फिलीपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि इतर कारणांमुळे ‘महाभियोग’ खटला सुरू आहे. भ्रष्टाचार किंवा हुकूमशाही दहशतवादासोबतच इस्लामच्या नावाने फुटीरतावादाशीही सारा दुतेर्तेचे असलेले भाईचार्याचे नाते. ‘आपले ऐकले नाही, तर फिलीपिन्समधील मिंडानाओ प्रांत फोडून नवीन देश बनवू,’ अशी धमकीच साराच्या वडिलांनी म्हणजे माजी राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी स्पष्टपणे दिली. थोडक्यात, पुरोगामी निधर्मीपणाचा मुखवटा घालत ‘शरियाराज’ आणण्याचे मनसुबे रचत, थेट देशाचे तुकडे करण्याची भाषा करणारे लोक आपल्या इकडेच आहेत असे नाही; तर हेच फिलीपिन्स या देशातही सुरू आहे.
तसे पाहायला गेले, तर सध्याचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस आणि सारा दुतेर्ते यांनी ‘युनिटी टीम’ बनवत एकत्र निवडणूक लढवली होती. मार्कोस राष्ट्रपती, तर सारा उपराष्ट्रपती झाल्या. मात्र, काही काळाने दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. चीनने फिलीपिन्सच्या जहाजावर हल्ले केले. तेव्हा सारासह तिचे राजकीय कुटुंब गप्प राहिले. उलट, त्यांनी चीनचे समर्थन केले. दुसरीकडे मार्कोस सत्तेत येताच, त्यांनी अमेरिकेशी घनिष्ट संबंध वाढवायला सुरुवात केली. याचाच अर्थ, राष्ट्रपती मार्कोस हे अमेरिकेचे समर्थक, तर सारा दुतेर्ते या चीनच्या समर्थक असे चित्र निर्माण झाले. याच काळात सारा यांनी उपराष्ट्रपती कार्यालयासाठी आणि शिक्षण मंत्रालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वापरला. मात्र, त्याचा ताळमेळ, हिशोब देण्यात त्या अपयशी ठरल्या. त्यात भ्रष्टाचार झाला असे मानून, मार्कोस यांच्या भावाने साराच्या चौकशीची मागणी केली. या चौकशीमुळे सारा संतापल्या. त्यातच मार्कोस यांनी देशाच्या संविधानामध्ये थोडा बदल करण्याचे ठरवले. त्यावेळी दुतेर्ते या कुटुंबाने विरोध केला. त्यांना वाटले, संविधानात बदल करून मार्कोस कायमस्वरूपी सत्तेत राहतील. त्यामुळे साराविरोधात मार्कोस वाद चांगलाच जुंपला. दुसरीकडे एका पत्रकार परिषदेत सारा दुतेर्ते यांनी जाहीरपणे म्हटले की, "जर माझी हत्या झाली, तर मी एका शूटरला अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस, त्यांची पत्नी आणि संसद अध्यक्षांची हत्या करण्याचे आदेश आधीच दिले आहेत.”
या सगळ्या गदारोळात साराचे वडील जे पूर्वी देशाचे राष्ट्रपती होते; ते म्हणाले, "राष्ट्रपती मार्कोस यांनी संविधानात बदल केला, तर ते फिलीपिन्समधील मिंडानाओ प्रांत फोडून नवीन देश बनवतील.” त्यांच्या या विधानामुळे फिलीपिन्सचे वातावरण ढवळून निघाले. कारण, फिलीपिन्समध्ये ७८ टक्के ख्रिश्चन लोक राहतात. मात्र, मिंडानाओ हा १५व्या शतकापासून इस्लामिकबहुल प्रांत आहे. इथे ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने पाहात अनेक इस्लामिक दहशतवादी संघटना निर्माण झाल्या. त्यांनी फिलीपिन्समध्ये दहशतवाद माजवला. २०१७ साली तर ‘मौते’ आणि ‘अबू सय्याफ’ या दहशतवादी संघटनांनी ‘इसिस’च्या इशार्यावर मिंडानाओमधील ‘मरावी’ या संपूर्ण शहरावर कब्जा केला.
हे शहर दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी फिलीपिन्सच्या लष्कराला तब्बल पाच महिने युद्ध करावे लागले. यात एक हजारांहून अधिक लोक मारले गेले आणि संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. सध्या मिंडानाओमध्ये थोडी शांती आहे. मात्र, शांततेची प्रक्रिया सुरू असताना साराच्या वडिलांनी पुन्हा मिंडानाओ स्वतंत्र करण्याचे विधान केले.
सारा आणि तिचे वडील हे ख्रिस्ती असून, ते इस्लामबहुल मिंडानाओबद्दल का इतके आग्रही असतील? तर, दुतेर्ते कुटुंब हे मूळचे मिंडानाओ इथले. तिथल्या इस्लामी जनतेला सोबत घेऊन म्हणजे, अक्षरशः मुस्लिमांचे लांगूलचालन करत दुतेर्ते हे देशाचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या मुलाने एका मुस्लीम महिलेशी विवाह केला आणि आता त्यांच्या नातवाने अधिकृतरीत्या इस्लाम स्वीकारला आहे. यामुळे मिंडानाओची मुस्लीम जनता दुतेर्तेच्या समर्थनार्थ आहे. फिलीपिन्सचे वास्तव आहे की, देशभरातली जनता मतदानाच्या वेळी दुभंगते. मात्र, मिंडानाओचे मुस्लीम एकगठ्ठा मतदान करतात. ते ज्यांना मतदान करतात, तेच फिलीपिन्समध्ये सत्तेत येतात. त्यामुळे दुतेर्ते कुटुंब इस्लामचा पुरस्कार करत असते. या सगळ्यामुळे इथला बहुसंख्य ख्रिस्ती समाज सारा दुतेर्तेच्या विरोधात जात आहे. सारावर सुरू असलेल्या ‘महाभियोग’ खटल्यामुळे हे सगळे पुन्हा उजेडात आले.
९५९४९६९६३८