह- अर्जेंटिनाचा कोच लिओनेल स्कालोनी.
लिओनेल मेस्सी, ज्याच्या पायातून अजूनही जादू झरते अन् दुसरा लिओनेल स्कालोनी, जो मैदानाबाहेर उभा राहून प्रत्येक डाव शांतपणे विणतो. मेस्सी गोल करतो; पण स्कालोनी योग्यक्षणी योग्य चाल खेळतो. मेस्सी चाहत्यांच्या घोषणांमध्ये असतो; स्कालोनी मात्र, प्रतिस्पर्ध्याच्या मनात असतो.
रविवारी मध्यरात्री न्यूयॉर्कच्या मेटलाइफ स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनासमोर स्पेन उभा असेल. एका बाजूला फुटबॉलचा जिवंत दंतकथा लिओनेल मेस्सी; तर दुसर्या बाजूला उद्याचा सुपरस्टार लामिन यामाल. ही लढत केवळ दोन संघांची नाही; ती दोन पिढ्यांची, दोन फुटबॉल तत्त्वज्ञानांची आणि दोन वेगवेगळ्या प्रवासांची आहे.
२०२२च्या कतार विश्वचषकात अर्जेंटिनाने अनेक सामने वर्चस्व गाजवत जिंकले होते. यावेळी चित्र वेगळे आहे. स्कोअरकार्ड पाहिले तर अर्जेंटिना अजूनही अपराजित आणि १०० टक्के विजयी दिसतो. पण त्या प्रत्येक विजयामागे संघर्ष, संयम आणि शेवटच्या क्षणापर्यंत न हार मानण्याची वृत्ती दडलेली आहे.
’राऊंड ऑफ ३२’मध्ये केप व्हर्डेविरुद्ध अर्जेंटिनाला अपेक्षेपेक्षा अधिक घाम गाळावा लागला. इजिप्तविरुद्ध पिछाडीवरून पुनरागमन केले. स्वित्झर्लंडने अतिरिक्त वेळेपर्यंत रोखून धरले. इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतही सामना शेवटच्या क्षणापर्यंत हातातून निसटत असल्याचे चित्र होते. पण, प्रत्येकवेळी अर्जेंटिनाने जणू एकाच वेळी घड्याळाकडे, इतिहासाकडे पाहिले आणि शेवटच्या काही मिनिटांत सामना स्वतःच्या बाजूने फिरवला.
हे योगायोग नव्हते. स्कालोनीने या विश्वचषकात एक महत्त्वाचा धडा शिकवला. सुरुवातीची रणनिती जितकी महत्त्वाची असते, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो योग्यवेळी घेतलेला निर्णय. त्याचे बदल, खेळाडूंची अदलाबदल आणि सामन्याच्या लयीनुसार केलेले डावपेच इतके अचूक ठरले की, अनेक प्रतिस्पर्ध्यांना शेवटच्या १५ मिनिटांत अर्जेंटिनाचा वेग झेपलाच नाही.
मेस्सी अजूनही संघाचा आत्मा आहे. त्याचे पास, त्याची दृष्टी आणि निर्णायक क्षणी घेतलेले निर्णय अजूनही प्रतिस्पर्ध्यांसाठी कोडे आहेत. पण, यावेळी त्याच्यावर सर्व भार नाही. एन्झो फर्नांडेझ, लाउतारो मार्टिनेझ, अलेक्सिस मॅक अॅलिस्टर, ज्युलियन अल्वारेझ यांसारख्या खेळाडूंनी योग्यक्षणी पुढे येत अर्जेंटिनाला सामूहिक बळ दिले. म्हणूनच हा संघ फक्त ‘मेस्सीचा अर्जेंटिना‘ राहिलेला नाही; तो ‘स्कालोनीचा अर्जेंटिना‘ बनला आहे.
आता समोर स्पेन आहे. स्पेनचा खेळ हा संयम, चेंडूवरील नियंत्रण आणि अखंड पासिंगवर उभा आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्याला चेंडूच न देता सामने जिंकले. मात्र, अर्जेंटिनाने अनेकदा चेंडू कमी ठेवूनही योग्य क्षणी निर्णायक वार केला. त्यामुळे अंतिम सामना हा केवळ तांत्रिक लढा नाही; तो दोन विचारसरणींची परीक्षा आहे.
या सामन्यात मेस्सी विश्वचषक जिंकून आपल्या कारकिर्दीला आणखी एक सुवर्णपान जोडेल का? की यामालच्या रूपाने फुटबॉलला नवा सम्राट मिळेल? या प्रश्नांची उत्तरे रविवारी रात्री मिळतील. एक गोष्ट आजच निश्चित सांगता येईल; अर्जेंटिनाला हरवायचे असेल, तर फक्त मेस्सीला रोखून चालणार नाही. स्कालोनीलाही मात द्यावी लागेल.
कारण या विश्वचषकाने सिद्ध केले की, अर्जेंटिनाच्या जर्सीवर क्रमांक १० फक्त मैदानावर धावतो. पण, त्यामागचा खरा मेंदू साइडलाइनवर शांत उभा असतो. म्हणूनच! अंतिम शिट्टी वाजेपर्यंत अर्जेंटिनाला कधीही हरलेले समजू नका.