मेस्सी की पेस्सी?

    15-Jul-2026   

Lionel Messi FIFA Bias
 
जो माणूस वारंवार पडतो, जखमी होतो, अपमान सहन करतो, पण पुन्हा राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखा उभा राहतो आणि अखेर विजयाचं शिखर गाठतो, त्याच्यावर जग अक्षरशः प्रेमाचा वर्षाव करतं. त्याच्या प्रत्येक अश्रूला टाळ्या मिळतात, प्रत्येक जखमेला गौरव मिळतो. पण हाच माणूस जेव्हा सतत जिंकू लागतो, प्रत्येक आव्हानावर सहज मात करू लागतो, विजय हीच त्याची सवय बनते, तेव्हा टाळ्यांची जागा कुजबुज घेते. कौतुकाची जागा संशय घेतो आणि नायकाच्याच महानतेवर प्रश्नचिन्ह उभं राहू लागतं. हा विरोधाभास नाही; हाच मानवी स्वभाव आहे! म्हणूनच, संघर्षावर जग प्रेम करते; पण वर्चस्वावर संशय घेते.
 
लिओनेल मेस्सीबाबतही आज नेमकं तेच घडताना दिसत आहे.२०२२ मध्ये कतारमध्ये अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला, तेव्हा जगभरातील कोट्यवधी लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. फुटबॉलला त्याचा ‘राजा’ मिळाला, देवाने न्याय दिला, इतिहास पूर्ण झाला, अशा भावना व्यक्त होत होत्या. कारण ती होती संघर्षाची कथा. लहानपणी वाढीच्या हार्मोन्सच्या आजाराशी झुंज देणारा मुलगा, बार्सिलोनात स्वतःला सिद्ध करणारा कलाकार आणि चार अपयशी आंतरराष्ट्रीय अंतिम फेर्‍यांनंतर अखेर विश्वविजेता होणारा योद्धा. त्या संघर्षावर जग फिदा झालं.
 
पण अवघ्या चार वर्षांनी चित्र बदललं आहे.
 
२०२६च्या विश्वचषकात मेस्सी पुन्हा अर्जेंटिनाला पुढे नेत आहे. विक्रम मोडत आहे. गोल करत आहे. प्रतिस्पर्ध्यांचा बचाव मोडत आहे. आणि आता अचानक सोशल मीडियावर, काही विश्लेषकांच्या चर्चेत आणि पराभूत संघांच्या समर्थकांमध्ये एकच सूर ऐकू येतो, ‘फिफा’ मेस्सीला जिंकवत आहे! जग बदललं नाही; परिस्थिती बदलली आहे. कारण संघर्ष संपला आणि वर्चस्व सुरू झालं. इतिहास सांगतो की, हे फक्त मेस्सीबाबतच घडलेलं नाही. मायकेल जॉर्डन सलग विजेतेपदं जिंकू लागला, तेव्हा ‘एनबीए’ त्याला झुकतं माप देत असल्याचे आरोप झाले. रॉजर फेडररच्या काळात पंच त्याच्यावर मेहरबान असल्याचं म्हटलं गेलं. नोव्हाक जोकोव्हिच जेव्हा विक्रमांच्या शिखरावर पोहोचला, तेव्हा त्याच्याविषयी प्रेमापेक्षा संशय जास्त व्यक्त झाला. सचिन तेंडुलकर, टायगर वूड्स, उसेन बोल्ट प्रत्येक महान खेळाडूला एका टप्प्यावर हा अनुभव आला आहे.कारण माणसाला चमत्कार आवडतो; पण सतत घडणारा चमत्कार स्वीकारणं कठीण जातं.
 
मेस्सीबाबतही तेच सुरू आहे. ज्या फुटबॉलपटूला कधीकाळी विश्वचषक जिंकला नाही, म्हणून कमी लेखलं गेलं, त्याच फुटबॉलपटूने विश्वचषक जिंकल्यानंतर आता खूपच जिंकत आहे, म्हणून टीका ऐकावी लागत आहे. हा विरोधाभास किती विलक्षण आहे! याचा अर्थ असा नाही की, ‘फिफा’ किंवा पंचांचा प्रत्येक निर्णय निर्दोषच असतो. चुका होतात. ‘व्हीएआर’ असूनही वाद होतात. काही निर्णयांवर चर्चा व्हायलाच हवी. पण प्रत्येक वादग्रस्त निर्णयामागे एकाच खेळाडूचं नाव शोधण्याची घाई, ही विश्लेषणापेक्षा पूर्वग्रह अधिक असतो.महानता जितकी उंच जाते, तितकी तिची सावलीही मोठी दिसते. कदाचित म्हणूनच, इतिहासात प्रत्येक सम्राटापेक्षा त्याच्या विरोधकांच्या कथा अधिक रंगवल्या जातात. कारण संघर्षात नाट्य असतं; वर्चस्वात सातत्य असतं. संघर्षाला टाळ्या मिळतात; सातत्याला प्रश्न. मेस्सी आज त्या दुसर्‍या टप्प्यात उभा आहे.तो आता फक्त एक महान फुटबॉलपटू राहिलेला नाही; तो एका युगाचं प्रतीक बनला आहे. आणि जेव्हा एखादा खेळाडू युग बनतो, तेव्हा त्याच्यावर प्रेम करणार्‍यांइतकेच त्याच्यावर संशय घेणारेही निर्माण होतात. कदाचित म्हणूनच, प्रश्न निर्माण होतो, मेस्सी की ‘फिफा’चा पेस्सी? याचं उत्तर फायनलमध्येच मिळेल?




संबंधित मजकूर