फिफा कागदावरची ‘लढाई’ जिंकली!

    13-Jul-2026   
 
 
FIFA World Cup 2026 Draw Strategy
 
युद्ध हे रणांगणावर लढले जाते, पण ते जिंकण्याची सुरुवात कागदावर होते,” असे लष्करी रणनीतीत म्हटले जाते. शत्रूशी तलवारी भिडण्याआधी नकाशे तयार होतात, मोर्चेबांधणी ठरते, सैन्याच्या वाटा आखल्या जातात आणि विजयाची बीजे तिथेच पेरली जातात.
 
जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) २०२६च्या विश्वचषकासाठी अगदी हाच धडा वापरला. हिरवळीवर पहिली किक पडण्याच्या कित्येक महिने आधीच त्यांनी स्पर्धेतील सर्वांत मोठी लढाई ड्रॉच्या कागदावर लढली. ४८ संघांच्या विस्तारित विश्वचषकामुळे फुटबॉलमधील महासंघांची अकाली गाठ पडू नये, जगातील सर्वोत्तम संघ शेवटपर्यंत टिकावेत आणि स्पर्धेची रंगत अखेरच्या आठवड्यापर्यंत कायम राहावी, यासाठी फिफाने ‘ड्रॉ’ची संपूर्ण रचना बदलली.
 
आज त्याचेच फळ दिसत आहे. फिफाच्या जागतिक क्रमवारीतील पहिले चार संघ स्पेन (१), अर्जेंटिना (२), फ्रान्स (३) आणि इंग्लंड (४) उपांत्य फेरीत एकत्र उभे आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच जगातील अव्वल चार संघ एकाचवेळी उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही; ती नियोजन, गणित आणि दूरदृष्टीचा परिणाम आहे.
 
२०२६ पासून विश्वचषकात ४८ संघ सहभागी झाले. त्यामुळे ‘नॉकआऊट’ची एक अतिरिक्त फेरी वाढली आणि गटविजेते संघ लवकरच एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली; जर असे झाले असते, तर स्पर्धेच्या सुरुवातीलाच एखादा महासंघ बाहेर पडला असता आणि अंतिम टप्प्यातील आकर्षण कमी झाले असते. फिफाने यावर एक वेगळाच उपाय शोधला. जागतिक क्रमवारीतील पहिल्या चार संघांना ‘ड्रॉ’मध्ये अशा चार स्वतंत्र‘क्वाड्रंट्स’मध्ये ठेवण्यात आले की, त्यांनी आपापले गट जिंकले, तर ते उपांत्य फेरीपूर्वी एकमेकांसमोर येणारच नाहीत. फिफाने याला ‘स्पर्धात्मक समतोल’ आणि ‘उपांत्य फेरीपर्यंत स्वतंत्र मार्ग’ असे नाव दिले. या निर्णयामुळे स्पेन आणि अर्जेंटिना अंतिम फेरीपूर्वी समोरासमोर येऊ शकत नव्हते. इंग्लंड आणि फ्रान्सलाही ‘नॉकआऊट’मध्ये विरुद्ध बाजूंना ठेवण्यात आले. परिणामी, आजचे चित्र अगदी फिफाने अपेक्षित केल्याप्रमाणे आहे. एका उपांत्य फेरीत फ्रान्स विरुद्ध स्पेन, तर दुसर्‍या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना. काहीजण या निर्णयावर टीका करतील. सर्वोत्तम संघांना कृत्रिम संरक्षण देणे, म्हणजे स्पर्धेच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप, असे त्यांचे मत असेल. पण, दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. विश्वचषक ही केवळ स्पर्धा नाही; तो जगातील सर्वांत मोठा क्रीडा सोहळा आहे. अब्जावधी प्रेक्षकांसाठी सर्वात मोठे सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत राखून ठेवणे, हे आयोजकांचेही उद्दिष्ट असते. अर्थात, ‘ड्रॉ’ अनुकूल असला, म्हणजे विश्वचषक जिंकता येतो, असे नाही. इतिहास त्याच्या अगदी उलट सांगतो. २०२२ मध्ये बेल्जियम, २०१८ मध्ये जर्मनी, २०१४ मध्ये स्पेन, २०१० मध्ये इटली आणि २००२ मध्ये फ्रान्स हे जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघ असूनही साखळी फेरीतूनच बाहेर पडले होते. म्हणजेच, ‘ड्रॉ’ तुम्हाला मार्ग देऊ शकतो; पण तो विजय देऊ शकत नाही. यंदा मात्र या चारही संघांनी पहिले आव्हान यशस्वीपणे पार केले. त्यांनी आपापले गट जिंकले आणि फिफाने आखून दिलेल्या मार्गावरून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
 
यातून एक मोठा प्रश्न समोर येतो. विश्वचषकात सर्वश्रेष्ठ संघ शेवटपर्यंत टिकावेत म्हणून ‘ड्रॉ’ची अशी रचना करणे योग्य आहे का? की विश्वचषकाचे खरे सौंदर्य हेच आहे, की कोणत्याही टप्प्यावर दोन महासत्तांची टक्कर होऊ शकते आणि एकाला अकाली निरोप घ्यावा लागू शकतो? उत्तर काहीही असो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे. फिफाने यंदाच्या विश्वचषकातील सर्वांत महत्त्वाची रणनीती मैदानावर नव्हे, तर ‘ड्रॉ’च्या कागदावर आखली आणि ती यशस्वी ठरली. स्पर्धेतील रंजकतेची पहिली लढाई त्यांनी आधीच जिंकली आहे.
 
आता उरलेली लढाई हिरवळीवर होणार आहे. तिथे कोणताही ‘ड्रॉ’, कोणतीही क्रमवारी किंवा कोणतेही नियोजन उपयोगी पडणार नाही. तिथे निर्णय घेतील, ते फक्त खेळाडूंचे पाय, त्यांचे धैर्य आणि त्या ९० मिनिटांचा थरार!




संबंधित मजकूर