हिंदू विद्यार्थ्याला इस्लामी गृहपाठ देणाऱ्या शिक्षिकेचे निलंबन!

म्हणून ‘कलमा’ आणि ‘सूरा फातिहा’ पाठ करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप

    17-Jul-2026   
Teacher Suspended
 
मुंबई : (Teacher Suspended) तेलंगणाच्या हैदराबाद येथील ‘सक्सेस द स्कूल’ या खासगी शाळेतील एका मुस्लिम शिक्षिकेला निलंबित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरीच्या वर्गातील एका हिंदू विद्यार्थ्याला गृहपाठ म्हणून ‘कलमा’ आणि ‘सूरा फातिहा’ पाठ करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप शिक्षिका शेख आयशा परवीन यांच्यावर आहे. ही बाब विद्यार्थ्याच्या पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाळेविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर शाळा व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करत संबंधित शिक्षिकेला निलंबित केले. तसेच भविष्यात त्यांच्या समूहातील कोणत्याही संस्थेत संबंधित शिक्षिकेला नोकरीसाठी अर्ज करता येणार नसल्याचेही शाळेने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
 
हिंदू कुटुंबाच्या तक्रारीनंतर सैदाबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शाळा व्यवस्थापनाविरुद्ध योग्य कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, यासंदर्भात सरकारी वकिलांचा कायदेशीर सल्लाही मागविण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन शाळेविरुद्ध कठोर चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.(Teacher Suspended)
 
ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा सहा वर्षांचा विद्यार्थी शाळेतून घरी परतल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याची शाळेची डायरी तपासली. त्यावेळी शिक्षिकेने विद्यार्थ्याला ‘पहिला आणि दुसरा कलमा’ तसेच ‘सूरा फातिहा’ वाचून पाठ करण्याच्या सूचना लिहिल्याचे त्यांना आढळले. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, यापूर्वीही अशाच प्रकारच्या नोंदी डायरीत करण्यात आल्या होत्या; मात्र त्या नंतर खोडून टाकण्यात आल्या. पालकांचे म्हणणे आहे की, कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याच्या धर्माविरुद्ध इतर धर्माचे शिक्षण जबरदस्तीने देणे योग्य नाही. या घटनेमुळे मुलावर मानसिक ताण आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
 
या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये विद्यार्थ्याची आई आणि कुटुंबीय शाळेत जाऊन शिक्षक व व्यवस्थापनाला जाब विचारताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओंची अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली. ती म्हणजे, संबंधित वर्गात एकूण २५ विद्यार्थी असून त्यापैकी २४ विद्यार्थी मुस्लिम आहेत, तर पीडित विद्यार्थी हा त्या वर्गातील एकमेव हिंदू विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान संबंधित शिक्षिकेने आपण चुकून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्याच्या डायरीतही तोच गृहपाठ लिहिल्याचा दावा केला आहे.(Teacher Suspended)
 
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये, आपण हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि हस्तक्षेप केल्यानंतरच शाळेने संबंधित शिक्षिकेविरुद्ध कठोर कारवाई केल्याचा दावा केला. त्यांनी हिंदू विद्यार्थ्याला इस्लामी प्रार्थना शिकविण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, शिक्षिकेला निलंबित केल्याचे पत्र जारी करण्याव्यतिरिक्त शाळा व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप माध्यमांसमोर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच, या प्रकरणात शाळेच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षण विभागाकडेही करण्यात येत आहे.(Teacher Suspended)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर