अशी ही ‘जेन-झी’

    13-Jul-2026   
 
 
Gen Z and AI
 
आताच्या ‘जेन-झी’ पिढीबद्दल बोलताना, वेगळेपणावर भाष्य करताना ही पिढी तर्‍हेवाईक असल्याचा ठपका काही लोकांना ठेवायचाच असतो. वास्तविक प्रत्येक पिढी ही त्या काळाचं अपत्य असतं. आपल्या काळाचे संस्कार अंगी बाणवतच माणसं जगतात. आजच्या काळातील चलनातलं नाणं म्हणजे ‘एआय’ आणि माहिती. या दोन गोष्टींच्या जोरावर जगावर राज्य करता येतं. या पार्श्वभूमीवरच आजच्या पिढीचं ‘टेक सॅव्ही’ असणं, आपण अनुभवत आहोत. मात्र, त्याचबरोबर दुसर्‍या बाजूला या ‘टेक’च्या जंजाळातून समाजाला मुक्त करण्यासाठी, विकसित राष्ट्रांमध्ये काही चळवळी जन्माला येत आहेत. यांचे भोई ‘जेन-झी’ आहेत.
 
२१व्या शतकात आपण ‘एआय’ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व क्रांतीचे साक्षीदार आहोत. परंतु, अमेरिकेत ज्या वेगाने ‘एआय’ विस्तारत आहे, तितयाच तीव्रतेने त्याला विरोधही होत आहे. नुकतेच न्यूयॉर्कने नवीन डेटा सेंटर्सच्या उभारणीवर, तात्पुरती बंदी घालणारा कायदा मंजूर करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. तर, दुसरीकडे दीक्षान्त समारंभांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नेत्यांना, विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नोकर्‍यांच्या संभाव्य धोक्यांमुळे, तरुण पिढीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. व्हाईट हाऊसचे सल्लागार आणि तंत्रज्ञ डेव्हिड फ्राईडबर्ग नुकतंच एका पॉडकास्टमध्ये म्हणाले की, "एआय’मुळे नोकर्‍या संपतील ही एक ‘ल्युडाईट विचारसरणी’ असून, ती दररोज चुकीची ठरते आहे. आता या ‘ल्युडाईट’ शब्दाचा इतिहासच गमतीदार आहे.
 
१९व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधील ‘नॉटिंगहॅम’ येथे औद्योगिकीकरणाची लाट आली. ‘पॉवर लूम’मुळे, पारंपरिक कापड विणकरांच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला. या कारागिरांनी अनेक वर्षांच्या प्रशिक्षणातून, कौशल्य विकास साधला होता. कारखानदारांनी तंत्रज्ञानाच्या वापराने मजुरीचे दर कमी केले. याविरुद्ध विणकरांनी बंड पुकारले. या बंडाला चेहरा मिळाला, तो एका काल्पनिक लोकनायकाचा. त्याचं नाव होतं नेड लूड! त्याच्या नावाचा वापर करून, काहींनी कारखान्यांमधील यंत्रांची तोडफोड सुरू केली. पत्रकार ब्रायन मर्चंट यांच्या मते, खरे ‘ल्युडाईट्स’ तंत्रज्ञान विरोधी नव्हते, तर लोकांचे शोषण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाच्या विरोधी होते. अखेर ब्रिटिश सरकारने लष्कराच्या मदतीने, हे बंड चिरडले. त्यानंतर ‘ल्युडाईट्स’ना, इतिहासात ‘प्रगतीविरोधी’ म्हणून रंगवले गेले.
 
आज दोन शतकांनंतर, ‘जेन-झी’ या ‘ल्युडाईट’ लेबलचा अभिमानाने स्वीकार करत आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्वाचा आणि अल्गोरिदमचा निषेध करण्यासाठी, कॉलेज कॅम्पसमध्ये ‘ल्युडाईट लब्स’ स्थापन झाले आहेत. न्यूयॉर्क शहरात अज्ञात कार्यकर्त्यांनी समाज माध्यम-मुक्त कार्यक्रमांची, एक मालिकाच आयोजित केली. याला ‘द समर ऑफ ल्युड’ असेच नाव देण्यात आले. ही नवी पिढी तंत्रज्ञानाचा पूर्णपणे तिरस्कार करत नाही, तर स्क्रीनच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करते आहे. यासाठी तरुणांनी विविध उपाय राबवण्याचा निर्णय घेतला. इंटरनेट नसलेले जुने फोन्स वापरणं, डायरी लिहिणं, विणकाम करणं इत्यादी गोष्टी आपल्याला दिसतात. फोन आणण्यास बंदी असणारे आणि संवादास प्राथमिकता देणारे क्लबही, युरोपात आहेत.
 
कामाची गरज म्हणून आपला स्क्रीनटाईम, प्रमाणाबाहेर वाढला आहे. काही विकसनशील देशांमध्ये एका बाजूला ‘अपस्कील’ न झाल्यास नोकरी जाण्याची भीती; तर दुसर्‍या बाजूला नवनवीन कोर्सेसचा बाजार. अमेरिकेतील तरुण चळवळींमधून, ‘एआय’वरील परावलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जी गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होत आहे, तिथे यांचा उपयोग काय? असाही प्रश्न पडतो. तंत्रज्ञानाचा मारा नसलेल्या काळात ‘जेन-झी’चं बालपण गेलं. वर्तमानातील अस्वस्थता, ताणतणाव या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘जुनं ते सोनं’ हे आजच्या पिढीला वाटत असेल, तर त्यात नवल ते काय! ‘एआय’ हा जर आजच्या काळाचा प्रवाह असेल, तर ‘ल्युडाईट्स’ ही प्रवाहाविरोधातली बंडखोरी आहे. इतिहासाच्या सुयोग्य आकलनातून, क्रांती प्रतिक्रांतीच्या आकलनातूनच आपल्याला आजचा समाज समकेल आणि परिवर्तनाची पुढची दिशा सापडेल, हे नक्की!




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर