रामसाधनेचा शब्दसेतू

    15-Jul-2026   
 
 
Abhay Manke
 
आदर्शत्वाचा अत्युच्चबिंदू असलेल्या सुरस रामकथेचा अविष्कार, देशातील नवयुवकांपर्यंत पोहोचविणार्‍या अभय माणके यांच्याविषयी...
 
प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे मानवजातीसाठी एक दीपस्तंभच. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपल्याला जो आदर्श घालून दिला, त्यात सबंध जीवसृष्टीच्या समृद्धीचे सार लपले आहे. राम म्हणजे या मातीच्या लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग! तुलसीदासांच्या रचना असो किंवा वनवासी मातांनी त्यांच्य गीतांमधून मांडलेला राम, मागची अनेक शतकं रामकथा दुथडी भरून वाहणार्‍या नदीसारखी भोवताल समृद्ध करत आहे. रामकथेचा हा अविष्कार नव्या पिढीला, त्यांच्या भाषेत सांगणारं एक अनोखं व्यक्तिमत्त्व म्हणजेच अभय माणके!
 
संगीताची परंपरा लाभलेल्या ग्वाल्हेरमध्ये त्यांचा जन्म झाला. आई उषा वझे-माणके संगीत शिक्षिका, त्यामुळे घरातच संगीताचं वातावरण होतं. अभय यांनी पंडित बाळाभाऊ उमडेकर (कुंडल गुरू) यांचे सुपुत्र, पंडित माधव उमडेकर यांच्याकडे तबलावादनाचे शिक्षण घेतले.
 
‘संगीत अलंकार’ पदवीसह सुवर्णपदकदेखील मिळवले. गानसेवेतूनच त्यांना त्यांची जीवनवाहिनी गवसली. त्यांनी रसायनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले व रेल्वेमध्ये नोकरीलाही लागले. एका बाजूला रेल्वेच्या नोकरीतील रुळांचा खडखडाट आणि दुसर्‍या बाजूला संगीतातली सुरावट! अभय यांच्या मते, शिक्षणाने खर्‍या अर्थाने त्यांचे डोळे उघडले. पारंपरिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मातील सुखाचीचीही त्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली. कीर्तनकारांसोबत कार्यक्रम करताना, आख्यान रंगवण्याची कलाही त्यांनी आत्मसात केली. ‘आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे कलाकार’ म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली.
 
बरेचदा मोठेपणी आपण जो मार्ग निवडतो, त्याची बीजं नकळतपणे आपल्या मनात लहानपणीच रुजतात. सुधीर फडके, अर्थात बाबूजी यांच्या आवाजातील गीतरामायणाची मोहिनी अनेक पिढ्यांवर आहे. अभय लहानपणापासून गीतरामायणाच्या प्रेमात होते. यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांची आध्यात्मिक भेट घडल्यावर, त्यांना खर्‍या अर्थाने जीवनात राम गवसला!
 
याच पार्श्वभूमीवर, त्यांनी गीतरामायण हिंदीत आणायचा निर्णय घेतला. सुदैवाने मराठी गीतरामायणाचे हिंदी अनुवादक ग्वाल्हेरचे कवी पंडित रुद्र दत्त मिश्र यांचे सहकार्य त्यांना लाभले. रामनामाचे चैतन्य त्यांनी आपल्या वाणीतून, लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. १९९५ पासून सपत्निक त्यांनी ‘अमृत रामायण’ कार्यक्रमाच्या माध्यमातून, प्रभूश्री रामचंद्रांचा जीवनप्रवास सांगण्यास सुरुवात केली. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातील मान्यवर व्यक्ती, मुकुल कानिटकर, दत्तात्रेय होसबाळे, भैय्याजी जोशी आदींचा त्यांना सहवासही लाभला. मागच्या २० वर्षांच्या कालावधीत, चार हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी रामायण मुलांच्या भाषेतच मुलांपर्यंत पोहोचवले. उदाहरणार्थ, ‘बारावी पास राम’ ही आगळी-वेगळी संकल्पना राबवली. अर्थात, सुरुवातीला या नावावरती अनेकांनी आक्षेप घेतलाच. मात्र, जेव्हा या कार्यक्रमाची व्याप्ती, त्यातले बहुपेडी सामाजिक अंतरंग आणि युवकांना दिशा देणारा विचार लक्षात आला, तेव्हा विरोध मावळला. या ‘बारावी’चा अर्थ इंदोरचे प्रसिद्ध संत परमपूज्य बाबासाहेब तराणेकर यांनी स्पष्ट केला. पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, एक बुद्धी, एक मन अशा १२ स्तरांवर जो उत्तीर्ण होतो, तोच ‘बारावी पास’ किंवा ‘द्वादशोत्तम राम’.
 
पुणे, मुंबई, बनारस आणि प्रयागराज ते अगदी अमेरिका, लंडन, मॉरिशियस रामायण सेंटर आदी ठिकाणी, त्यांनी रामकथा सादर केली. नेतृत्वाच्या शीर्षस्थानी युवकांनी असायला हवे, हा त्यांचा विचार. म्हणूनच, एखाद-दुसर्‍यांदा कार्यक्रम करायचे असल्यास ते केवळ अशाच संस्थेद्वारे करतात, ज्यांच्या सचिवांचे वय ४५ वर्षांहून कमी आहे! इतकेच नव्हे, दक्षिणेमध्ये त्यांनी केलेल्या व्यसनमुक्तीच्या आवाहानाला उदंड प्रतिसादही लाभला आहे.
 
त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जसे की, ‘बृहन् महाराष्ट्र मंडळा’चा आध्यात्मिक संगीत क्षेत्रातला जीवनगौरव पुरस्कार, श्री श्री रवीशंकर यांच्या संस्थेचा ‘कला सारथी पुरस्कार’, इंदोरचा प्रतिष्ठित ‘गुनिजन अहिल्या सन्मान’, तसेच नवी दिल्लीतील (Mysterious senses of body League) द्वारे त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ने गौरवले गेले. याव्यतिरिक्त त्यांनी मध्य प्रदेशच्या गौरवगाथेवरचा ‘मध्य गुंज नांदी’, ’सर्वात्मका’ हा मराठी साहित्य संगीताचा प्रवास, भा. रा. तांबे यांच्यावर आधारित ‘तांबे गीतरजनी’, ‘भावगीत अभंग’ अशा विविध क्षेत्रात त्यांची मुशाफिरी आहे. लता दीदी, मोहम्मद रफींचा सांगीतिक अविष्कारही ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
 
युवा पिढीवर भाष्य करताना ते म्हणतात की, "आज आपल्या युवकांकडे सगळं काही आहे; मात्र त्यांची हरवल्याचे दिसते. भारत हा तरुणांच्या ऊर्जेचा देश असून, या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळाली पाहिजे. राष्ट्रनिर्माणच्या महान कार्यात, युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणे, आपल्या संस्कृतीचा, विचारांचा समृद्ध वारसा लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे,” असं मतही ते व्यक्त करतात. त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा!
 
९९६७८२६९८३




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर