बाललैंगिक अत्याचाराविषयीच्या चर्चेत आपण अनेकदा गुन्हेगार, कायदे, शिक्षा, पालकांची भूमिका किंवा मुलांनी घ्यावयाची काळजी यांवर भर देतो. परंतु, या सर्वांपेक्षाही मोठा प्रश्न असा आहे की, असा समाज आपण कसा घडवू, जिथे मुलांची सुरक्षितता ही केवळ काही व्यक्तींची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी मानली जाईल?
जेव्हा घर, शाळा, शेजार, माध्यमे, धार्मिक संस्था, तंत्रज्ञान कंपन्या आणि शासन या सर्वांची विचारसरणी मुलांच्या सर्वोत्तम हिताभोवती उभी राहते, तेव्हाच बालसुरक्षेची खरी संस्कृती निर्माण होते. ही संस्कृती घडवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत; त्यासाठी संवाद, संवेदनशीलता, शिक्षण आणि सामूहिक जबाबदारी या चार स्तंभांवर समाज उभा राहणे आवश्यक आहे.
बालसुरक्षा समाजाच्या संस्कृतीत रुजली पाहिजे. ज्या समाजात मुलांचा सन्मान केला जातो, त्यांच्या भावना गांभीर्याने ऐकल्या जातात, त्यांच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर केला जातो आणि त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, तिथेच खऱ्या अर्थाने बालसुरक्षेची संस्कृती निर्माण होते. अशी संस्कृती एका दिवसात तयार होत नाही. ती घरातील संस्कार, शाळेतील शिक्षण, समाजातील मूल्यव्यवस्था, जबाबदार माध्यमे, संवेदनशील संस्था आणि मुलांवर विश्वास ठेवणारे प्रौढ यांच्या सामूहिक प्रयत्नांतून घडते.
जेव्हा एखाद्या मुलाला न घाबरता प्रश्न विचारण्याची मोकळीक असते, ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार असतो, अस्वस्थ वाटल्यास मदत मागण्याचा आत्मविश्वास असतो आणि त्याचे म्हणणे विश्वासाने ऐकले जाईल, याची खात्री असते, तेव्हाच बालसुरक्षेची संस्कृती खऱ्या अर्थाने आकार घेऊ लागते. लैंगिकतेभोवतीचे मौन तोडल्याशिवाय बालसुरक्षेची संस्कृती निर्माण होणार नाही.
भारतीय समाजात लैंगिकता, शरीर आणि वैयक्तिक मर्यादा यांसारख्या विषयांवर आजही मोकळेपणाने बोलण्यास संकोच वाटतो. ‘मुलं अजून लहान आहेत, हे विषय बोलायचे नसतात किंवा यामुळे निरागसपण हरवेल,’ अशा समजुतींमुळे मौन पाळले जाते. परंतु, हे मौन मुलांचे नव्हे, तर गुन्हेगारांचे संरक्षण करते. बालसुरक्षेची संस्कृती घडवायची असेल, तर घरात, शाळेत आणि समाजात या विषयांभोवतीचे मौन मोडावे लागेल; ज्ञान मुलांचे संरक्षण करते.
मुलांना शरीराची सुरक्षितता, वैयक्तिक मर्यादा, संमती आणि मदत कधी व कुणाकडे मागावी, याची वयानुरूप माहिती नसेल, तर त्यांना अयोग्य स्पर्श, ग्रूमिंग किंवा शोषण ओळखणे कठीण जाते. अनेकदा त्यांच्याकडे घडलेली घटना सांगण्यासाठी आवश्यक शब्दही नसतात.
लैंगिक शिक्षण म्हणजे लैंगिकतेची माहिती अकाली नव्हे; तर वयानुरूप शरीराची सुरक्षितता, परस्पर आदर, वैयक्तिक मर्यादा आणि सुरक्षित वर्तनाचे शिक्षण होय. हे मुलांचे निरागसपण हिरावून घेत नाही; उलट ते जपण्याचे सर्वांत प्रभावी साधन ठरते.
बालसुरक्षा : प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी
मुलांवरील अत्याचार अनेकदा बंद दरवाज्यांआड घडतात; परंतु त्याचे संकेत समाजालाही दिसू शकतात. एखादे मूल सतत घाबरलेले, एकाकी किंवा अस्वस्थ दिसत असेल, तर हा आमचा विषय नाही, असे म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रत्येक मुलाचे सुरक्षित बालपण घडवण्यासाठी संपूर्ण समाजाची सजगता आणि सहभाग आवश्यक आहे. डॉक्टरांनी अत्याचाराची लक्षणे ओळखणे, शिक्षकांनी मुलांच्या वर्तनातील बदल लक्षात घेणे, पोलिसांनी संवेदनशीलतेने प्रतिसाद देणे, माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन करणे आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी ऑनलाईन सुरक्षितता मजबूत करणे, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
बालसुरक्षेची संस्कृती तेव्हाच निर्माण होते, जेव्हा प्रत्येक प्रौढ स्वतःला एक प्रश्न विचारतो, “या मुलाच्या सुरक्षिततेसाठी माझी काही जबाबदारी आहे का?” या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर समाजातील प्रत्येक नागरिक बालसंरक्षणाचा भाग बनू शकतो.
आज ‘हे माझे मूल नाही’ हा विचार बदलून; ‘हे आपल्या समाजाचे मूल आहे’ हा दृष्टिकोन स्वीकारण्याची वेळ आली आहे. कारण, प्रत्येक मुलाचे सुरक्षित बालपण ही संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी आहे.
बालसुरक्षा ही प्रत्येक निर्णयाचा भाग झाली पाहिजे
बालसुरक्षा ही केवळ पालकांच्या दक्षतेवर अवलंबून राहू नये; ती प्रत्येक संस्थेच्या, प्रत्येक धोरणाच्या आणि प्रत्येक सामाजिक निर्णयाच्या केंद्रस्थानी असली पाहिजे. शाळेतील उपक्रम असो, क्रीडा शिबिरे असोत, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असोत, वसतिगृहे असोत किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स, जिथे जिथे मुले आहेत, तिथे तिथे त्यांच्या सुरक्षिततेचा विचार हा पहिला निकष असला पाहिजे.
बालसुरक्षा ही एखादी स्वतंत्र योजना नसून प्रत्येक संस्थेच्या कार्यसंस्कृतीचा भाग झाली, तरच अत्याचार रोखण्याची खरी क्षमता निर्माण होईल.
शून्य सहनशीलतेची (Zero Tolerance) संस्कृती
बालकांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचार, छळवणूक किंवा शोषणाबाबत समाजाने स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली पाहिजे. हे घरगुती प्रकरण आहे, बाहेर बदनामी होईल, मुलांचे भविष्य बिघडेल, अशा कारणांमुळे अत्याचार दडपून टाकण्याची प्रवृत्ती संपली पाहिजे. कोणतीही तडजोड, कोणतेही मौन किंवा कोणतेही समर्थन हे गुन्हेगारांचे धैर्य वाढवते. बालसुरक्षेच्या संस्कृतीचा पाया म्हणजे, मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही.
धोरणे आणि कार्यपद्धतींनी बालसुरक्षेच्या संस्कृतीला बळ द्या
तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये बालसुरक्षेबाबत जी संस्कृती निर्माण करत आहात, ती केवळ शब्दांमध्ये नव्हे, तर तुमच्या धोरणांमध्ये आणि दैनंदिन कामकाजातही दिसली पाहिजे. प्रत्येक संस्थेकडे स्पष्ट बालसुरक्षा धोरण (Child Safety Policy) आणि आचारसंहिता (Code of Conduct) असणे आवश्यक आहे. धोरण संस्थेची भूमिका आणि बालसुरक्षेबाबतची बांधिलकी स्पष्ट करते, तर आचारसंहिता मुलांशी संबंधित काम करताना कर्मचारी, पदाधिकारी, पालक, विश्वस्त आणि इतर संबंधित व्यक्तींनी कोणते वर्तन करावे आणि कोणते वर्तन स्वीकारले जाणार नाही, हे स्पष्ट करते.
पण फक्त धोरणे तयार केली, म्हणजे बालसुरक्षा आपोआप निर्माण होत नाही. कागदावर लिहिलेले आणि प्रत्यक्षात केलेले यामध्ये सुसंगती असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक चौकशींमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्थांकडे चांगली धोरणे होती; पण प्रत्यक्ष कामकाजात त्यांचे पालन होत नव्हते. एक बोलणे आणि दुसरेच करणे यामुळे संस्थेवरील विश्वास कमी होतो आणि मुलांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होतो.
बालसुरक्षेची बांधिलकी समाजासमोर स्पष्ट करा
मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध आहोत, हा संदेश समाजापर्यंत पोहोचू द्या. त्यामुळे पालक आणि समाजाचा संस्थेवर विश्वास वाढतो. त्याचबरोबर मुलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने संस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही स्पष्ट इशारा मिळतो की, येथे बालसुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
संस्थेची बालसुरक्षा धोरणे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि इतर आवश्यक कार्यपद्धती संकेतस्थळावर किंवा इतर माध्यमांतून सर्वांसाठी सहज उपलब्ध करून द्याव्यात.
बालसुरक्षेच्या संस्कृतीचे नियमित पुनरावलोकन करा
बालसुरक्षेची संस्कृती ही एकदाच उभी करून विसरून जाण्याची गोष्ट नाही. ती सातत्याने तपासावी, सुधारावी आणि अधिक सक्षम करावी लागते. यासाठी नियमित सर्वेक्षण, अभिप्राय, मुलाखती आणि इतर पुनरावलोकनाच्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे.
कोणतीही संस्था जशी आपल्या कामाचा दर्जा सातत्याने सुधारत असते, त्याचप्रमाणे बालसुरक्षेच्या उपाययोजनांचाही वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. ‘नियोजन - अंमलबजावणी- पडताळणी-सुधारणा’ (Plan-Do-Check-Act) या तत्त्वानुसार सातत्याने सुधारणा केल्यासच बालसुरक्षेची संस्कृती प्रभावी, विश्वासार्ह आणि जिवंत राहू शकते.