सिंहाचा जबडा फाडला....

    17-Jul-2026   
 
Argentina vs England Football World Cup 
 
इंग्लंडच्या फुटबॉल संघाच्या बोधचिन्हात तीन सिंह आहेत. १२व्या शतकातील इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिला यांच्या राजचिन्हातून हे तीन सिंह घेण्यात आले आहे. या इंग्लंडच्या सिंहाच्या जबड्यात हात घालून मेस्सीच्या अर्जेंटिनाने विजय खेचून आणला. नव्हे सिंहाचा जबडाच फाडला! महान संघांची ओळख ते जिंकतात म्हणून होत नाही. तर सर्वकाही गमावले आहे असे वाटत असतानाही ते विजयश्री खेचून आणतात म्हणून ते महान असतात. जग त्यांना बाजीगर म्हणून ओळखते.
 
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत शेवटच्या काही मिनिटांपर्यंत अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या डोळ्यांत चिंता होती. दुसऱ्या बाजूला इंग्लंडला वाटत होते की इतिहास बदलणार आहे. पण इतिहास बदलण्यासाठी केवळ आघाडी पुरेशी नसते. त्यासाठी समोरचा संघ अर्जेंटिना नसावा लागतो... आणि त्याच्या जर्सीवर क्रमांक १० असलेला लिओनेल मेस्सी नसावा लागतो.
 
सामन्याच्या अखेरच्या क्षणी मेस्सीने दोन असे पास दिले, जे आकडेवारीत 'असिस्ट' म्हणून नोंदले जातील; पण प्रत्यक्षात ते एका देशाच्या स्वप्नांना अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाणारे धागे होते. एन्झो फर्नांडेझ आणि लाउतारो मार्टिनेझने गोल केले; पण त्या गोलांमध्ये मेस्सीचा अनुभव, संयम आणि विश्वास मिसळलेला होता.
 
विश्वचषक २०२६ मध्ये अर्जेंटिनाची ही चौथी महान सुटका. केप व्हर्डेविरुद्ध अतिरिक्त वेळेत विजय. इजिप्तविरुद्ध ०-२ वरून ३-२ अशी मुसंडी. स्वित्झर्लंडविरुद्ध पुन्हा अतिरिक्त वेळ आणि आता इंग्लंडविरुद्ध शेवटच्या क्षणी पलटवार. हा योगायोग नाही. हा संघाचा स्वभाव आहे.
 
फुटबॉलमध्ये कधी कधी सर्वोत्तम खेळाडू सामने जिंकतात. पण विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वोत्तम संघ लागतो. जो आजच्या घडीस अर्जेंटिनाचा आहे. मेस्सी आज ३९ वर्षांचा आहे. हा त्याचा सहावा विश्वचषक. शरीर आधीसारखे वेगवान नाही. प्रत्येक धाव विचारपूर्वक घ्यावी लागते. पण फुटबॉलमध्ये काही गोष्टी वयाबरोबर कमी होत नाहीत—दृष्टी, निर्णयक्षमता आणि योग्य क्षणी योग्य पास देण्याची कला. त्या बाबतीत मेस्सी आजही जगात अद्वितीय आहे.
 
इंग्लंडविरुद्ध त्याने धावत सामना जिंकला नाही.
त्याने स्पेनला ‘वाचत’ सामना जिंकला.
 
समोरच्या बचावफळीतील एक इंच जागा त्याने ओळखली आणि दोन पासमध्ये संपूर्ण विश्वचषकाचे समीकरण बदलून टाकले.
आता समोर आहे स्पेन. कदाचित या स्पर्धेतील सर्वात सुंदर, सर्वात संतुलित आणि सर्वात आत्मविश्वासू संघ. आणि मेस्सीसाठी हा सामना केवळ अंतिम सामना नाही. ही एका आयुष्याची परिक्रमा आहे. ज्या स्पेनने त्याला घडवले... ज्या बार्सिलोनाच्या भूमीवर त्याने जगाला फुटबॉलची नवी व्याख्या शिकवली...त्याच देशाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध तो आता विश्वचषकाच्या अंतिम फेरीत उभा राहणार आहे.
 
किती विलक्षण नियती! एकीकडे स्पेनचा होऊ घातलेला सम्राट लामिन यामाल. अन् दुसरीकडे फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट लिओनेल मेस्सी.
 
यामालच्या रुपात एका पिढीचा उदय आणि मेस्सीमुळे दुसऱ्या पिढीचा कदाचित अखेरचा सूर्यास्त—दोन्ही एकाच मैदानावर.रविवारी न्यू जर्सीमध्ये केवळ विश्वचषकाची ट्रॉफी पणाला लागलेली नसेल. पणाला लागलेले असेल एका महान कारकिर्दीचा फैसला... फुटबॉल वर्ल्डकपच्या तीन फायनलमध्ये खेळणारा ब्राझिलच्या कॅफुनंतरचा आजवरचा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. मेस्सीने निवृत्तीचा विचार अजून केलेला नाही, असे तो म्हणतो. आणि खरेच, अशा प्रवासात शेवटाचा विचार कोण करणार? कारण काही प्रवास ट्रॉफींसाठी नसतात.
 
ते आठवणींसाठी असतात. अशा असंख्य अजरामर आठवणी मेस्सीने तुम्हा आम्हा सर्वांना दिल्यात.




संबंधित मजकूर