जगण्याचा आनंद देणारं संगीत : पं. सुहास व्यास

    11-Jul-2026   
 
Pandit Suhas Vyas Interview
 
‘पद्मभूषण’ पंडित सी. आर. व्यास यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भारतीय संगीतशास्त्राला नवीन दिशा दिली. त्यांच्या मुलांनी हाच वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा निर्धार केला आणि शास्त्रीय संगीताचा अभिजात विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचला. ‘पंचम निषाद’ आणि ‘ग्रेस फाऊंडेशन’च्या माध्यमातून ‘मॉर्निंग रागाज - अ युनिक एसपिरियन्स ऑफ रेअर रागाज’ या विशेष शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका ‘बुक माय शो’वर उपलब्ध आहेत. सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, भारतीय अभिजात संगीत ज्यांच्या नसानसांत भिनले आहे, असे ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक सुहास व्यास रसिकप्रेक्षकांसमोर ‘अहिरी ललित’, ‘देव गंधार’, ‘दुगम हिंडोल’, ‘वराठी तोडी’ असे दुर्मीळ राग सादर करणार आहेत. या विशेष संगीत मैफिलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.
 
सकाळच्या वेळच्या संगीत मैफिली आणि त्यातही दुर्मीळ रागांचे सादरीकरण असा योग अभावानेच जुळून येतो. तेव्हा, या विशेष शास्त्रीय मैफिलीच्या संकल्पनेविषयी जाणून घ्यायला आवडेल.
 
आजच्या धावत्या जगामध्ये लोकांकडे वेळ कमी आहे. पूर्वी रात्रभर मैफिली चालायच्या. त्यामुळे मध्यरात्रीचे, सकाळचे असे सगळे राग ऐकायला मिळायचे. मला असं वाटतं मैफील रात्रीचीच खरी रंगते. पहाटे ४ ते ९ वाजेपर्यंतचे जे राग आहेत, ते ऐकायला दुर्मीळ आहेत. त्यातसुद्धा जे लोकप्रिय आहेत, ते ऐकले जातात. मात्र, असे अनेक राग आहेत, जे लोकांपर्यंत पोहोचले नाही. आता याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर वेळेचं बंधन आणि दुसरं म्हणजे, गाणारे कलाकार असूनसुद्धा त्यांची दखल घेतली जात नाही. सध्या गणित लोकप्रियतेवर अवलंबून आहे, ते चूक आहे, असं माझं म्हणणं नाही. कारण, शेवटी तो व्यवसायाचा भाग आहे. पूर्वी ‘इव्हेंट’ नव्हते मैफिली होत्या, जिथे कलाकारसुद्धा हजर राहायचे.
 
हा उपक्रम बंगळुरुनंतर आता मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा यानिमित्ताने रसिकप्रेक्षकांना काय आवाहन कराल?
 
मला असं वाटतं, सामान्य माणसांनी याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. मी आपल्या संगीताला ‘अभिजात संगीत’ म्हणतो, ‘शास्त्रीय संगीत’ म्हणत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर, प्रत्येक गाण्याच्या प्रकाराला शास्त्र आहे. मग प्रत्येक प्रकार ‘शास्त्रीय संगीत’ होऊ शकतो. परंतु, ‘अभिजात’ म्हणजे काय, तर सर्वोत्कृष्ट! ते आपलं अभिजात संगीत! लतादीदींपासून अनेक प्रख्यात गायिकांनी सांगितलं आहे की, तुम्ही आधी शास्त्रीय संगीत शिका. कारण, आपल्या रागांचा जो प्रभाव आहे, तो समजून घेतला पाहिजे. राग समजून घेणे आणि गाणं समजून घेणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शशीने मला ही जबाबदारी दिल्यानंतर मागचे दीड-दोन महिने मी प्रत्येक रागावर रियाज करत आहे आणि हा जो प्रयास आहे, तो पुढच्या पिढीने ऐकावा, असं मला वाटतं. आजचं युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे याचं रीलहर्ळींरश्र होईल. पूर्वीच्या काळी ज्याप्रकारे गाण्याचं आदान-प्रदान होत असे की, ते आताच्या घडीला होत नाही. म्हणजे, हा माझा आरोप नाही; पण ती भावना कमी झाली. हल्ली लपवण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. मी टीका करत नाही, पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. सगळे राग मला येत नाहीत, पण दुसर्‍या कुणाला येत असतील, तर ते ऐकले पाहिजेत. भारतीय संगीतासारखं समृद्ध संगीत मला तरी कुठे सापडलं नाही.
 
या मैफिलीत तुम्ही ‘अहिरी ललित’, ‘देव गंधार’, ‘वराठी तोडी’ यांसारखे सहा दुर्मीळ राग सादर करणार आहात. हे राग सादर करताना आपल्याला कोणती पूर्वतयारी करावी लागते?
 
पहिली गोष्ट म्हणजे, आम्ही जो रियाज करतो, त्याचा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. मला राग पहिल्या सुरापासून ‘एस्टॅब्लिश’ करता आला पाहिजे. प्रत्येक सुराला अर्थ आहे. तो अर्थ मला सापडावा, म्हणून मी सुरांचा रियाज करतो. आपल्या संगीतामध्ये साहित्य आहे. त्या साहित्याला अर्थ आहे. राग गातानाची जी अनुभूती आहे, ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक बंदिशीची एक लय असते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बोल आला पाहिजे. अंतर्‍याचे आलाप, स्थाईचे आलाप हे सगळे करताना त्या शब्दाला आणि सुराला अनुसरून माझे शब्द मला गाता आले पाहिजेत.
 
आपण ‘ब्रिस शिखर परिषदे’सारख्या जागतिक मंचावरही आपली कला सादर केली. काय भावना असतात अशा वेळी?
 
‘ब्रिस शिखर परिषदे’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली. ‘आयसीसीआर’च्या माध्यमातून मला पाठवण्यात आलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की, "पंडितजी, आपल्या संगीतातून, आपल्या देशाचं काहीतरी तिथल्या लोकांसमोर पोहोचलं पाहिजे.” त्यासाठी मी शोध घेतला. आपल्या भारतीय संगीतातील अत्यंत मोठं नाव म्हणजे श्रीकृष्ण (अण्णासाहेब) नारायण रातंजनकर. हे पंडित भातखंडे यांचे पट्टशिष्य. अत्यंत ‘क्रिएटिव्ह’ माणूस. म्हणजे, उद्या तुमच्यासारखा एखादा पत्रकार गेला आणि त्याने सांगितलं की, अमूक एका रागामध्ये बंदीश नाहीये, तर ते "समोर बसा मी करून देतो,” म्हणत असत. एवढी प्रगल्भता त्यांच्याकडे होती! त्यांच्या पुस्तकाचा मी संदर्भ घेतला. मला एकूण चार बंदिशी सापडल्या. सादरीकरणासाठी मला २० मिनिटांची वेळ दिली होती. चीनमधल्या एका बेटावर ही परिषद भरली होती. मला प्रश्न पडला, इथल्या लोकांना काय कळणार आपली भाषा? मग मी समन्वयकांना सांगितलं की, याचा अर्थ त्यांच्या भाषेमध्ये त्यांना कळला पाहिजे. याबाबतीत शासनाने मला खूपच चांगली मदत केली. त्या कार्यक्रमाला एक हजार लोक तिकीट काढून आले होते. ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. मला तिथल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, "तुम्ही बसून कसे गायलात?” कारण बाकी देशांतील लोकांचे उभे राहून कार्यक्रम झाले. माझ्यासाठी तिथे विशेष व्यवस्था केली गेली. आता आम्ही चार-चार तासांच्या मैफिली करतो; तिथे २० मिनिटं म्हणजे काहीच नाही. तिथे २० मिनिटांनी कार्यक्रम संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. ६० वर्षांनंतर चीनमध्ये शास्त्रीय संगीत सादर करणारा मी पहिला कलाकार होतो. पहिले होते, ते डी. वी. पलुस्कर!
 
संगीत साधनेच्या या प्रवासात आपल्याला काय गवसलं? एकूणच ही अनुभूती कशी होती?
 
संगीताने मला जगण्याचा आनंद दिला, असं मी म्हणेन. मी संगीताकरिता जगतोय किंवा संगीतामुळे जगतोय. माझे वडील स्वतः एक कलाकार होते. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कधीही सक्ती केली नाही की तू गाणं कर. तुला जर आवड असेल, तर तू कर. आम्ही तिन्ही भाऊ (सुहास व्यास, सतीश व्यास, शशी व्यास) संगीताच्या संस्कारांमध्येच वाढलो. त्यामुळे गाणं-बजावणं सगळं ऐकलं होतं. म्हणजे बिरजू महाराजांच्या सगळ्या तबलजीबरोबरचे नृत्य बघितले. याचा फायदा मला असा झाला की, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात. मी जेव्हा गाणं शिकायचो, त्यावेळेला तंबोरा घेऊन बसायचो. तंबोरा वाजवला तरीसुद्धा मनाला शांती मिळते. हा माझा अनुभव आहे. आता मी ७७ वर्षांचा आहे. मी सामान्य माणसांनासुद्धा सांगतो की, तंबोरा ऐका. संगीताने मला आनंद दिला. ओळख दिली. संगीतामुळे माणसं जोडली गेली. मी देशासाठी सीमेवर जाऊन लढलो नाही, पण माझ्या देशाकरिता मी गायलो. आता मी पुढची पिढी तयार करत आहे. जेवढं मला येतं, तेवढं मी पुढच्या पिढीला देतो.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर