'दिस टाईम फॉर आफ्रिका’ २०१०च्या दक्षिण आफ्रिका विश्वचषकाचे अधिकृत गीत. शकीराच्या त्या गाण्याची लय अजूनही कानांत घुमते. पण त्या गाण्याचा खरा अर्थ कदाचित २०२६च्या विश्वचषकाने उलगडून दाखवला.
फुटबॉल कळण्याचे ते दिवस होते. १९९० साल. मी नुकताच १६व्या वर्षात पदार्पण करत होतो. घरातला ब्लॅक-अॅण्ड-व्हाईट दूरदर्शन संच, रात्री जागून पाहिलेले सामने आणि त्यावर इतर खेळाडूंपेक्षा अधिक ठसठशीत दिसणारे आफ्रिकन चेहरे. त्या विश्वचषकाने मला फुटबॉलच्या प्रेमात पाडले. आणि त्या प्रेमाचा सर्वांत मोठा नायक होता, कॅमेरूनचा चाळिशीतला सुपरस्टार रॉजर मिला!
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला हा खेळाडू प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीची अक्षरशः धुलाई करत होता. प्रत्येक गोलनंतर तो कॉर्नर फ्लॅगजवळ धावत जायचा आणि ‘मकोसा हिप शेक’ डान्स करत संपूर्ण जगाला वेड लावायचा. आज सोशल मीडियावर व्हायरल होणार्या गोल सेलिब्रेशनची बीजे कदाचित तेव्हाच रुजली होती. एवढेच नव्हे, आमच्या गल्ली क्रिकेटमध्येही कपिल देव विकेट घेतल्यानंतर आम्ही रॉजर मिलाचा ‘मकोसा डान्स’ करायचो. त्या एका खेळाडूने आफ्रिकन फुटबॉलला आत्मविश्वास दिला. त्याने कॅमेरूनला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवून इतिहास घडवला. विश्वचषकाच्या इतिहासात क्वार्टर फायनल गाठणारा तो पहिलाच आफ्रिकन संघ ठरला. तेव्हापासून आफ्रिका दार ठोठावत होती. २००२ मध्ये सेनेगलने, २०१० मध्ये घानाने आणि २०२२ मध्ये मोरोक्कोने त्या दारावर आणखी जोरात टकटक केली. मोरोक्कोने तर उपांत्य फेरी गाठत आफ्रिकेची स्वप्ने नव्या उंचीवर नेली.आणि मग आला २०२६चा विश्वचषक.
४८ संघांच्या विस्तारित स्पर्धेत आफ्रिकेने अक्षरशः धुमाकूळ घातला. दहापैकी तब्बल नऊ आफ्रिकन संघांनी बाद फेरी गाठली. दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, आयव्हरी कोस्ट, केप व्हर्डे, इजिप्त, सेनेगल, घाना, डीआर काँगो आणि अल्जेरिया यांनी जगाला दाखवून दिले की, वाढीव जागा हा आफ्रिकेला दिलेला उपकार नव्हता; ती त्यांच्या गुणवत्तेची योग्य दखल होती. केप व्हर्डेसारख्या छोट्या देशाने स्पेनला अडचणीत आणले, डीआर काँगोने इंग्लंडला घाम फोडला, इजिप्तने बलाढ्य संघांना झुंजवले, तर मोरोक्कोने सह-यजमान कॅनडाचा पराभव करून पुन्हा एकदा आफ्रिकेचा झेंडा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेला.
फ्रान्सने मोरोक्कोचा प्रवास थांबवला आणि कागदोपत्री आफ्रिकेचे आव्हान संपले.
पण खरंच संपलं का?
इथेच या विश्वचषकाने सर्वांत मोठा विरोधाभास समोर आणला.
मोरोक्को बाहेर पडला, पण उपांत्यपूर्व फेरीत उरलेल्या संघांकडे पाहिल्यावर एक वेगळेच चित्र दिसते. अर्जेंटिना आणि नॉर्वे वगळता फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंड या संघांमध्ये आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंची अक्षरशः रेलचेल आहे.
फ्रान्सकडे तब्बल ११ आफ्रिकन वंशाचे खेळाडू आहेत. किलियन एम्बाप्पे, ऑरेलियन त्चौमेनी, इब्राहिमा कोनाते, विल्यम सॅलिबा, मायकेल ओलिसे, उस्मान डेंबेले, एडुआर्डो कामाविंगा, ब्रॅडली बारकोला, रँडल कोलो मुआनी, दिजिरे डुए आणि वॉरेन झैर-एमरी यांसारखे खेळाडू फ्रेंच फुटबॉलचा कणा बनले आहेत.
बेल्जियममध्ये रोमेलू लुकाकू, जेरेमी डोकू, अमाडू ओनाना, लोइस ओपेंडा, ऑरेल मंगाला आणि मालिक फोफाना आहेत. इंग्लंडमध्ये बुकायो साका, एबेरेची एझे, नोनी मादुके आणि कर्टिस जोन्ससारखे खेळाडू निर्णायक भूमिका बजावत आहेत. स्पेनमध्ये लॅमिन यामाल, निको विल्यम्स आणि समू ओमोरोडिऑन ही नवी आफ्रिकन मुळे असलेली पिढी युरोपियन फुटबॉलचा चेहराच बदलत आहे. स्वित्झर्लंडमध्ये ब्रेल एम्बोलो, डॅन एनडोये आणि जोएल मॉन्टेरो आहेत.
मोरोक्कोला बाजूला काढले, तरी उरलेल्या संघांमध्ये जवळपास ३० आफ्रिकन वंशाचे खेळाडू विश्वचषकाच्या जेतेपदासाठी लढत आहेत. यालाच फुटबॉलच्या भाषेत ‘ब्लॅक गोल्ड’ म्हणतात.
एके काळी आफ्रिकेतील कच्च्या प्रतिभेला युरोपियन लब शोधून नेत होते. आज तीच प्रतिभा युरोपियन फुटबॉलच्या महासत्तांचा कणा बनली आहे. आफ्रिकेतील अकादमी, रस्त्यावरील फुटबॉल, स्थलांतरित कुटुंबांचा संघर्ष आणि युरोपमधील प्रशिक्षण व्यवस्था यांचा संगम आज जागतिक फुटबॉलची व्याख्याच बदलत आहे.
म्हणूनच फ्रान्सने मोरोक्कोला हरवले, हा फक्त स्कोअरबोर्डवरील निकाल आहे.
खरा निकाल वेगळाच आहे.
१९९० मध्ये रॉजर मिलाने आफ्रिकेला विश्वचषकाच्या नकाशावर आणले. २०२६ मध्ये आफ्रिकेने स्वतःला जगाच्या फुटबॉलच्या केंद्रस्थानी आणून ठेवले.
ट्रॉफी कोण उचलेल, हे अजून ठरायचे आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे,विश्वचषक जिंकणारा देश कोणताही असो, त्याच्या विजयात आफ्रिकेचा वाटा नक्कीच असेल!