बांगलादेशात श्री जगन्नाथ रथयात्रेचा भक्तिमय जल्लोष; ढाक्यात लाखो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

    18-Jul-2026   
Rath Yatra
 
मुंबई : (Rath Yatra) इस्कॉन बांगलादेशतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाला १६ जुलैपासून ढाक्यासह १२८ ठिकाणी प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलदेव आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्तींनी सुशोभित तीन भव्य रथांची मिरवणूक काढण्यात आली. २४ जुलैपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटनदिनी लाखो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
 
रथयात्रेदरम्यान भाविक "हरे कृष्ण महामंत्र"चा अखंड जप करत नृत्य-कीर्तनात सहभागी झाल्याचे दिसले. मृदुंग, करताल यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. लहान मुले, कीर्तन मंडळे, संगीतकार आणि विविध सांस्कृतिक पथके ट्रकवरून सहभाग घेत होती. "शोभायात्रा"चे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले होते. भाविकांनी भगवान जगन्नाथांचा प्रसाद ग्रहण करून त्यांचे दर्शन घेतले. भगवानाची कृपा लाभल्यास गोलोकधामाची प्राप्ती होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. पावसाने भिजलेल्या ढाक्याच्या रस्त्यांवरून निघालेली ही रथयात्रा भक्तिभाव आणि उत्साहाने भरलेली होती.(Rath Yatra)
 
या प्रसंगी माध्यमांशी बोलताना इस्कॉन बांगलादेशचे सरचिटणीस श्रीमत भक्तिमय निताई स्वामी म्हणाले की, रथयात्रेला स्वामीबाग येथून प्रारंभ झाला असून तिचा समारोप ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरात होणार आहे. या सोहळ्यात तब्बल पाच लाखांहून अधिक भाविक सहभागी झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पुरी (ओडिशा) येथील रथयात्रेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रथयात्रा म्हणून ढाका रथयात्रेचा उल्लेख करत त्यांनी या उत्सवाबद्दल आनंद व्यक्त केला.(Rath Yatra)
 
ते म्हणाले, बांगलादेशातील हा सर्वात मोठा धार्मिक उत्सव असून लाखो भाविक यात सहभागी होतात. आज सुमारे ५० लाख लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या सोहळ्याचे साक्षीदार होतील, असा माझा अंदाज आहे. स्वामीबाग ते ढाकेश्वरी या मार्गावरच एक लाखांहून अधिक भाविक स्वतः रथ ओढत आहेत. मार्गातील अनेक ठिकाणी लोक भगवंताचे दर्शन घेत असून प्रसाद स्वीकारत आहेत. पुरीची रथयात्रा जगातील सर्वात मोठी असली तरी ढाक्यातील हा उत्सवही प्रचंड गर्दीमुळे दुसऱ्या क्रमांकाचा असल्याचे मानले जाते. आम्ही भगवान जगन्नाथांना शहरातील प्रमुख व्यापारी मार्गांवरून घेऊन जात आहोत. भगवान जगन्नाथ हे संपूर्ण विश्वाचे भगवान आहेत आणि ते सर्वांचे आहेत.(Rath Yatra)
 
बांगलादेशमध्ये १६ ते २४ जुलैदरम्यान इस्कॉनतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव साजरा केला जात असून, ढाक्यासह देशभरातील १८८ ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे.(Rath Yatra)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर