इराकमधून सैन्यवापसी...

    17-Jul-2026   
 
 
US Troop Withdrawal from Iraq
 
दि. ३० सप्टेंबरपर्यंत इराकमधील संपूर्ण अमेरिकी सैन्य माघार घेणार, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराकचे पंतप्रधान अली अल-जैदी यांनी नुकतेच संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. तसे पाहायला गेले, तर आजही जगातील ८०पेक्षा जास्त देशांमध्ये अमेरिकेचे ७५०हून अधिक लष्करी तळ सक्रिय आहेत. ‘जगाचा दादा’ अशा तोर्‍यात असलेल्या अमेरिकेला असे करावे लागते, कारण तसे केले नाही; तर जागतिक सत्ताकारणात आणि अर्थकारणात त्यांची किंमत राहणार नाही. त्यामुळेच सद्दाम हुसेनची सत्ता उलथवून इराकमधील अल्पसंख्याक कुर्द याजिदी आणि ख्रिश्चनांचे रक्षण करायचे म्हणून किंवा इराकने कुवेतवर केलेला कब्जा काढावा म्हणून अमेरिकेने इराकमध्ये सैन्य तैनात केले होते. पुढे ‘इसिस’च्या दहशतवादी कृत्यांना आळा बसावा किंवा इराणला शह बसावा म्हणूनही अमेरिकेने इराकमध्ये एक लाखांच्या वर सैनिक तैनात केले होते. मात्र, आता इराकमधले अमेरिकन सैन्य २३ वर्षांनी इराकमधून पुन्हा मायदेशी जात आहे.
 
असे का घडत असेल? तर, याला अनेक कारणे आहेत. जसे- इराक एक स्वतंत्र देश असताना तिथे अमेरिकेची सैन्याच्या नावाने ढवळाढवळ का, असा प्रश्न इराकी जनतेला पडे. तसेच अमेरिकेने ‘इसिस’च्या दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सैन्य इराकमध्ये तैनात होते. मात्र, त्यांच्या कारवायांमध्ये इराकी जनताही भरडली जात होती. त्यातच २०२० साली अमेरिकेने बगदाद विमानतळावर ड्रोनहल्ला करून इराणचे जनरल कासिम सुलेमानी आणि इराकी कमांडर अबू महदी अल-मुहंदिस यांना ठार मारले. या घटनेनंतर इराकी जनता रस्त्यावर उतरली आणि इराकच्या संसदेने सर्व परदेशी सैन्याला देशाबाहेर काढण्याचा अधिकृत कायदा मंजूर केला. याच परिस्थितीमध्ये इराकमधील इराण-समर्थित लष्करी गट (काताईब हिजबुल्ला) अमेरिकन सैन्याच्या तळांवर सतत रॉकेट आणि ड्रोनहल्ले करत होते. यामध्ये अमेरिकन सैनिकांनाही जीवाला मुकावे लागले होते. आपल्या सैन्याने दुसर्‍या देशांमधील युद्धांमध्ये उतरण्यास अमेरिकन जनतेचा विरोध होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जावधी डॉलर्सचा लष्करी खर्च वाचवण्यासाठी त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत इराकमधून सैन्याला परत बोलावले.
 
मात्र, या कारणाव्यतिरिक्त दोन मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे अमेरिकेने सैन्य माघारी बोलावले. मुख्य कारण, अमेरिकेचे इराणसोबतच युद्ध सुरू आहे. युद्धाचा खर्च वाढता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी इराकमध्ये सैन्य काढून घेतले, तर दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेच्या मते, भविष्यात इराणच्या तेलसाठ्यावर अमेरिकेचे वर्चस्व होईल. गेले २३ वर्षे केवळ तेलाच्या राजकारणासाठी इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप करणार्‍या अमेरिकेला आता इराकमध्ये लष्करी खर्च करण्याची गरज वाटत नाही.
 
यापूर्वीही अमेरिकेने त्यांचे सैन्य अनेक देशांतून मागे घेतले होते. जसे- १९७३ मध्ये अमेरिकेने व्हिएतनाममधून, १९९४ मध्ये सोमालियामधून आपले सैन्य तातडीने मागे घेतले. १९९२ मध्ये अमेरिकेने फिलीपिन्समधील आपले सर्वांत मोठे ‘सुबिक बे’ नौदल तळ आणि ‘क्लार्क एअरबेस’ बंद करून सैन्य मागे घेतले होते. १९८४ मध्ये बैरूतमधून, तर २०२१ साली अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णपणे मागे घेतले. २०२६ मध्ये जर्मनीमधूनही पाच हजार सैनिक कमी करण्याची घोषणा अमेरिकेने केली. या पार्श्वभूमीवर हे तपासणे महत्त्वाचे आहे की, इराकमधून अमेरिकेचे सैन्य हटल्यानंतर इराकमध्ये काय घडू शकते? जाणकारांच्या मते, इराकमध्ये इराण-समर्थित दहशतवादी पुन्हा सक्रिय होतील. इराकमधील अल्पसंख्याक समुदायावर पुन्हा अत्याचार होतील. पण, त्याचबरोबर अमेरिका इराकमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याचेही संकेत आहेत. पण, याहीपलीकडे जाऊन अफगाणिस्तानमधून जाताना अमेरिकन सैन्य तिथे शस्त्रास्त्रे ठेवून गेले. या शस्त्रांच्या मदतीने तालिबानी राजवटीमध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले, असे म्हटले जाते. आता इराकमधून अमेरिकन सैन्याने काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतर इराकमध्ये नक्की काय घडेल, याची स्पष्टता भविष्यातच येईल.
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर