बुडत्याला काडीचा आधार

    15-Jul-2026   
 
 
INDIA Alliance
 
‘इंडी’ आघाडीमध्ये म्हणा कधीही काही आलबेल नव्हतेच आणि अजूनही नाहीच. तृणमूल काँग्रेसची शकले उडाली, तर काँग्रेसने तामिळनाडूत ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिल्यानंतर द्रमुकनेही ‘इंडी’ आघाडीशी फारकत घेतली. त्यातच आता ‘इंडी’ आघाडीत दुसर्‍या क्रमाकांचा भिडू असलेल्या अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचेही काँग्रेसशी बिनसलेले दिसते. त्यामुळे एकूणच, ‘इंडी’ आघाडीच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी म्हणजे, २०२७ साली विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी काँग्रेस आणि सपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, जागावाटपावरून आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेचही सुरू झाली. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून संभाव्य आघाडीवरून कलगीतुरा रंगला असून, नेमकी कोणाला कोणाची गरज आहे, मोठा भाऊ-छोटा भाऊ कोण, यावरून वाक्बाण सोडले गेले. काँग्रेसचे सहारनपूरचे खासदार इमरान मसूद यांनी तर सपाला काँग्रेसबरोबर आघाडीची अधिक गरज असून, मुस्लीम नेत्यांना सपामध्ये स्थान नाही, राहुल गांधीच मुस्लिमांचे मसिहा असल्याचे वक्तव्य करून मतपेढीला कुरवाळण्याचाच प्रयत्न केला. दुसरीकडे सपाचे नेते डॉ. एस. टी. हसन यांनी काँग्रेसला जागा त्यांच्या आधीच्या कामगिरीनुरुप सोडल्या जातील, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे भविष्यात सपा आणि काँग्रेसमधील हे वाक्युद्ध अधिकच भडकण्याची चिन्हे आहेत.
 
उत्तर प्रदेशमधील सद्यस्थिती लक्षात घेता, सपा असेल अथवा काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय गत्यंतर नाहीच. कारण, जर का हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढले, तर साहजिकच त्याचा फटका दोन्ही पक्षांनाही बसू शकतो. अखिलेश यादव आणि राहुल गांधी दोघांनाही याची पूर्ण कल्पना आहेच. पण, केवळ आपल्या पदरी जास्त जागा पडाव्या म्हणून दोन्ही पक्षांतील नेत्यांची ही तोंडपाटीलकी सध्या सुरू दिसते. राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणाचा राजकीय फायदा लाटण्यासाठी सपा आणि काँग्रेस टपून बसले आहेतच. पण, २०१७ पासून उत्तर प्रदेशात आरंभलेल्या विकासाच्या ‘योगीपर्वा’समोर सपा आणि काँग्रेसचा २०२७ मध्येही निभाव लागणे अवघडच! म्हणूनच, इथे बुडत्याला काडीचा आधार. आता उत्तर प्रदेशात ‘बुडता’ कोण आणि ‘काडी’ कोण, ते पाहायचे.
 
झुरळांना हवा झगमगाट...
 
‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या जंतरमंतरवरील सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला १७ दिवस उलटले. फुकट खाण्या-पिणार्‍यांची गर्दी सोडली, तर या आंदोलनाकडे ‘जेन-झी’ने तशी पाठच फिरवली. त्यामुळे ऑनलाईन लाखो फॉलोअर्स असले, तरी ऑनग्राऊंड चार डोकी जमवणेही अभिजित दीपकेला तसे जडच गेले. म्हणूनच, मग मोदीविरोधकांची जमवाजमव करण्याचे उद्योग जंतरमंतरवर निरंतर सुरूच आहेत. पण, गेल्या दोन-तीन दिवसांत एकाएकी जंतरमंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध पक्षांतील नेत्यांची, सेलिब्रिटींची, पत्रकारांची आणि डाव्या मंडळींची रेलचेल वाढलेली दिसते. हाडाचे मोदीविरोधक असलेल्या प्रकाश राज यांनी प्रत्यक्ष जंतरमंतरवर हजेरी लावली; तर नसरुद्दीन शाह, झिनत अमान, दिया मिर्झा, अभय देवोल, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या सेलिब्रिटींनीही वांगचूक यांच्या उपोषणाप्रति चिंता व्यक्त करून, सरकारला चर्चेचे आवाहन केले. त्यामुळे वांगचूक यांना पुढे करून आणि आता सेलिब्रिटींच्या माध्यमातून फसलेल्या आंदोलनात प्राण फुंकण्याचेच हे निष्फळ प्रयत्न!
 
सोमवारपासून दिल्लीत अधिवेशन सुरू होणार असून, त्या दिवशी संसदेवर मोर्चा काढण्याचेही झुरळांचे मनसुबे आहेत. पण, ते कितपत यशस्वी ठरतील, ही साशंकताच! त्यातच आपल्याला पोलिसांनी अटक करावी आणि आपणच आंदोलनाचे हिरो ठरावे, यासाठी दीपकेने पोलिसांशी क्षुल्लक कारणांवरून हुज्जतही घालून बघितली. पण, उपयोग शून्यच. आता संसदेवरील मोर्चादरम्यान दीपकेकडून याच स्टंटच्या पुनरावृत्तीची दाट शक्यता. स्वबळावर आंदोलन अयशस्वी ठरल्यामुळेच, दीपके आणि टोळीला अन्य राजकीय पक्ष, सेलिब्रिटींचा असा धावा करण्याची वेळ आली. जिथे सेलिब्रिटी तिथे गर्दी, म्हणूनच हा खटाटोप! त्यातच देशातील अन्य गंभीर विषयांवर एरव्ही मिठाच्या गुळण्या घेऊन मौनव्रत धारण करणारे हे मूठभर सेलिब्रिटी झुरळांच्या आंदोलनात झळकण्यात धन्यता मानताना दिसतात. मुळात ज्यांच्यासाठी आंदोलन छेडले गेले, ते विद्यार्थी, त्यांचे पालक हे सोडून उपर्‍यांचीच गर्दी फार. त्यावरुन या आंदोलनाचे भविष्य काय असेल, ते वेगळे सांगायला नको.




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर