पराभवाचा कट की विजयाचं कौशल्य?

    10-Jul-2026   


Messi FIFA World Cup 2026 Conspiracy
 
२००३च्या विश्वचषक अंतिम सामन्यात रिकी पाँटिंगने भारताविरुद्ध १४० धावांची वादळी खेळी केली, तेव्हा त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा भारतीय क्रिकेटरसिकांत पसरली होती.
 
विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा पराभवाचं दुःख पचवणं खूप अवघड असतं. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. तो पराभव भारतीय चाहत्यांच्या इतका जिव्हारी लागला; कारण त्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत केवळ एकच सामना गमावला होता आणि तोही नेमका अंतिम सामना! त्यात रिकी पाँटिंगची १२१ चेंडूंत नाबाद १४० धावांची वादळी खेळी. त्याचे षटकार इतके लांब जात होते की क्रिकेटविश्व थक्क झाले होते. दुसर्‍याच दिवशी अफवा उठली, पाँटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आढळल्याने ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेतेपद रद्द करून भारताला बहाल करण्यात आले! अर्थात, ही केवळ अफवा होती. पण त्या अफवेने लाखो भारतीय चाहत्यांच्या जखमेवर क्षणभर फुंकर घातली होती.
 
इतके हे पाल्हाळ लावण्याचे कारण म्हणजे, फिफा विश्वचषक २०२६ मध्ये अर्जेंटिनाने इजिप्तवर मिळवलेला अविश्वसनीय विजय. ०-२ अशा पिछाडीवर असताना अखेरच्या ११ मिनिटांत अर्जेंटिनाने तीन गोल झळकावत विजय अक्षरशः इजिप्तच्या जबड्यातून खेचून आणला. अंतिम शिट्टी वाजताच सोशल मीडियावर एकच गदारोळ उडाला ‘हा सामना फिक्स होता’, ‘फिफाला मेस्सीला पुढे न्यायचं आहे’, ‘व्हीएआरचा वापर अर्जेंटिनासाठी झाला’ अशा हजारो पोस्ट्स काही मिनिटांत जगभर व्हायरल झाल्या. इजिप्तचे प्रशिक्षक होसम हसन यांनी, तर थेट पंचांवर आणि ‘फिफा’वरच प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांचा आरोप होता की, अर्जेंटिनाच्या बाजूने दुहेरी निकष लावण्यात आले. त्यांचा एक गोल ‘व्हीएआर’ने रद्द केला, दोन संभाव्य पेनल्टी नाकारल्या आणि अर्जेंटिनाचा निर्णायक गोल मात्र कायम ठेवला. एवढंच नव्हे, तर सामन्याचे पंच फ्राँस्वा लेटेक्सिए यांना उर्वरित स्पर्धेतून हटवण्याची मागणीही करण्यात आली.
 
पण प्रश्न असा आहे की, वादग्रस्त निर्णय म्हणजे कटकारस्थानाचा पुरावा ठरतो का?
उत्तर आहे, ‘नाही!’
 
इजिप्तचा रद्द झालेला गोल हा आक्रमणाच्या सुरुवातीलाच झालेल्या ‘फाऊल’मुळे रद्द करण्यात आला. ‘व्हीएआर’च्या नियमांनुसार तो निर्णय शक्य होता. इजिप्तने मागितलेल्या दोन पेनल्टींचेही व्हिडिओ अनेकदा तपासण्यात आले. संपर्क झाला होता, पण तो पेनल्टी देण्याइतका स्पष्ट आणि निर्णायक नव्हता. फुटबॉलच्या नियमांनुसार प्रत्येक स्पर्श हा ‘फाऊल’ नसतो. त्यामुळे निर्णय वादग्रस्त असू शकतात; पण ते नियमबाह्य होते, असं म्हणता येत नाही.
 
खरं तर, हा प्रकार नवीन नाही. फुटबॉलच्या इतिहासात प्रत्येक दशकात एखादा सामना पंचांच्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेटमध्ये ‘डीआरएस’वरून वाद होतात, टेनिसमध्ये लाईन कॉलवरून चर्चा होते, तर फुटबॉलमध्ये ‘व्हीएआर’वरून आरोप होतात. तंत्रज्ञान आलं, पण मानवी भावना बदलल्या नाहीत.
 
या प्रकरणात आणखी एक मानसशास्त्रीय पैलू आहे. जेव्हा समोर लिओनेल मेस्सीसारखा जागतिक सुपरस्टार असतो, तेव्हा त्याच्या संघाच्या बाजूने गेलेला प्रत्येक निर्णय संशयाच्या भोवर्‍यात अडकतो. कारण लोकांना महान खेळाडूंच्या यशामागे असामान्य कौशल्यापेक्षा अदृश्य शक्ती शोधण्यात जास्त रस असतो.
 
पराभव स्वीकारणं हे विजय साजरा करण्यापेक्षा नेहमीच कठीण असतं. म्हणूनच, २००३ मध्ये पाँटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग शोधली गेली. २००७ मध्ये गिलख्रिस्टच्या ग्लोव्हमधील स्क्वॉश बॉलवर चर्चा झाली. आणि आता २०२६ मध्ये मेस्सीसाठी ‘फिफा’ने कट रचल्याची कथा रंगवली जात आहे. पण इतिहास एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, अफवा या पराभवातून जन्म घेतात, तर पुरावे मात्र सत्यातून! इजिप्तच्या वेदना खर्‍या असू शकतात, निर्णयांवर मतभेदही असू शकतात; पण आजवर समोर आलेल्या तथ्यांमध्ये ‘फिक्सिंग’ किंवा मेस्सीसाठी आखलेल्या कटाचा कोणताही ठोस पुरावा नाही. कदाचित, म्हणूनच खेळ आपल्याला केवळ जिंकायला शिकवत नाही; तो पराभव स्वीकारायलाही शिकवतो. आणि ज्या दिवशी पराभवाचं दुःख स्वीकारण्याची ताकद येते, त्यादिवशी कटकारस्थानांच्या कथा आपोआप संपतात.




संबंधित मजकूर