एका हातात तंत्रज्ञान आणि दुसर्या हाती संगीत कला घेऊन, समाजाला आनंद देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वानंद आशिष राजे याच्याविषयी...
संगीत क्षेत्रातील सूर आणि सायबर जगतातील सुरक्षा, या दोन्ही भिन्न आघाड्यांवर डोंबिवलीच्या एका मराठी तरुणाने थेट सातासमुद्रापार यशाचा झेंडा रोवला आहे. वडिलांच्या खाकी वर्दीतील देशसेवेचा वारसा पुढे चालवत, २७ वर्षीय स्वानंद आशिष राजे याने ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेत, सायबरपीडितांच्या रक्षणासाठी स्वतःला अक्षरश: वाहून घेतले आहे. स्वानंदचा जन्म मुंबईतल्या प्रभादेवी येथे झाला. त्याचे बालपण डोंबिवलीत गेले. डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयातून, त्याने प्राथमिक व माध्यामिक शिक्षण पूर्ण केले. स्वानंदला सातवीत असताना मिडलस्कूल शिष्यवृत्ती, तसेच आठवीला ज्युनिअर मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. त्याने ‘इलेट्रॉनिस अॅण्ड टेलिकम्युनिकेशन’ या विषयामधून, ‘बीई’ची पदवी पूर्ण केली. पदवीच्या शिक्षणानंतर त्याची निवड, ‘इन्फोसिस’ या भारतातील आघाडीच्या ‘आयटी’ क्षेत्रातील कंपनीत झाली. याठिकाणी त्याने जवळपास साडेतीन वर्षे, सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून उत्तम कामगिरी केली. यादरम्यानच कंपनीतर्फे अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणार्या ‘ब्रिज प्रोग्राम’मध्ये, त्याने संपूर्ण भारतातून पहिल्या १०० स्पर्धकांमध्ये उत्तीर्ण होण्याचा बहुमानही मिळविला.
स्वानंद याच्या गुणवत्तेमुळे, कंपनीतर्फे त्याला नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या अनेक सुवर्णसंधी चालून आल्या होत्या. मात्र, वडिलांनी दिलेली प्रेरणा आणि देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या ध्यासामुळे स्वानंदने त्या नाकारल्या. त्याने ‘इन्फोसिस’मधीलही संधी नाकारून, सायबर सुरक्षा क्षेत्रातील सखोल ज्ञान घेण्यासाठी, या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर सायबर विश्वातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी, स्वानंद याने ब्रिटनची वाट धरली. त्याने ब्रिटनमधील जगप्रसिद्ध ‘न्यूकॅसल युनिव्हर्सिटी’मधून, ‘एम. एस. इन सायबर सियुरिटी’ ही उच्च पदवी प्राप्त केली. सध्या तो ब्रिटनच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस’शी संलग्न असलेल्या, प्रसिद्ध ‘कोरा हेल्थ’ कंपनीत सायबर सुरक्षातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. भविष्यात आपल्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग, भारतातील सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी करण्याचाही स्वानंदचा मानस आहे.
स्वानंदची आई स्मिता या गृहिणी आहेत. त्यांचे ‘एम.कॉम.’पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्या डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक संघाशीही जोडल्या गेल्या आहेत. स्वानंदचा भाऊ धवल हा तबला विशारद असून, त्याचे वडील आशिष हे मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. राज्याच्या पोलीस दलात काम करताना डिजिटल विश्वातील गुन्हेगारी, सायबर चोरांकडून देशातील जनतेची होणारी फसवणूक आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणार्या कुटुंबांची व्यथा स्वानंदच्या वडिलांनी अत्यंत जवळून पाहिली. त्यामुळे वडिलांनीच स्वानंदला सायबर गुन्हेगारीच्या या वाढत्या धोयाची आणि त्याबद्दलच्या जागरूकतेची जाणीवही करून दिली. त्यामुळे आपल्या देशातील सायबरपीडितांसाठी, तंत्रज्ञानाचच्या वापराने काहीतरी ठोस कामगिरी करावी, हा विचार स्वानंदच्या मनात पक्का झाला.
स्वानंद केवळ अभ्यास आणि संगीतातच नाही, तर मैदानी खेळातही तरबेज आहे. त्याला क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असून, सध्या तो ब्रिटनमध्ये स्थानिक लबकडून खेळतो आहे. स्वानंदने आपल्या कलेचा विस्तार सातासमुद्रापार केला असून, तो सध्या ब्रिटन येथे परदेशी आणि अनिवासी भारतीय नागरिकांसाठी शास्त्रीय व सुगम संगीताचेही वर्ग घेतो. त्याच माध्यमातून तो भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसारही करत आहे.
स्वानंद शालेय जीवनापासूनच गायन, निबंध आणि वक्तृव स्पर्धेमध्ये नेहमीच अग्रेसर होता. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, स्वानंद अनेकदा आईसोबत स्कॉलरशिप परीक्षेसाठी महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत असे. स्वानंद आणि धवलने डोंबिवली, तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी शासन, तसेच इतर संस्थांसाठी विविध संगीताचे कार्यक्रम केले आहेत. या दोन्ही बंधूंना ५० हून अधिक पुरस्कारही मिळाले असून, स्वानंद सध्या ‘संगीत अलंकार’ परीक्षेचा अभ्यास करीत आहे.
स्वानंद याने केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि संगीताचा वारसाही तितक्याच ताकदीने जपला आहे. तो भारतीय शास्त्रीय संगीत विशारद असून, त्याने गायन क्षेत्रात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. स्वानंदला २०११ आणि २०१२ मध्ये, सलग दोनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत, सुवर्णपदक पटकावून स्वानंदने भारताचा गौरव वाढवला. २०१३ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मानाच्या महापौर पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आले आहे. अशा या हरहुन्नर स्वानंदला, त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.