लॉ ऑफ सक्सेस

    18-Jul-2026   


FIFA World Cup Final

सततचा विजय हा पराभवाची बीजं स्वतःच पेरत असतो. हे वाक्य मी कोणत्याही प्रेरणादायी पुस्तकात वाचलेले नाही. ते मला सांगितले होते, भारताचे महान क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांनी.
 
सन २००१. स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ क्रिकेट जगतात अजेय बनला होता. सलग १५ कसोटी सामने जिंकून तो भारतात आला. मुंबईतील पहिली कसोटी जिंकत त्यांनी सलग १६ कसोटी विजयांचा जागतिक विक्रमही आपल्या नावावर केला.
 
त्या सामन्यानंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी मी वरळीतील समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या बापूंच्या घरी गेलो होतो. क्रिकेटच्या गप्पांमध्ये त्यांनी मला यशाचा एक अनोखा सिद्धांत समजावून सांगितला. सततच्या विजयामुळे तुमच्यातील कच्चे दुवे झाकले जातात. त्यामुळे तुमचा पराभव अटळ असतो. हाच ‘लॉ ऑफ सक्सेस!’
 
त्यावेळी मला ते तत्त्वज्ञान वाटले. पण पुढच्याच क्षणी बापूंनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली.
 
कोलकात्यात ऑस्ट्रेलिया हरणार.माझ्या चेहर्‍यावर आश्चर्य उमटले. कारण समोरचा संघ जणू दुसर्‍याच ग्रहावरून आलेला वाटत होता. त्यांना हरवण्याची कल्पनाही अशक्य वाटत होती. पण क्रिकेटची खरी गंमत अशीच असते आणि कदाचित आयुष्याचीही.
 
कोलकात्याच्या दुसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. भारताचा पहिला डाव अवघ्या १७१ धावांत संपला. सौरव गांगुलीच्या संघाला ‘फॉलो-ऑन’ मिळाला. सामना जवळपास ऑस्ट्रेलियाच्या खिशात गेला होता.
 
पण इतिहास नेहमी सरळ रेषेत लिहिला जात नाही.
 
व्ही. व्ही. एस. लक्ष्मणच्या २८१ आणि राहुल द्रविडच्या १८० धावांनी क्रिकेटमधील सर्वांत महान भागीदारींपैकी एक घडवली. हरभजन सिंहने हॅट्ट्रिकसह १३ बळी घेतले. आणि भारताने १७१ धावांनी अशक्यप्राय विजय मिळवत ऑस्ट्रेलियाच्या सलग १६ विजयांचा रथ रोखला. विशेष म्हणजे, फॉलो-ऑननंतर सामना जिंकणारा भारत इतिहासातील आजवरचा फक्त तिसरा संघ ठरला होता.
 
त्या दिवशी मला बापूंच्या ‘लॉ ऑफ सक्सेस’चा अर्थ उमगला.
 
यश हे अनेकदा वास्तवावर पडदा टाकते. सतत जिंकणारा संघ स्वतःला अपराजित समजू लागतो. चुका दिसेनाशा होतात. विरोधक त्याच्या ताकदीचीच चर्चा करतात; पण त्याच्या कमकुवत बाजू हळूहळू वाढत राहतात. आणि मग एका दिवशी एखादा जिद्दी प्रतिस्पर्धी त्या भेगा शोधतो. आणि अभेद्य वाटणारा किल्ला क्षणात कोसळतो.
 
न्यूयॉर्कमध्ये होणार्‍या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे पाहताना मला पुन्हा बापू नाडकर्णींची आठवण झाली.
 
एका बाजूला आहे, लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना.या विश्वचषकात अर्जेंटिनाने अनेक सामने संघर्षातून जिंकले. केप व्हर्डेविरुद्ध पिछाडीवरून पुनरागमन, इजिप्तविरुद्ध शेवटच्या क्षणी विजय, स्वित्झर्लंडविरुद्ध संयमाची परीक्षा आणि इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मिळवलेला विजय. हा संघ प्रत्येक वेळी संकटातून बाहेर पडला. प्रत्येक विजयाने त्याला आणखी नम्र केले. प्रत्येक अडचणीने त्याला अधिक मजबूत बनवले.
 
दुसर्‍या बाजूला आहे स्पेन. युरोपियन विजेता. स्पर्धेतील सर्वांत शिस्तबद्ध संघ. संपूर्ण स्पर्धेत जवळजवळ अभेद्य बचाव. प्रतिस्पर्ध्यांना श्वास घेऊ न देणारी रचना. चेंडूवर निर्विवाद नियंत्रण. आणि अंतिम सामन्यापूर्वी केवळ एकच गोल स्वीकारलेला.
 
निश्चितच, हा स्पेनचा सर्वांत मोठा गुण आहे.पण...याच ठिकाणी बापू नाडकर्णींचा ‘लॉ ऑफ सक्सेस’ आठवतो.
 
सतत यशस्वी ठरणारी व्यवस्था स्वतःच्या अपूर्णतेकडे अनेकदा दुर्लक्ष करते. अभेद्य वाटणार्‍या भिंतींमध्येही सूक्ष्म भेगा तयार होत असतात. प्रश्न एवढाच असतो की, त्या शोधणारा कलाकार समोर आहे का?
 
आणि समोर जर लिओनेल मेस्सी असेल...तर एका क्षणाची चूकही पुरेशी ठरू शकते. कारण मेस्सी हा केवळ गोल करणारा खेळाडू नाही. तो बचावफळीच्या मनात शंका निर्माण करणारा कलाकार आहे. त्याच्या एका स्पर्शाने, एका पासने, एका दिशाभूल करणार्‍या हालचालीने अनेक अभेद्य बचावफळ्या कोसळल्या आहेत.
 
कदाचित स्पेन जिंकेल.कदाचित अर्जेंटिना.
 
पण या अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागो, बापू नाडकर्णींचा ‘लॉ ऑफ सक्सेस’ पुन्हा एकदा कसोटीवर उतरणार आहे. कारण इतिहास आपल्याला एक गोष्ट वारंवार शिकवतो- अपराजित असणे आणि अजिंक्य असणे, यात खूप फरक असतो.
 
आणि कधीकधी...एका प्रतिभावान कलाकाराचा एक क्षण, अनेक वर्षांच्या अभेद्य भिंतीवर पहिली भेग पाडण्यासाठी पुरेसा ठरतो.




संबंधित मजकूर