खेळ खेळू चला...

    14-Jul-2026   

एकीकडे मैदानी खेळांऐवजी मुलांचे ‌‘स्क्रीन‌’मध्येच रममाण होणे चिंताजनक ठरत असतानाच, दुसरीकडे डिजिटल कंटेंटमुळे भारतात खेळण्यांची मागणी वाढल्याचा अहवाल नुकताच ‌‘मॅटेल‌’ या जगप्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनीने जाहीर केला. त्यानिमित्ताने भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेचे हे आकलन...

टीव्हीवर अथवा ‌‘युट्यूब‌’वर एखादे कार्टून बघितल्यानंतर किंवा मोबाईलवर एखादा गेम खेळल्यानंतर साहजिकच लहान मुलांना त्या काल्पनिक पात्रांविषयी एकप्रकारचे आकर्षण निर्माण होते. परिणामी, दुकानांमध्ये, मॉलमध्ये त्याच कार्टूनचे एखादे खेळणे दिसले रे दिसले की, मुलांनी त्यासाठी भोकाड पसरलेच म्हणून समजा. ज्या पात्राशी मोबाईलच्या स्क्रीनवर आपण खेळतो, त्याच्या संवादांवर खळखळून हसतो, तो दु:खी झाला की सहानुभूती दर्शवितो, तेच पात्र प्रत्यक्ष खेळण्याच्या स्वरूपात समोर आले की, त्याच्या खरेदीसाठी मुलांचा पालकांकडे लडिवाळ हट्ट सुरू होतो. हा अनुभव भारतातल्याच नाही, तर अगदी जगभरातील पालकांचाच. पण, ‌‘मॅटेल‌’ या जगप्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनीने याच खरेदीच्या पॅटर्नवरून नुकताच एक निष्कर्ष काढला. तो असा की, डिजिटल कंटेंटमुळे भारतात प्रत्यक्ष खेळण्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

मुळात आजच्या काळात मुले मैदानी खेळांपेक्षा मोबाईलमध्येच सर्वाधिक काळ डोके खुपसून असतात, ही पालकांची घरोघरी तक्रार. त्यामुळे आपसूकच हातातील खेळण्यांची जागा ही मोबाईलच्या गेम्सने घेतली. खरेतर मुलांच्या या डिजिटल खेळांच्या व्यसनाचा विपरीत परिणाम खेळण्यांच्या बाजारपेठेवर दिसायला हवा. परंतु, ‌‘मॅटेल‌’च्या अहवालानुसार, भारतात याउलट परिस्थिती निदर्शनास आली. अशा डिजिटल गेमिंग कंटेंटमुळे खेळण्यांची मागणी घटण्यापेक्षा, हा कंटेट चक्क खेळण्यांची मागणी वाढवणारा ठरला. डिजिटली दिसणारी ही पात्रे, त्यांच्या कथा यांनी मुलांच्या दैनंदिन जीवनातील खेळण्यांची जागा हळूहळू बळकावलेली दिसते. म्हणजेच, जे कार्टून स्क्रीनवर दिसते, त्याचेच प्रत्यक्ष खेळणेसुद्धा माझ्या हातात हवे, असा हा प्रकार. मग असे पूर्वी होत नव्हते का? तर होतच होते की. अगदी ‌‘ही-मॅन‌’, ‌‘निंजा टर्टल्स‌’, ‌‘पोकीमॉन्स‌’ अशी कित्येक उदाहरणे देता येतील. म्हणजेच काय, तर पूर्वी टीव्हीवरील कार्टून असो वा चित्रपटातील प्रसिद्धीस पावलेले कार्टूनची पात्रं, त्यांचे रूपांतरही नंतर प्रत्यक्ष खेळण्यांमध्ये व्हायचे. आता फक्त टीव्ही आणि चित्रपटांची जागा डिजिटल कंटेंटने घेतली एवढेच. नुसती जागाच घेतली नाही, तर खेळण्यांची बाजारपेठ विस्तारण्यातही याच डिजिटल कंटेंटने मोठा हातभार लावल्याचे ‌‘मॅटेल‌’चा अहवाल सांगतो. या परिवर्तनामुळे कंपनीलाही आपल्या व्यवसाय प्रारूपात बदल करण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यानुसार, आता ‌‘मॅटेल‌’ ही कंपनीसुद्धा पारंपरिक खेळणी उत्पादकाकडून ‌‘बौद्धिक-संपदा‌’ (Intellectual Property) आणि ‌‘मनोरंजन‌’ यांवर केंद्रित असलेल्या ब्रॅण्डकडे वाटचाल करताना दिसते.

‌‘मॅटेल‌’ने आपल्या खेळण्यांच्या बाजारपेठेसंबंधीच्या अहवालात आणखीन एक मांडलेले निरीक्षणही तितकेच महत्त्वाचे. तसे बघायला गेले, तर खेळण्यांशी खेळण्याचे वय हे अगदी तीन महिन्यांपासून ते 12 वर्षांपर्यंत मानले जाते. पण, ‌‘मॅटेल‌’च्या अहवालानुसार, वयवर्षे 12 उलटल्यानंतरही कित्येक किशोरवयीन मुले त्यांच्या आठवणींचे जतन करण्यासाठी, ‌‘कलेक्शन‌’ म्हणून संग्राह्य ठेवण्यासाठीही खेळणी खरेदी करतात. जागतिक खेळण्यांच्या बाजारपेठेत अशा किशोरवयीन ग्राहकांचे प्रमाण हे 27 टक्के इतके असून, दरवर्षी हेच प्रमाण 12 ते 13 टक्क्यांनी वाढत असल्याचा अंदाजही ‌‘मॅटेल‌’ने वर्तविला आहे. म्हणजे एकूणच काय, तर लहान असो अथवा किशोरवयीन मुले, त्यांच्या खरेदीमुळे खेळण्यांच्या बाजारपेठेला सुगीचे दिवस आलेले दिसतात.

यानिमित्ताने खेळण्यांच्या भारतातील वाढत्या मागणीमागील ठोस कारणेही समजून घ्यायला हवीत. पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, तरुणांची वाढती लोकसंख्या. त्यामुळे साहजिकच लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील प्रथम क्रमांकाच्या आपल्या देशात खेळण्यांच्या विक्रीचाही आलेख चढता आहे. त्याचबरोबर पालकांची वाढलेली क्रयशक्ती, घरबसल्या एका क्लिकवर खेळणी ऑर्डर करण्याची उपलब्ध झालेली सोय, मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊ शकतील अशी शैक्षणिक खेळणी; परवानाप्राप्त, तसेच पारंपरिक खेळण्यांना मिळणारी पसंती, ही खेळण्यांच्या वाढत्या मागणीमागील काही ठळक कारणे. हे झाले आताचे चित्र.

परंतु, काही वर्षांपूर्वी भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेत चिनी बनावटीच्या खेळण्यांचाच सुळसुळाट होता. अगदी मॉल, दुकाने ते रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या खेळण्यांपर्यंत चिनी खेळण्यांची एकच चलती. परंतु, गेल्या काही वर्षांत भारतीय खेळण्यांची आयात घटून, निर्यात कमालीचे वाढल्याचे दिसते. 2017-18 मध्ये खेळण्यांची एकूण निर्यात 152.7 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. 2025-26 मध्ये ती वाढून 384.7 दशलक्ष डॉलर्स झाली, जी 151.9 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दर्शवते. इलेक्ट्रॉनिक आणि नॉन-इलेक्ट्रॉनिक खेळण्यांच्या बाबतीत सर्वाधिक वाढ दिसून आली. कारण, याच कालावधीत त्यांची निर्यात 77.35 दशलक्ष डॉलर्सवरून 200.89 दशलक्ष डॉलर्सपर्यंत, म्हणजेच जवळपास 160 टक्क्यांनी वाढली. या निर्यातवाढीची प्रमुख कारणे म्हणजे, पूर्वीच्या सरकारांनी दुर्लक्षित केलेल्या या क्षेत्राकडे मोदी सरकारने दिलेले विशेष लक्ष.

यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास, National Action Plan for Toys (NAPT), 2020, ‌‘टॉय बीझ‌’ नावाचे आंतरराष्ट्रीय ‌‘बी टू बी‌’ प्रदर्शन, ‌‘आत्मनिर्भर भारता‌’च्या धोरणाला चालणारे ‌‘टॉयकेथॉन‌’, ‌‘ई-टॉईस लॅब‌’, ‌‘मानकमंथन‌’ नावाचे मानांकन, ‌‘एक जिल्हा-एक उत्पादन‌’सारखी योजना, खेळण्यांना ‌‘जीआय‌’ टॅग, खेळण्यांवर 12 टक्क्यांवरून पाच टक्के इतका कमी केलेला ‌‘जीएसटी‌’, विविध देशांसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांतर्गत भारतीय खेळण्यांची परदेशी बाजारपेठेत सुकर केलेली निर्यात, खेळण्यांच्या निर्यातीच्या दृष्टीने जिल्ह्यांचा विकास करणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. त्यामुळे 2034 पर्यंत खेळण्यांची भारतीय बाजारपेठ ही तब्बल पाच अब्ज डॉलर्सपर्यंत भरारी घेण्याचा अंदाज वर्तविला जातो.

खरेतर भारतीय खेळण्यांना तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास-वारसा लाभलेला. पण, हे क्षेत्र तरीही बहुतांशी असंघटितच. आजघडीला खेळण्यांच्या उत्पादनात चार हजार ‌‘एमएसएमई‌’चा समावेश असला, तरी अजूनही या क्षेत्रात विस्ताराच्या, विकासाच्या संधी उद्योजकांना खुणावत आहेत. मग ग्राहक म्हणून तुमची-आमची जबाबदारी काय? तर, आपणही स्वदेशीचा पुरस्कार करून भारतीय खेळण्यांच्या या बाजारपेठेला, कामगारांच्या हाताला अधिक बळकट करुया आणि भारतीयत्वाची हीच समृद्ध भावना पुढील पिढीतही रुजवूया!





विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर