फ्रान्सचा सर्वेसर्वा नेपोलियन बोनापार्ट काही मिनिटांच्या फरकामुळे वॉटरलूची लढाई हरला होता, अशी दंतकथा आहे... मार्शल ग्रुशी वेळेवर मुख्य रणांगणावर पोहोचला नाही, त्याच्या विलंबामुळे प्रुशियन सैन्याने ‘ड्युक ऑफ वेलिंग्टन’ला मदत केली. परिणामी, नेपोलियनचा निर्णायक पराभव झाला. युद्धात आणि खेळात प्रत्येक मिनिट निर्णायक असते. त्यातही जर तो खेळ फुटबॉल असेल, तर मग सतर्कता अधिकच!
फुटबॉलमध्ये गोल करणे जितके महत्त्वाचे, तितकेच महत्त्वाचे असते गोल न स्वीकारणे. यंदाच्या ‘फुटबॉल वर्ल्डकप’मध्ये तब्बल ६४९ मिनिटे एकही गोल न स्वीकारता, स्पेनने जागतिक फुटबॉलमध्ये अभेद्य बचावाचे नवे शिखर गाठले. हा केवळ एक विक्रम नव्हता; ती बचावकलेची अशी पराकाष्ठा होती, ज्याने इटलीच्या दिग्गज गोलरक्षक वॉल्टर झेंगाचा दशकांपासूनचा विश्वविक्रमही मागे टाकला. पण, काल बेल्जियम पराभूत झाली; तरी त्यांनी पराभूत होण्याआधी स्पेनचा हा विक्रम मात्र त्यांच्याकडून हिरावून घेतला.
बेल्जियमविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत फॅबियन रुईझने स्पेनला आघाडी मिळवून दिली आणि वाटले, आजही प्रतिस्पर्ध्याला गोलचा रस्ता सापडणार नाही. पण, ४१व्या मिनिटाला चार्ल्स डी केटेलारेच्या हेडरने स्पेनची अभेद्य भिंत अखेर कोसळली. सहा पूर्ण सामने आणि सातव्या सामन्यातील तब्बल ४१व्या मिनिटांनंतर स्पेनने प्रथमच चेंडू आपल्या जाळ्यात जाताना पाहिला.
परंतु, महान संघांची ओळख एका गोलने खचण्यात नसते; ती त्यानंतर उभारी घेण्यात असते. स्पेनने तेच करून दाखवले. बेल्जियमने बरोबरी साधल्यानंतरही त्यांनी संयम सोडला नाही. अखेर ८८व्या मिनिटाला बदली खेळाडू मिकेल मेरिनो मैदानावर आला आणि पुन्हा एकदा इतिहास घडवून गेला. त्याच्या विजयी गोलने स्पेनला २-१ असा विजय मिळवून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले. मेरिनोचीकहाणीही तितकीच विलक्षण आहे. पोर्तुगालविरुद्धच्या ‘राऊंड ऑफ १६’ सामन्यातही तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि अखेरच्या क्षणी विजयी गोल केला होता. आता बेल्जियमविरुद्धही त्याने तीच किमया साधली. सलग दोन ‘नॉकआऊट’ सामन्यांत बदली खेळाडू म्हणून उतरून अखेरच्या क्षणी विजयी गोल करणारा तो विश्वचषकाच्या इतिहासातील दुर्मीळ नायक ठरला. या स्पर्धेत स्पेनचा बचाव म्हणजे, प्रतिस्पर्ध्यांसाठी एक अभेद्य कोडे ठरला होता. ग्रुप फेरीपासून ‘राऊंड ऑफ १६’पर्यंत एकही संघ त्यांच्याविरोधात गोल करू शकला नव्हता. प्रत्येक स्वच्छ (लीन शीट) सामना स्पेनच्या शिस्तबद्ध बचावाची साक्ष देत होता. केवळ गोलरक्षक नव्हे, तर संपूर्ण संघ बचाव करत होता. प्रत्येक खेळाडू हा जणू पहिला बचावपटू आणि प्रत्येक बचावपटू हा शेवटचा गोलरक्षक बनला होता. बेल्जियमचा एक गोल स्पेनचा विक्रम थोपवू शकला; पण त्यांचा आत्मविश्वास मोडू शकला नाही. उलट, त्या गोलनंतर स्पेनने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, त्यातूनच त्यांचे विजेतेपदाचे दावेदारपण अधिक ठळक झाले.
फुटबॉलमध्ये आक्रमण सामने जिंकते, असे म्हणतात. पण, बचाव स्पर्धा जिंकून देतो, हे स्पेनने पुन्हा एकदा खरे करून दाखवले आहे. ६४९ मिनिटांचा अभेद्य किल्ला अखेर ढासळला. मात्र, त्या ढासळलेल्या भिंतीच्या मागे अजूनही विजेतेपदाकडे वाटचाल करणारा स्पेन तितकाच खंबीरपणे उभा असलेला दिसला आणि म्हणूनच, या विश्वचषकाची गोष्ट लिहिली जाईल, तेव्हा ती केवळ स्पेनने केलेल्या गोलांची नव्हे; तर ६४९ मिनिटे न भेदल्या गेलेल्या त्यांच्या बचावाचीही लिहिली जाईल.