मानसिक आणि भावनिक आवेगांबरोबरच शारीरिक आवेगही तितकेच घातक. तेव्हा आजच्या भागात परपीडा, स्त्रीभोग, अस्तेय आणि हिंसा या शारीरिक धारणीय वेगांमुळे होणारे नुकसान आणि त्याबाबत घ्यायची खबरदारी यांची माहिती जाणून घेऊया.
धारणीय वेगांमध्ये मानस आवेग (mental urges) प्रामुख्याने येतात, हे आपण आधीच्या लेखांतून वाचले. ज्या आवेगांना रोकावे, थांबविणे गरजेचे आहे, त्यात मानसिक-भावनिक आवेगांबरोबरच काही वाचिक आवेग (verbal urges) आणि शारीरिक आवेग (physical urges)ही आहेत. हे वेळीच थांबविल्यास त्या व्यक्तीला त्रास, नुकसान होत नाही किंवा झाल्यास कमीत कमी होते. मानस आणि वाचिक वेगांबद्दल आपण आधीच्या लेखांमधून वाचले. आज शारीरिक वेग ज्यांचे धारण करणे गरजेचे आहे, त्यांबद्दल बघूया. हे आवेग (urges) वेळीच थांबविणे गरजेचे आहे; कारण ते अशक्त आहेत (inauspicious). हे वाचिक आणि शारीरिक धारणीय वेगसुद्धा मानसिक वेगांमधूनच उत्पन्न होतात. म्हणजे, त्यांचे मूळ स्थान (origin) मनातच उत्पन्न होते. मनात इच्छा प्रकट होते आणि त्याचा उद्रेक वाचिक किंवा शारीरिक क्रियेतून होतो. प्रतिक्रिया प्रकट होतात. शारीरिक धारणीय वेग खालीलप्रमाणे आहेत. परपीडा, स्त्रीभोग, अस्तेय आणि हिंसा. या वेगांबद्दल आज जाणून घेऊया.
‘परपीडा’ म्हणजे इतरांना पीडा किंवा यातना होतील, अशा क्रिया करणे. (शारीरिक कर्मे मुख्यत्वे करून यात येतात.) मारणे, भांडण-तंटा शारीरिक इजा यात प्रामुख्याने गणले जातात. परपीडा यामध्ये वाचिक आणि मानसिक आघात यांचादेखील समावेश होतो. इतरांना हाणून-पाडून बोलणे, टोमणे मारणे, इतरांचे नुकसान होईल, अशी वक्तव्ये किंवा कृती करणे, आर्थिक नुकसान होईल, अशी वचने किंवा कृती करणे. कारण, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि एकूणच शारीरिक स्वास्थ्यावरही होतो.
दुसरे शारीरिक धारणीय वेग म्हणजे परस्त्रीशी संभोग, शारीरिक संबंध प्रस्थापित करणे. एका नात्यात बांधलेले असताना इतर व्यक्ती (स्त्री वा पुरुष)ला नात्यात आणणेही चुकीचे आहे. शारीरिक संबंध, तसेच नात्यांमध्ये अधिक प्राधान्य देणे, असे केल्यास पहिल्या नात्यात कटुता येते, त्या नात्याचा पाया हलतो, नाते नाजूक होते. तसेच वारंवार शारीरिक संपर्क वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर प्रस्थापित केल्याने विविध शारीरिक आजार संक्रमित होऊ शकतात. त्याचबरोबर विषयासक्ती निर्माण झाल्याने अन्य कामांमधील क्रियाशीलता, कुशलता यावरही परिणाम होतो.
यापुढील शारीरिक धारणीय वेग म्हणजे अस्तेय. याचा अर्थ चोरी करणे, हा आहे. धन-संपत्ती याची चोरी, वडिलोपार्जित मालमत्तेची चोरी (हिस्सा न देणे), बौद्धिक संपदेची चोरी इ. जे आपले नाही, त्यावर लालसा ठेवणे, त्यावर डोळा असणे याने फक्त ऐहिक-आर्थिक सुखाची हाव वाढते. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक उपभोगांची लालसा निर्माण होते. याने हव्यास, अनैसर्गिक इच्छा (UNNATURAL DESIRES) वाढीस लागते.
अजून एक शारीरिक धारणीय वेग म्हणजे हिंसा. हिंसा केवळ मनुष्य प्राण्यावर नव्हे, तर जगातील इतर जाती-प्रजातींवर केली जाते. गरजेपेक्षा अधिक प्राण्यांचा बळी Letsure hunting प्राण्यांच्या विविध अंग-अवयवांसाठी त्यांचा बळी देणे (साप, हस्तीदंत, ऑयस्टर्स इ.) जगात केवळ मनुष्यप्राणी हा एकच प्राणी आहे, जो स्वतःच्या अय्याशीसाठी इतरांचा नाहक बळी घेतो. पैसा मिळविणे, असुरी आनंद मिळवणे, अशी विविध कारणे त्यामागे दडलेली असतात.
शारीरिक कुकर्म, जी वर वर्णिलेली आहेत, त्या कृती करण्यापूव, त्यांची इच्छा, त्यांचा विचार मनात उत्पन्न होतो. या कृती करायची की नाही, हे मनोनिग्रहावर ठरते. या शारीरिक कृती नेहमीच दृश्य स्वरूपाच्या असतात, असे नाही किंवा दर वेळेस स्वतःच त्यावर कृतिशील होतात, असेही नाही. कृती करण्यापूर्वी मनाला पटले की कृती केली जाते. मनाला पटले, त्या गोष्टीसाठी वळविले की ज्ञानेन्द्रिय, कर्मेन्द्रिय आणि शरीर कृतिशील होते.
हे सगळे (मानसिक-वाचिक-कायिक i.e शारीरिक) आवेग म्हणजे vices आहेत. व्यसनासारखे Addictive आहेत. त्यांची सवय लागते आणि चुकीच्या गोष्टीदेखील बरोबर वाटू लागतात. या चुकीच्या गोष्टींमुळे मानसिक, भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते, बिघडते आणि केवळ लाक्षणिक चिकित्सा (synptomatic treatment) करून पुरेसे होत नाही, भागत नाही. मनाचे सामर्थ्य खूप मोठे आहे. शारीरिक व मानसिक कष्टदेखील सहन करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न-भिन्न असते. उदा. वेदना सहन करण्याची क्षमता (Pain Threshold) काहींना साधी दाढ दुखली, तरी त्याची वेदना सहन होत नाही आणि काहींना भूलही न देता टाके घालून घेणे शक्य होते.
मनाचा गुण हा सत्त्व/सात्त्विक गुण आहे. शुद्धता, स्थिरता, शांतता, समतोलता यांचे ते प्रतीक आहे. सात्त्विक गुण हा सकारात्मतेचे प्रतीक आहे. BALANCED & PEACEFUL MIND आनंदी आणि संयमशील राहणे हे सगळ्यांत महत्त्वाचे आहे. मन चटकन विचलित झाले, तर सदसद्विवेक बुद्धीचा वापर करता येत नाही आणि प्रज्ञापराध (प्रज्ञेचा, बुद्धीचा अपराध) निर्माण होतो. याने ती व्यक्ती चुकीचा निर्णय घेते आणि कृती करते, ज्याने स्वतःचे आणि इतरांचे नुकसान होते.
मनाच्या आवेगांमुळे वाचिक आणि कायिक धारणीय वेगही उत्पन्न होतात आणि त्यांना रोखण्यासाठी मनोनिग्रह महत्त्वाचा आहे. मनोनिग्रहाबद्दल वाचण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. मनाचे सामर्थ्य खूप आहे. मनाची शक्ती बरेचदा सुप्त असते आणि त्याची क्षमता आपल्याला माहीतच नसते. रुग्णचिकित्सा करतेवेळी मनाच्या या क्षमतेचाही विचार करावा लागतो. आयुर्वेदात याला ‘सत्त्व’ म्हणजे मनाच्या ताकदीची परीक्षा म्हणतात. सत्त्व (मनाची ताकद) तीन प्रकारची आहे. हीन सत्त्व, मध्यम सत्त्व आणि प्रवर सत्त्व. ही सत्त्व म्हणजे, कमी दर्जाची मनाची ताकद. यालाच बोलीभाषेत ’Weak at Heart' म्हणतात. उदा. रक्त बघून चक्कर येणे, मृत्यूबद्दल किंवा कुठल्याही अपघाताबद्दल ऐकून, बघून बिथरून जाणे. काळोखाला घाबरणे, भांडण-तंटा सहन न होणे, Pain Threshold कमी असणे, काहीतरी वाईटच होईल, अशी अनामिक भीती मनात सतत घर करून राहणे इ. साधं डोकं दुखत असलं, तरी ‘गुगल’वर शोधून करून ट्युमर असू शकतो, एवढ्या टोकाचे Self Diagnosis अशी मंडळी करतात.
मध्यम सत्त्व असलेली व्यक्ती लगेच हायपर होत नाही. कुठलीही वाईट बातमी ऐकली, तर लगेच डगमगून जात नाही. इतरांचे दुःख किंवा अडीअडचणींना मदतीला जाऊ शकतात. त्यांचे दुःख बघून हवालदिल न होता, दिलासा देऊ शकतात. रुग्णावस्थेत असतेवेळीदेखील डॉक्टरने सांगितलेले ऐकून, त्यावर विश्वास ठेवून राईचा डोंगर न करता राहता येते.
प्रवर सत्त्वची व्यक्ती खूप Strong Minded असते. थोडी वेदना, आजार असताना लगेच औषधोपचारासाठी न जाता, थोडी विश्रांती करून बरे न वाटल्यास नंतरच वैद्यांकडे जातात. बरेचदा स्वतःची दुखणी विसरून इतरांना मदत करतात. सहनशक्तीदेखील उत्तम असते. Strong willed असल्यामुळे विविध अडीअडचणींवर मात करणे त्यांना शक्य असते. अशा पद्धतीने सत्त्व परीक्षण करून मग रुग्णाची संपूर्ण चिकित्सा केल्यास चिकित्सा लवकर फलदायी ठरते. (क्रमशः)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
[email protected]