शिक्षिका, समाजसेविका आणि संघटक म्हणून शिक्षण, महिला सक्षमीकरण व सामाजिक उपक्रमांचा सातत्याने ध्यास घेतलेल्या स्मिता शिरसाट-कवडे यांच्या कार्याचा हा परिचय...
समाजकारण ही केवळ व्यासपीठावरील भाषणे किंवा संस्थेतील पदांपुरती मर्यादित गोष्ट नसते. एखाद्या मुलाला शिक्षणाची संधी मिळवून देणे, महिलांच्या हाताला रोजगार देणे, समाजात जागृती घडविणे आणि अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहणे, यातूनच समाजपरिवर्तन घडत असते. अशाच कृतिशील वाटेवर सातत्याने कार्य करणार्या स्मिता कवडे यांनी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यांची प्रभावी सांगड घालत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भायखळ्यातील ‘बीआयटी’ चाळीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अंबादास शिरसाट हे सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणारे कार्यकर्ते होते; तर मामा भाई संगारे हे ‘दलित पॅन्थर’ चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित होते. त्यामुळे सामाजिक न्यायाची जाणीव, संघटनशीलता आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना घरातूनच मिळाली. १९९८ मध्ये सुशांत कवडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी समाजकार्याची वाटही तेवढ्याच निष्ठेने सुरू ठेवली.
‘बीएस्सी’ (रसायनशास्त्र) आणि ‘बीएड’ शिक्षण पूर्ण करून त्यांनी अध्यापन क्षेत्राची निवड केली. विक्रोळी येथील माध्यमिक विद्यालयात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून जवळपास १९ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान दिले. सध्या त्या दिवा येथील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ‘सीबीएसई’ विभागाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.
महिलांच्या अडचणी जवळून अनुभवल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्था’ स्थापन केली. सुरुवातीच्या आर्थिक अडचणींवर मात करत स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांनी जागा घेतली, २२ शिवणयंत्रे उपलब्ध करून दिली आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. शिवणकाम, ज्यूटच्या पिशव्या, सजावटीचे हार तयार करण्याचे प्रशिक्षण देत अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.
आर्थिक परिस्थितीमुळे खासगी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ न शकणार्या मुलांसाठी त्यांनी ‘विद्यासंकुल’ हे मोफत पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्र सुरू केले. विविध आरोग्य शिबिरांसह भन्तेंसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून शिक्षणाबरोबरच आरोग्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.
मुलुंड येथील बौद्धविहाराच्या त्या गेली ११ वर्षे सचिव आहेत. संविधान दिन, बुद्ध पौर्णिमा, वर्षावासातील धम्मदेशना, माता रमाई, भीमाई आणि जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती, व्याख्यानमाला, महिलांची वॉकथॉन, पथनाट्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्या सातत्याने आयोजन करतात. ‘मी रमा बोलते’ हा त्यांचा एकपात्री प्रयोग अनेक ठिकाणी सादर झाला असून, त्या उत्कृष्ट सूत्रसंचालिका, गायिका आणि नृत्यदिग्दर्शक म्हणूनही परिचित आहेत.
संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘घर घर संविधान’ या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, तसेच बुद्धविहारांमध्ये ‘संविधान ग्रंथां’चे वितरण केले. संविधान केवळ ग्रंथापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाच्या जीवनाचा मार्गदर्शक बनावे, हा या उपक्रमामागील त्यांचा उद्देश आहे.
‘दिशा’ सामाजिक संस्था, महाराष्ट्र नशाबंदी मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ग्राहक पंचायत महाराष्ट्र आदी संस्थांमध्ये त्या सक्रिय सदस्य आहेत. ‘एमसीएफ’ संघटनेच्या ‘टी वॉर्ड’ प्रतिनिधी म्हणून त्या कार्यरत आहेत. मुंबई पोलिसांच्या मोहल्ला समिती व दक्षता समितीच्या माध्यमातून शाळांमध्ये ‘गुड टच-बॅड टच’ विषयावरील जनजागृती सत्रे त्या नियमित घेतात. गेली तीन वर्षे तृतीयपंथीयांसाठी ‘फॅशन-शो’चे आयोजन करून त्यांनी सामाजिक समावेशकतेचा संदेश दिला. २०१९ ते २०२१ याकाळात ‘सत्यमेव जयते’ या ‘युट्यूब’ वृत्तवाहिनीवर वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.
‘कोरोना’ काळात मास्क, सॅनिटायझर आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करताना ‘स्वॅब’ चाचणीबाबत भीती असलेल्या महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी स्वतः अनेक वेळा ‘स्वॅब’ चाचणी करून घेतली. संकटाच्या काळात लोकांचा विश्वास मिळविणे, हेच समाजकार्याचे खरे बळ असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
त्यांच्या कार्याचा विविध पुरस्कारांनी गौरव झाला आहे. २०११ मध्ये ‘बेस्ट हेडमिस्ट्रेस’, २०१४ व २०१५ मध्ये दिल्ली येथे ‘बेस्ट सोशल वर्कर’, २०२२ मध्ये ‘विक्रोळीरत्न’ पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. अलीकडेच ‘विवेक विचार मंच’, ‘बार्टी’, ‘आर्टी’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला. तसेच दादर ‘आयटीआय’ गर्ल्स समितीवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या वाट्याला संघर्षही कमी आले नाहीत. विक्रोळीतील प्रशिक्षण केंद्र एका मैत्रिणीच्या सहकार्यामुळे कमी भाड्यात सुरू झाले होते. मात्र, ‘कोरोना’च्या काळात त्या मैत्रिणीच्या निधनानंतर केंद्राला पूर्वसूचना न देता कुलूप लावण्यात आले आणि जवळपास ८० हजार रुपयांचे साहित्य अडकले. अनेक प्रयत्न निष्फळ ठरले; तरी त्यांनी हार न मानता दोन वर्षांनी पुन्हा शून्यातून संस्था उभी केली.
युवकांसाठी प्रशिक्षण संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवाभावी वृद्धाश्रम उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि संघटनकौशल्य यांची सांगड घालत त्यांची वाटचाल आजही अविरत सुरू आहे.दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे स्मिता शिरसाट-कवडे यांना त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
सागर देवरे
९९६७०२०३६४