संविधान जनजागृती, सामाजिक न्याय आणि कायदेविषयक मार्गदर्शन यांची प्रभावी सांगड घालत वंचित समाजघटकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ॲड. प्रबोधन वाल्मीक निकाळजे यांच्याविषयी...
समाजातील अन्यायाची नोंद घेताना त्यावर संविधानाच्या चौकटीत उपाय शोधणे अधिक महत्त्वाचे आहे, या विचाराने वाटचाल करणारे ॲड. प्रबोधन निकाळजे. वकिली व्यवसायासोबत संविधान जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी विविध स्तरांवर सातत्याने कार्य केले.
आष्टी (जि. बीड) येथील सामाजिक वातावरणात त्यांचे बालपण घडले. वडील ॲड. वाल्मीक निकाळजे हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ सामाजिक समता, संविधान जनजागृती आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. आई फुलावती यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत या वाटचालीला आधार दिला. पत्नी साक्षी या अभियंता असून, संवेदना आणि आकांक्षा या दोन्ही बहिणींसह चुलते बौद्धाचार्य वामनराव निकाळजे यांच्याकडून बौद्ध धम्माचे संस्कार बालपणापासूनच मिळाले असून, कुटुंबाचा पाठिंबा त्यांच्या सामाजिक कार्यामागे कायम राहिला. घरातून मिळालेल्या सामाजिक संस्कारांमुळे समता, न्याय, बंधुता आणि संविधानावरील विश्वास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला.
‘बीएस्सी’, ‘एलएलबी’ आणि ‘एलएलएम’ शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिली व्यवसाय स्वीकारला. न्यायव्यवस्था, भारतीय राज्यघटना आणि सामाजिक न्याय यांचा सातत्याने अभ्यास करत, कायद्याच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याची दिशा त्यांनी निवडली. 2012 पासून ‘राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प, आष्टी’चे सचिव म्हणून ते शिक्षण, कायदेविषयक जनजागृती, डिजिटल साक्षरता, आरोग्य जनजागृती, पर्यावरण संरक्षण, ग्रामीण विकास आणि वंचित समाजघटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला आणि बालकांच्या विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.
‘विवेक विचार मंच, महाराष्ट्र’चे मराठवाडा विभाग संयोजक म्हणूनही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित समाजघटकांवरील अन्याय-अत्याचारांविरोधात वैधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करणे, पीडितांना कायदेशीर मदत मिळवून देणे, संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करणे, तसेच संविधानविरोधी आणि फुटीरतावादी प्रवृत्तींना वैचारिक उत्तर देण्याचे कार्य ते करतात. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांच्यासोबत ‘समाजभान’ अभियानात दोन वर्षे काम करताना सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाली.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते सामाजिक घडामोडींवर संविधानिक भूमिका मांडतात. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा वैचारिक प्रतिवाद, सामाजिक अन्यायाच्या घटनांतील पीडितांना भेटून कायदेशीर व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे पैलू आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एका प्राध्यापकाने राहत्या परिसरावरून केलेली जातीय टिप्पणी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरली. त्याच काळात एका मैत्रिणीच्या ‘जय भीम’विषयीच्या गैरसमजातून समाजातील पूर्वग्रह किती खोलवर रुजले आहेत, याची त्यांना जाणीव झाली. या अनुभवांनी सामाजिक न्यायासाठी अधिक सक्रियपणे काम करण्याचा त्यांचा निर्धार दृढ केला. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध उपक्रमांशी परिचय झाल्यानंतर संवाद, समतायुक्त शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी संघ प्रत्यक्ष कार्यरत आहे, या अनुभवानंतर राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने काम करण्याची त्यांची भूमिका अधिक स्पष्ट झाली. या भूमिकेमुळे त्यांना समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र, संविधानिक मार्गावरील त्यांची निष्ठा कायम राहिली.
लेखनाची त्यांना विशेष आवड. सामाजिक विषयांवरील कविता, गीते आणि लेखांमधून ते संविधानिक मूल्यांचा प्रचार करतात. ‘संविधान जागर यात्रे’तील ‘संविधान जागर गीत’, तसेच ‘जनसुरक्षा विधेयक’ समर्थन सभांतील ‘जनसुरक्षा गीत’ यांना विशेष प्रतिसाद मिळाला. जुलै 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भारतातील पहिल्या ‘विधिज्ञ साहित्य संमेलना’त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘समता बंधुता गीत’ सादर केले. नांदेड येथील 20व्या ‘समरसता साहित्य संमेलना’तही त्यांच्या सादरीकरणाचा गौरव झाला.
महाड येथे झालेल्या ‘सामाजिक न्याय परिषद-2026’मध्ये प्रकाशित ‘समतेचा सत्याग्रह आणि बंधुतेचा जागर’ या विशेष पुस्तिकेत त्यांच्या ‘महाड ते संविधान : बाबासाहेबांचा भारत जोडणारा मार्ग’ या लेखाचा समावेश झाला. या लेखनासाठी ‘पद्मश्री’ दादा इदाते यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच परिषदेत राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांवर आधारित एकसंघ भारताच्या संकल्पनेचा ठराव त्यांनी मांडला. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ॲड. प्रबोधन वाल्मीक निकाळजे यांना त्यांच्या पुढील सामाजिक, कायदेविषयक आणि संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
9967020364