नक्षलवादाचा पराभव केवळ चकमकी थांबल्याने होत नाही; त्यासाठी हिंसेची मुळेही उपटावी लागतात. म्हणूनच चकमकींच्या पुढचा टप्पा आता सुरू झाला आहे. जंगलात वर्षानुवर्षे लपवून ठेवलेले शस्त्रसाठे आणि रसद शोधून जप्त करण्याच्या मोहिमांनी, विजयाला स्थैर्याची जोड देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
‘देशातून दि. 21 मार्च 2026 पर्यंत माओवाद्यांचे उच्चाटन करण्यात येईल,’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केले होते. त्या घोषणेप्रमाणे देशाच्या विविध भागांमधून माओवाद्यांचे उच्चाटन झाले आहे. माओवाद्यांच्या विरुद्ध केंद्र आणि विविध राज्य सरकारे यांनी हाती घेतलेल्या संयुक्त मोहिमांमुळे, असंख्य माओवादी शरण आले. तसेच या सर्वांच्या जोडीला माओवाद्यांचा एकेकाळी प्रभाव असलेल्या प्रदेशात शासनाने अनेक प्रकारची विकासकामे हाती घेतल्याने, भरकटलेल्या माओवाद्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी शस्त्रे खाली ठेवली. तरीही सुरक्षा दलांनी माओवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्याची आपली मोहीम सुरू ठेवली असून, त्याअंतर्गत छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा आणि कांकेर या भागांत ज्या ठिकाणी शस्त्रे, दारुगोळा, रोकड आणि सोने दडवून ठेवण्यात आले होते; तेथे छापे टाकून ही सर्व सामग्री ताब्यात घेतली आहे. ज्या माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, त्यांच्याकडून जी माहिती पुरविण्यात आली, त्याआधारेच सुरक्षा दलांनी छापे टाकले आणि ही शस्त्रे आणि अन्य संपत्ती जप्त केली. सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे बस्तर भागात जे उरलेसुरले कथित माओवादी आहेत, त्यांचेही कंबरडे पार मोडले आहे.
सुरक्षा दलांनी छत्तीसगढच्या भागात विविध ठिकाणी जे छापे टाकले, त्यामध्ये सुरक्षा दलांना माओवाद्यांनी दडवून ठेवलेली अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सोने, रोकड आणि अन्य बराच मुद्देमाल मिळाला. या कारवाईमुळे दक्षिण बस्तर भागात नक्षलवाद्यांचे ते जाळे एकेकाळी कार्यरत होते, त्यास मोठाच हादरा बसला आहे. दंतेवाडा आणि कांकेर जिल्ह्यांत पोलिसांनी ही कारवाई केली. दंतेवाडा जिल्ह्यातील बसरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तोडमा गावाच्या परिसरातील घनदाट जंगलामधून, सुरक्षारक्षकांनी ही सामग्री जप्त केली. शरण आलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जंगलांमध्ये कुठे-कुठे शत्रे, दारुगोळा आणि अन्य सामग्री दडवून ठेवली आहे, त्याची माहिती या शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी दिली. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. जी सामग्री ताब्यात घेण्यात आली, त्यामध्ये 16 लाख मूल्याचे सोने, दोन लाखांची रोकड हाती लागली. या धनाचा उपयोग माओवादी आपल्या कारवाया करण्यासाठी करीत असत. अत्याधुनिक शस्त्रांच्या जोडीला पोलिसांना काही गावठी शस्त्रेही मिळाली. आपला संघर्ष प्रदीर्घ काळ चालविता यावा, यासाठी माओवाद्यांनी ही सर्व बेगमी केली होती. पोलिसांना ‘आयईडी’ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे बरेच साहित्य मिळाले. जिलेटीनच्या कांड्या, 20 डिटोनेटर, 14 प्रेशर कुकर पोलिसांच्या हाती लागले. याच्या जोडीला माओवाद्यांचे गणवेश, प्रचार साहित्य, पत्रके हे सर्व साहित्यही हाती लागले. शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली. हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादी, नक्षलवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी चांगले सहकार्य करीत असल्याने, हे शक्य झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कांकेर-नारायणपूर सीमाभागात केलेल्या कारवाईत जमिनीखाली दडवून ठेवलेले साहित्य, स्फोटके, शस्त्रे ताब्यात घेण्यात आली. ग्रामीण भागातून माओवाद जवळजवळ संपुष्टात आला आहे. आता ‘अर्बन नक्षलवाद्यां’चा बीमोड करणे बाकी आहे. त्यांचा बीमोड करणे सरकारला आणि देशप्रेमी जनतेला अशक्य नाही.
मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा
प. बंगाल सरकारचा आदेश प. बंगाल सरकारने राज्यातील 12 जिल्ह्यांत असलेल्या विनाअनुदानित, मान्यता नसलेल्या मदरशांसह ‘खारिजी’ मदरशांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व मदरशांचे कामकाज कसे चालते, त्यांना निधी कोठून मिळतो, मदरशांमध्ये विद्यार्थी कल्याणाच्या कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतात, अशा सर्व मुद्द्यांबाबत प. बंगाल सरकारकडून चौकशी करण्यात येणार आहे. प. बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण विभाग यांनी, यासंदर्भातील आपला आदेश गेल्या दि. 8 जुलै रोजी जारी केला. अशा सर्व मदरशांची कसून तपासणी केली जाणार आहे. यासाठी मदरसा शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी, अन्य शासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांची जिल्हानिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या औपचारिक शिक्षण चौकटीच्या बाहेर राहून कार्य करणाऱ्या आणि ज्यांच्यावर कसलाच अंकुश नाही, अशा संस्थांचे यानिमित्ताने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अशा शिक्षण संस्थांची पायाभूत रचना, विद्यार्थी कल्याण, शिक्षण देण्याची यंत्रणा आणि संबंधित संस्थेचे व्यवस्थापनासंदर्भात हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या मोहिमेमध्ये व्यापक भौगोलिक क्षेत्र, तसेच ज्या भागात मदरशांची संख्या अधिक आहे, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. कूच बिहार, उत्तर दिनाजपूर, माल्दा, मुर्शिदाबाद, बीरभूम, पश्चिमी मेदिनीपूर, पूर्व मेदिनीपूर, नादिया, हुगळी, हावडा, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यांमधून हे सर्वेक्षण होणार आहे.
या सर्वेक्षणात ‘खारिजी’ मदरशांचा समावेश आहे. ‘खारिजी’ मदरसे हे खासगी व्यक्ती, धार्मिक संघटना, न्यास किंवा स्थानिक समाजाकडून चालविण्यात येतात. अशांना शासकीय आर्थिक मदत मिळत नाही. ते स्वतंत्रपणे कार्य करतात. सरकारने हा आदेश काढल्यानंतर, साहजिकच त्याची राजकीय प्रतिक्रिया उमटली. भारतीय जनता पक्षाने सरकारच्या या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. ‘मान्यता नसलेल्या अशा संस्थांची कसून तपासणी केली पाहिजे,’ असेही भाजपने म्हटले. घटनात्मक मूल्ये आणि शैक्षणिक निकष पाळून अशा संस्था चालविल्या जातात का? हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे भाजपने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. अशा काही मदरशांमध्ये अतिरेकी कारवाया चालत असल्याबद्दल, माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनीही चिंता व्यक्त केली होती, याकडे केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी लक्ष वेधले. या संस्थांमधील अभ्यासक्रमाबद्दल भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनीही चिंता व्यक्त केली. प. बंगाल सरकारने हा जो निर्णय घेतला आहे; यामुळे धर्मांधतेचे, फुटीरतेचे शिक्षण देणाऱ्या मदरशांना निश्चितच चाप लावला जाईल.
हिंदुद्वेष्टे नायकर यांचा
पुतळा हटविण्याची मागणी ‘हिंदू तामिझार काटची’ या संघटनेचे संस्थापक रामा रविकुमार यांनी, तीरुवैयारुलगत असलेल्या कांदियुर येथील ब्रह्मा सिरा कान्दिश्वरार मंदिराच्या लगत हिंदुद्वेष्टे नेते ए. व्ही . रामस्वामी नायकर यांचा जो पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आला आहे, तो तेथून हलविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. संबंधित खात्याची कोणतीही अनुमती न घेता हा पुतळा उभारण्यात आला असल्याचे, माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. हा पुतळा तेथून न हलविल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही रामा रविकुमार यांनी दिला आहे. ज्या मंदिरालगत हा पुतळा उभारण्यात आला आहे, ते एक प्राचीन असे भगवान शिवाचे मंदिर आहे. सातव्या शतकातील हे मंदिर आहे. रामस्वामी नायकर यांचा पुतळा उभारल्याचे लक्षात आल्यावर, आपण माहितीच्या अधिकारात अर्ज केला. ‘हा पुतळा उभारण्यासाठी शासनाच्या संबंधित खात्याकडून कोणतीही अनुमती घेण्यात आली नव्हती, असे उत्तर आपणास मिळाले,’ असे, रामा रविकुमार यांनी सांगितले. ‘हे मंदिर एक हजार वर्षांपेक्षा प्राचीन असून, दि. 4 सप्टेंबर 2025 या दिवशी मंदिरात कुंभाभिषेकही करण्यात आला होता, अशीही माहिती देण्यात आली,’ असे रविकुमार म्हणाले.
बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला हा पुतळा हलविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या मंदिरास हजारो भाविक भेट देतात. हा पुतळा आणि त्याखाली लिहिलेल्या ओळी या अत्यंत आक्षेपार्ह असल्याकडेही रविकुमार यांनी लक्ष वेधले. हिंदुद्वेष्टे रामस्वामी नायकर यांनी तामिळनाडूमधील सालेम या शहरात, हिंदू देव-देवतांच्या गळ्यात चपलांचे हार घालून मिरवणूक काढली होती. यावरून देशात संतापाची लाटही उसळली होती, हे हिंदू समाज विसरलेला नाही. त्याच रामस्वामी नायकर यांचा पुतळा हिंदू मंदिराच्या जवळ का आणि कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून उभारण्यात आला? हा पुतळा त्या ठिकाणावरून हलविलाच पाहिजे.
9869020732