फ्रान्स हरला, ही ‘बातमी’ नाही...

    16-Jul-2026   
 
Spain vs France 
 
फ्रान्स हरला, ही बातमी नाही. एम्बाप्पेला गोल करता आला नाही; हीही बातमी नाही; बातमी एवढीच, स्पेनने जगातील सर्वांत स्फोटक आक्रमणाला इतके शांत केले की ते स्वतःलाच ओळखू शकले नाही!
 
फुटबॉलमध्ये कधीकधी सर्वांत सुंदर खेळ गोल्समध्ये नसतो. तो प्रतिस्पर्ध्याला एकही सूर सापडू न देणार्‍या स्पेनच्या ‘टिकी-टाका’ शैलीत असतो. काही संघ सामने जिंकतात. काही संघ स्पर्धा जिंकतात. पण फार थोडे संघ फुटबॉलची व्याख्याच बदलतात! २००८ ते २०१२ दरम्यान स्पेनने ‘टिकी-टाका’ शैलीने जग बदलले होते. २०२६ मध्ये स्पेनचा हा संघ पुन्हा एकदा बदललेला दिसतो.
 
डॅलसमध्ये स्पेनने दोन गोल केले. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी फ्रान्सची संपूर्ण लयच चोरली.आणि फुटबॉलमध्ये, लय हरवली की सामना आधीच हरलेला असतो! विश्वचषकभर फ्रान्सने प्रतिस्पर्ध्यांना वेगाने, वैयक्तिक कौशल्याने आणि क्षणिक स्फोटकतेने उद्ध्वस्त केले. किलियन एम्बाप्पेचा वेग, उस्मान डेंबेलेची अनिश्चितता आणि मायकेल ओलिसेची कल्पकता. हे तिघे मिळून जणू फ्रान्सचे त्रिशूळ बनले होते. प्रत्येक सामन्यात एखाद्या क्षणी हे त्रिशूळ वार करायचेच. त्यामुळे डॅलसला पोहोचताना सलग तिसर्‍या विश्वचषक अंतिम फेरीचे तिकीट फ्रान्सच्या खिशातच आहे, अशी भावना होती. पण स्पेनने त्या खिशालाच शिवण घातली. फ्रान्सला त्यांनी हरवले नाही; त्यांनी फ्रान्सचा आक्रमणाचा आत्माच बंदिस्त केला! लुईस देला फुएंते यांच्या स्पेनने सुरुवातीपासून एक गोष्ट स्पष्ट केली, हा सामना तुमच्या वेगावर खेळला जाणार नाही; आमच्या ‘टिकी-टाका’च्या तालावर खेळला जाईल.
 
एम्बाप्पे सतत डावीकडून उजवीकडे भटकत होता. चेंडूच मिळत नव्हता. डेंबेलेला इतके मागे यावे लागले की तो ‘विंगर’ कमी आणि ‘मिडफिल्डर’ जास्त दिसू लागला. ओलिसे, जो या स्पर्धेतील सर्वाधिक असिस्ट देणारा खेळाडू होता, त्याला तर चेंडू मिळण्याआधीच स्पेनच्या जर्सीने वेढले. फ्रान्सला पहिल्यांदाच या विश्वचषकात स्वतःचा चेहराच ओळखू आला नाही. लोकांना वाटते की ताबा म्हणजे चेंडू स्वतःकडे ठेवणे. चूक! खरा ताबा म्हणजे प्रतिस्पर्ध्याला त्याचा खेळच खेळू न देणे! स्पेनने चेंडू ठेवला, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी फ्रान्सला चेंडू मिळाल्यावर काय करायचे, हेच विसरायला लावले!
 
प्रत्येक पासच्या आधी एखादा स्पॅनिश खेळाडू तयार!
 
प्रत्येक धावपळीच्या आधी एखादी स्पॅनिश सावली फ्रान्सच्या अवतीभोवती. प्रत्येक आक्रमणाच्या आधी एखादी स्पॅनिश भिंत. फ्रान्सने तीनवेळा लक्ष्यावर फटका मारला. पण एकदाही असा क्षण आला नाही की, स्पेनचा बचाव हादरला. या सामन्याचा स्पेनचा खरा नायक गोल करणारा नव्हता. तो पेनल्टी मिळवून देणारा १९ वर्षांचाही नसलेला लामिन यामाल होता. निरुपद्रवी वाटणार्‍या चेंडूचा पाठलाग करताना त्याने लुकास डिनेला घाईघाईने टॅकल करायला भाग पाडले. आणि त्या एका क्षणाने सामना बदलला. महान खेळाडू तेच असतात, जे काही नसताना काहीतरी निर्माण करतात! यामालने तेच केले. ओयार्झाबालने पेनल्टी शांतपणे जाळ्यात पाठवली. आणि त्यानंतर पेद्रो पोरोने डॅनी ओल्मोसह केलेल्या अप्रतिम ‘वन-टू’वर दुसरा गोल ठोकला.
 
सामना तिथेच संपला होता.
स्कोअरबोर्डवर नाही... फ्रान्सच्या मनात...




संबंधित मजकूर