दिल्लीतील जंतरमंतर हे लोकशाहीत आपल्या मागण्या मांडण्याचे आणि आंदोलन करण्याचे हक्काचे ठिकाण. परंतु, अलीकडेच तिथे सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाने या जागेला एक वेगळेच हिडीस रूप दिल्याचे दिसते आहे. विद्यार्थी हक्कांच्या आणि जनसामान्यांच्या नावाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात तथाकथित डाव्या विचारसरणीच्या लोकांची झालेली गर्दी आणि तिथे लागलेल्या घोषणा पाहिल्यावर, हे खरोखरच विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे की, भारत आणि हिंदूविरोधी शक्तींना एकत्र आणणारे मैदान, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. जेव्हा एखाद्या आंदोलनात देशाच्या अखंडतेला आव्हान देणारे घटक सक्रिय होतात, जेव्हा तिथे बहुसंख्य समाजाच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक केली जाते, तेव्हा ते आंदोलन विद्यार्थ्यांचे राहत नाही. ते बनते, एक सुनियोजित कारस्थान! शिक्षणाचा, रोजगाराचा किंवा विद्यार्थ्यांच्या भल्याचा या घोषणांशी काय संबंध? हा सरळसरळ भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ताण्याबाण्याला छेद देण्याचा प्रयत्न आहे. सामान्य विद्यार्थ्यांनी आणि देशातील जनतेने आता हा ढोंगीपणा ओळखण्याची गरज आहे.
स्वतःला जनसामान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे कैवारी म्हणवणारे काही चेहरे या आंदोलनाचे नेतृत्व करताना दिसले. कुणाल कामरा, निवेदिता मेनन, अरुंधती रॉय इ. अशा अनेकांनी मूळ प्रश्नांना बगल देऊन या आंदोलनाचा रोख पूर्णपणे राजकीय आणि एका विशिष्ट अजेंड्याकडे वळवताना स्पष्टपणे दिसले. डाव्यांनीच जणू या आंदोलनाचा ताबा घेतल्यासारखी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला देशविरोधी अजेंडा कसा रेटायचा, याचेच प्रात्यक्षिक जंतरमंतरवर पाहायला मिळाले.
प्रभू श्रीरामांचा अपमान असेल, हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न असेल, ‘लाजिम है कि हम भी देखेंगे... बस नाम रहेगा अल्लाह का’ या गायलेल्या ओळी असतील, या सर्व गोष्टी उघडपणे करून डावे लोक धार्मिक ध्रुवीकरण करणारा अजेंडा पुढे रेटताना दिसले. याचा खरेतर मूळ विद्यार्थी मागण्यांशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांचे आहे की, विशिष्ट विचारसरणीच्या हिंदू-विरोधकांचे, हेच आता कळेनासे झाले आहे.
हे समजून घ्या!
अशातच, आता एक गोष्ट समजून घेणे अत्यावश्यक आहे, ती म्हणजे; चित्रपट आणि वास्तव या दोन्ही अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. पण, आजची तरुण पिढी अनेकदा या दोन्हींमधील फरक विसरून जाते. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘फुंसुक वांगडू’ हे पात्र. अलीकडेच आमिर खान याने एका निवेदनात स्पष्ट केले की, ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘फुंसुक वांगडू’चे पात्र आणि सोनम वांगचूक यांचा काडीमात्र संबंध नाही. या खुलाशानंतर एक मोठा संभ्रम दूर झाला असला, तरी यानिमित्ताने आपल्या देशातील युवा पिढीच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या भवितव्यावर एक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी सहभाग घेत, उपोषणाला सुरुवात केली. त्यांना भेटायला अनेकजण येऊन गेले. मात्र, तथाकथित विद्यार्थी आंदोलनांच्या मंचावर जेव्हा राष्ट्रविरोधी चेहरे जातात, तेव्हा त्यांच्यामागे तरुण पिढीही आंधळेपणाने धावू लागते. काही आंदोलने अशी असतात, जी अनेकदा राजकीय स्वार्थासाठी आणि विशिष्ट विचारसरणीचा अजेंडा चालवण्यासाठी प्रायोजित केली जातात, हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. अशा वेळी केवळ एका ‘आभासी चेहर्या’कडे पाहून आंदोलनात उडी घेणे म्हणजे, स्वतःच्या भवितव्याशी खेळण्यासारखे आहे. एका बाजूला देशात पेपर लीक, रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुधारणा यांसारखे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांवर तरुणांनी नक्कीच आवाज उठवला पाहिजे. पण, हा आवाज उठवताना नेतृत्व कोणाच्या हातात आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादे आंदोलन मूळ मुद्द्यावरून भटकून वैचारिक चिखलफेकीकडे वळते, तेव्हा तिथे केवळ वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय होतो. अशा आंदोलनाच्या नादात गुन्हे दाखल झाले किंवा करिअर उद्ध्वस्त झाले, तर त्याचे परिणाम सामान्य तरुणाला आणि त्याच्या कुटुंबालाच भोगावे लागतात. आभासी जगातील नायकांच्या मागे धावून आपले अमूल्य भवितव्य धोक्यात घालण्यापेक्षा, विवेकबुद्धीने वागणे आणि जागरूक राहणे, हाच आजच्या तरुणांसाठी एकमेव मार्ग आहे. कोणाची तरी ‘राजकीय ढाल’ बनण्यापेक्षा देशाचे सुजाण नागरिक बना!