समाजासाठी जपलेले समर्पण...

    15-Jul-2026   
Jeevan Prabodhini Trust 
 
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रांत सातत्याने समाजोपयोगी कार्य करणार्‍या ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’ने सेवाभावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील गरज ओळखून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांमुळे विद्यार्थी, रुग्ण, पालक आणि गरजू कुटुंबांना आधार मिळत आहे. २०२६ मध्ये ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई येथे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधून संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्यपद्धती अधिक ठळकपणे समोर आली.
 
ग्रामीण आणि जनजातीबहुल भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये, या उद्देशाने ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’ने यंदा शैक्षणिक साहित्य वितरणाची व्यापक मोहीम हाती घेतली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तेलमपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ओझरम क्रमांक १, ओझरम पश्चिम आणि ओझरम मापारवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी एल. डी. राणे, सुधाकर राणे, वसंत राणे, रामचंद्र बिर्जे, सुरेश देसाई, अपर्णा अमित राणे, सान्वी सुरेश खरात, तसेच मुख्याध्यापक विनायक जाधव उपस्थित होते. ‘शाळा व्यवस्थापन समिती’ने ट्रस्टच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
कणकवली तालुक्यातील कळसुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि श्रीदेव भोगनाथ विद्यामंदिर, जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ येथेही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजन सूर्यकांत पालव यांनी केले. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून शिक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला.
 
देवगड तालुक्यातील पोयरे शाळेत ट्रस्टचे ज्येष्ठ सल्लागार केशव परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या स्थापनेपासून सातत्याने समाजकार्यात योगदान देणार्‍या केशव परब यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. मुंबईतील नागरिक विकास परिषद सभागृह, लालबाग येथे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळा पार पडला. उद्योजक व अभियंता उमेश पोवार, तसेच ज्येष्ठ मेडिकल फिजिशियन डॉ. प्रागजी वाझा यांनी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी याविषयी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
 
ठाणे जिल्ह्यातील वांगणी-धारोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगसाहित्य, टिफिन बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासोबत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथही घेतली. या सर्व उपक्रमांमध्ये संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष गणेश पार्टे, सचिव प्रशांत पवार, खजिनदार नागेश तांदळेकर, ज्येष्ठ सल्लागार केशव परब, संयोजक विनायक येंधे, तसेच अमित पवार, हेमंत मकवाना, गणेश क्षीरसागर, राजू साळवी, नंदकुमार चिबडे, सुशांत नाईक, बाळा खोचरे, उमेश गुरव, सिद्धेश तांबे, मंगेश पिंपरकर, संतोष सकपाळ, मंगेश सकपाळ, प्रसाद सावंत, किशोर पटेल, लक्ष्मण (बावा) देवरुखकर, सुरेश सावळे, गिरीश मकवाना, मुकेश शिंदे, साहेबराव शिंदे, श्रीकांत चौरसिया, गणेश काळे, सतीश कार्लेकर, रवी जाधव, संजय कारेकर आणि मेघनाथ शेट्टी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे, गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्थांशी समन्वय साधणे, रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करणे आणि संकटाच्या काळात मानसिक आधार देणे, हे कार्य सातत्याने सुरू आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, यासाठी दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ उपक्रम आयोजित केला जातो, तर उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांत गरज ओळखून सातत्याने कार्य करणे, हीच ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’च्या वाटचालीची ओळख ठरली आहे.
 
सेवेतून सक्षम समाजाचा संकल्प
 
‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’ची स्थापना समाजातील गरजू घटकांना केवळ मदत करण्यासाठी नव्हे, तर त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने झाली आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक उपक्रमामागे माणसाला केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देताना त्यांचे भविष्य घडविण्याचा विश्वास असतो, तर रुग्णांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहताना माणुसकी जपण्याचा प्रयत्न असतो. समाजातील दाते, कार्यकर्ते, शिक्षक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अधिक व्यापक झाला. आगामी काळातही समाजाच्या गरजा ओळखून अधिक परिणामकारक उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प कायम राहील. -सत्यवान नर, संस्थापक, जीवन प्रबोधिनी ट्रस्ट

‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’चे प्रमुख समाजोपयोगी उपक्रम : शिक्षणासाठी भक्कम आधार
  • जनजाती व दुर्गम भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण
  • दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा
  • छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, लो. टिळक यांच्या चरित्रांचे वितरण
  • विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखल्यांसाठी मार्गदर्शन
आरोग्यसेवेत माणुसकीचा स्पर्श
  • मुंबईतील रुग्णालयांमध्ये बाहेरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व्यवस्था
  • गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी समन्वय
  • रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन
  • कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ‘दिवाळी पहाट’ उपक्रम
  • कॅन्सरग्रस्त मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन
  • आरोग्य तपासणी शिबिरे
  • ज्येष्ठ नागरिकांना निःशुल्क ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  • दुष्काळग्रस्त भागात वैद्यकीय सेवा

९९६७०२०३६४




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर