चौकटीच्या पल्याड जाणारी ‘फ्रेम’

    11-Jul-2026   
 
 
Frame Marathi Movie Review
 
छायाचित्रकारांच्या जीवनाचा विचार ‘फ्रेम’ या चित्रपटामधून मांडताना, माध्यमांच्या तत्कालीन भावविश्वावर दिग्दर्शकाने जबरदस्त भाष्य केले आहे. एका व्यक्तीच्या कामापासून सुरू होणार्‍या या गोष्टीने आपल्या अवकाशामध्ये समाजाचं वास्तव चित्रण उभं केलं आहे. मात्र, या चित्रामध्ये गुंतून न जाता, दिग्दर्शकाला आपली गोष्ट सांगता आली आहे, हे या चित्रपटाचं खरं यश...
 
माध्यमजगतात आजघडीला सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेग. एकेकाळी घडलेली घटना पूर्ण समजून घेण्यासाठी, त्यातील सत्यता तपासून घेण्यासाठी माणसं वृत्तपत्रांवर अवलंबून होती. काही काळानंतर घरामध्ये टीव्ही आले, घटनास्थळी जाणारे रिपोर्ट्स, कॅमेरामन आणि नजरेसमोर सतत फिरत राहणारी व्हिडिओ रेकोर्डिंग्स... काळाच्या ओघात डिजिटल पोटर्ल्सनी आपला अवकाश व्यापला आणि काही मिनिटांमध्ये बातम्या आपल्यापर्यंत पोहोचू लागल्या. या सगळ्या प्रवासात अबाधित राहिलेली गोष्ट म्हणजे, घटना सांगणारी छायाचित्रं! एका बाजूला वृत्तपत्राच्या संपादकीय विभागाच्या बातमीला अनुरूप अशी छायाचित्रं शोधण्याची धडपड आणि दुसर्‍या बाजूला सुयोग्य छायाचित्रं कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी कॅमेरामनची धडपड. यातल्या दुसर्‍या धडपडीचा मानवी प्रवास साकारला आहे, विक्रम पटवर्धन लिखित दिग्दर्शित ‘फ्रेम’ या चित्रपटामध्ये.
 
कॅमेर्‍याच्या लेन्सधून जग कसं दिसणार, हे ठरवते ती ‘फ्रेम’. एखादी गोष्ट ‘फ्रेम’मध्ये ‘ठेवणे’ आणि ‘फ्रेम’च्या ‘बाहेर काढणे’ यावरून दिग्दर्शक किंवा छायाचित्रकाराला नेमके काय दाखवायचे आहे, कशावर आपला ‘फोकस’ केंद्रित करायचा आहे, हे ठरतं. याचं ‘फ्रेम’चं आणि कॅमेर्‍यामागच्या माणसांचं जगणं आपल्याला या चित्रपटामध्ये अनुभवायला मिळतं.
 
‘फ्रेम’ हा चित्रपट म्हणजे, दोन वृत्तछायाचित्रकारांची कथा. प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी यामध्ये चंदू पानसरे ही भूमिका साकारली आहे. पत्रकारितेच्या जगात तावून-सुलाखून निघालेले चंदू पानसरे म्हणजे अनुभवी आणि झोकून देऊन काम करणारे छायाचित्रकार. चंदू पानसरेच्या (सीपी) जगामध्ये घडलेल्या घटनेच्या फोटोला जास्त महत्त्व. संवेदनांना प्राधान्य देण्याच्या नादात आपलं काम हातचं निघून जाता कामा नये, हा व्यावसायिक विचार त्याच्यापाशी आहे. दुसर्‍या बाजूला अमेय वाघने ‘सिद्धार्थ देशमुख’ हे पात्र सिनेमात साकारलं आहे. एक तरुण, नवशिया छायाचित्रकार आहे, जो चंदूच्या हाताखाली काम शिकायला येतो. तरुण, अनुभव नसल्यामुळे सिद्धार्थची संवेदनशीलता शाबूत आहे. फोटोजर्नलिझमच्या विश्वामध्ये अद्याप पूर्णपणे मुरला नाहीये आणि म्हणूनच एकाचवेळी चौकटी बाहेरचा विचारसुद्धा त्याला करायचा आहे आणि आपलं माणूसपण शाबूत ठेवायचं आहे, असं त्याच्या आयुष्यातलं द्वंद्व पडद्यावरही तितकंच परिमाणकारकपणे उठून दिसतं.
 
चित्रपटाच्या कथानकाचं बलस्थान म्हणजे दिग्दर्शकाला आपली गोष्ट थेटपणे मांडता आली आहे. कुठल्याही घटनेमध्ये चित्रपटाच्या चौकटीला, कलाकाराला फार काळ गुंतवून न ठेवता, चित्रपटाचा प्रवास सहज पुढे सरकत राहतो. एखादा चांगला फोटो काढायच्या वेळी ज्याप्रकारे आपल्याला कॅमेरा ‘ऑब्जेट’वर फोकस करावा लागतो, त्याचप्रकारे दिग्दर्शकाने पात्रांवर ‘फोकस’ ठेवून सिनेमा व्यवस्थित हाताळला आहे. एका बाजूला चंदू पानसरे ‘फोटोजर्नलिझम’च्या विश्वामध्ये एक यशस्वी नाव असलं, तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडलेलं. बायकोबरोबर झालेला घटस्फोट, त्यातून आलेलं नैराश्य. व्यसनाधीनता यातून सीपीच्या जीवनाच्या प्रवासाची गाडी पुढे जाते. नागराज मंजुळे यांनी हे पात्र साकारताना त्या पात्राच्या मनोविश्वाची ओढाताण सक्षमपणे मांडली आहे. त्यातला भणंगपणा नैराश्यातून आला असला, तरी तो वाजवीपेक्षा जास्त नसतो. दुसर्‍या बाजूला अमेय वाघ याने त्याच्या पात्रातील नावीन्य आणि काळाच्या ओघात आलेली समज उत्कृष्टरीत्या हाताळलेली दिसते.
चित्रपटाचा उत्तरार्ध या दोघांना महाराष्ट्रातील एका भूकंपग्रस्त गावात घेऊन जातो. तिथली विदारक परिस्थिती कॅमेर्‍यात कैद करण्याचा सिलसिला सुरू होतो. याच पार्श्वभूमीवर प्राधान्य व्यावसायिकतेला द्यावं की माणुसकीला, या संदर्भातला संघर्ष चित्रपटाच्या परमोच्च बिंदूवर उभा राहतो आणि एका काव्यगत निष्कर्षावर चित्रपट संपतो.
 
असाच एक संघर्ष काही दशकांपूर्वीही चर्चेचा विषय ठरला होता. कुपोषित, हतबल, गलितगात्र अशा सुदानी मुलाचा घास घेण्यासाठी टपून बसलेल्या गिधाडाचे वास्तववादी चित्र कॅमेर्‍यात कैद केले ते दक्षिण आफ्रिकेचा छायाचित्रकार केविन कार्टरने. या छायाचित्रासाठी १९९४ साली मानाच्या ‘पुलित्झर पुरस्कारा’ने केविनला गौरविण्यातही आले. पण, सुदानमधील मानवी दुःखाची अशी पराकोटीची वेदना बघून केविनच्या मनावर इतका प्रचंड आघात झाला की, त्यानंतर अवघ्या चारच महिन्यांनी त्याने आत्महत्या करुन त्याची जीवनयात्रा संपविली. त्यामुळे एकीकडे छायाचित्रकार म्हणून असलेले कर्तव्य आणि दुसरीकडे सहानुभूतीचे मानवी कर्तव्य, यांच्यातील द्वंद्वाला ‘फ्रेम’मध्येही दिग्दर्शकाने न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
 
नातेसंबंधांमध्ये येणारे ताणेबाणे, पत्रकारितेच्या व्यवसायातील आव्हानं, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाची सुरू असलेली धडपड, ही संपूर्ण मांडणी अत्यंत संयतपणे प्रेक्षकांसमोर या ‘फ्रेम’मध्ये सादर करण्यात आली आहे. चित्रपटामध्ये एके ठिकाणी चंदू पानसरे म्हणतो की, "आपलं आयुष्यसुद्धा आपल्या फिल्डचंच प्रतिबिंब असतं. आपल्या फिल्डप्रमाणे आपल्या आयुष्यालासुद्धा कुठलीही चौकट (फ्रेम) नाही.” एका चौकटीमध्ये गोष्ट सांगण्यासाठी चौकट मोडण्याची तयारी असणं आणि त्यातून उद्भवलेल्या परिणामांना पात्रांचं सामोरं जाणं, यातली गुंतागुंत दिग्दर्शकाने अगदी अचूक मांडली आहे.
 
ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं पार्श्वसंगीत चित्रपटसृष्टीला नवं भान देणारं आहे. परिस्थितीचं, प्रसंगाचं गांभीर्य संगीतातून प्रतिबिंबित होतं. त्याचबरोबर संगीतकार म्हणून त्यांच्या वेगळ्या अभिव्यक्तीची आपल्याला जाणीव होते. नियमितपणे वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधून किंवा डिजिटल बातम्यांच्या पेजवरून आपण जी छायाचित्रं आपण पाहतो, त्यांच्या मागे काम करणार्‍या हातांचीसुद्धा एक विलक्षण गोष्ट म्हणजे ‘फ्रेम’.
 
विक्रम पटवर्धन यांनी चित्रपटाला केवळ एका उपदेशात्मक चौकटीत न बांधता, दोन्ही पात्रांमधील द्वंद्व शेवटपर्यंत जिवंत ठेवले आहे. याच अनुषंगाने चित्रपटातील पात्रांना, त्यांच्या जीवनातील व्यथा-कथांना योग्य तो न्याय देण्यात आला आहे. छायाचित्राच्या मागचं हे विश्व म्हणून नक्कीच बघायला हवं, अनुभवायला हवं.
 
प्रख्यात छायाचित्रकार रघु राय यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. रघु राय यांनी केवळ आपल्या कॅमेर्‍याच्या माध्यमातून छायाचित्रं टिपली नाहीत, तर भारताच्या जडणघडणीचा इतिहास लोकांपुढे मांडला. जे काम करण्यासाठी आजपर्यंत अनेक अभ्यासकांनी पानाच्या पानं खर्ची घातली असतील, ते काम रघु राय यांच्या एका छायाचित्रामुळे लोकांपर्यंत पोहोचलं, त्यांच्या मनामध्ये कायमचं कोरलं गेलं. एखादी गोष्ट डोळ्यांना दिसणं आणि माणसाने ती गोष्ट बघणं, या दोन वेगळ्या गोष्टी. या दोन गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात आणि हातात कॅमेरा असलेला फोटोग्राफर ज्यावेळी फोटो काढतो, त्यावेळी फक्त एक छायाचित्रच जन्माला येत नाही; त्यावेळी तयार होते ती, एक कथा, एक बातमी आणि कदाचित इतिहासाच्या पानांमध्ये कायमची कोरली जाणारी एक ओळसुद्धा!
 
चित्रपट : फ्रेम
दिग्दर्शक : विक्रम पटवर्धन
कलाकार : नागराज मंजुळे, अमेय वाघ
ओटीटी : मराठी Zee5
फोटो सौजन्य : ZEE5 Marathi
 
९९६७८२६९८३




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर