अभूतपूर्व पावसाने राज्य हादरले; सरकार कुठेही कमी पडले नाही : मंत्री गिरीश महाजन

अतिवृष्टीत 63 जणांचा मृत्यू; सर्व प्रभावित जिल्ह्यांना प्रत्येकी 1 कोटींचा निधी

Maharashtra Heavy Rain Update
 
मुंबई : (Maharashtra Heavy Rain Update) राज्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती ही यापूर्वी कधीही न अनुभवलेली असल्याचे सांगत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारने सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती दिली. राज्यावर आलेल्या या नैसर्गिक संकटाच्या काळात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांच्या मदतीसाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अल निनोच्या परिणामामुळे यंदाचा पाऊस साधारण महिनाभर उशिरा येईल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, एकदा सुरू झाल्यानंतर काही भागांमध्ये एका दिवसातच 400 ते 500 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल, असा अंदाज कोणालाही नव्हता. परिणामी अनेक शहरांतील रस्ते जलमय झाले, गावांचा संपर्क तुटला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. (Maharashtra Heavy Rain Update)
त्यांनी सांगितले की, राज्यातील परिस्थिती सर्वत्र सारखी नाही. रायगड, रत्नागिरी, मुंबई, वसई-विरार आणि नाशिक या भागांत अतिवृष्टी झाली असताना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांसमोर पेरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Maharashtra Heavy Rain Update)
मुंबईत वादळी वाऱ्यांचा मोठा फटका
मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेताना महाजन म्हणाले की, शहरातील काही भागांमध्ये 400 मिमीपर्यंत पाऊस झाला. त्यातच ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली. साधारणपणे दरवर्षी मुंबईत 750 ते 800 झाडे कोसळतात; मात्र यंदा एकाच दिवशी तब्बल 400 झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले. या दुर्घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून झाडे कोसळण्यामागील कारणांचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
समुद्राला आलेल्या भरतीमुळे पावसाचे पाणी बाहेर जाण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे अनेक सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. मानखुर्द येथे इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे सांगत महाजन म्हणाले की, त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक आमदार अबू आझमी यांनीही धोकादायक इमारतींबाबत कारवाई करताना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे भरतीच्या काळात पाण्याचा निचरा होण्यास मर्यादा येतात, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Heavy Rain Update)
पालघर, वसई-विरार आणि नाशिकमध्ये प्रशासन सज्ज
महाजन यांनी पालघर, वसई-विरार आणि नाशिक जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती दिली. नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता आणि त्यावेळी ते स्वतः जिल्ह्यात उपस्थित होते. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून त्यांना पुढील दहा दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याच्या किटचे वितरण करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात एक हजार नागरिकांना मदत किट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वसई-विरारमध्ये अनेक भागांतील मोबाईल नेटवर्क पूर्णपणे खंडित झाले असून दूरसंचार यंत्रणा पाण्याखाली गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाईल सेवा कंपन्यांशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Heavy Rain Update)
सर्व जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटींचा निधी
राज्य सरकारने आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना तातडीने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्याची तयारी असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. "सरकार म्हणून या आपत्तीत आम्ही कुठेही कमी पडलो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत," असे त्यांनी सांगितले.
राजकारण टाळून एकत्र येण्याचे आवाहन
या नैसर्गिक संकटाच्या काळात विरोधकांनी सरकारवर टीका करण्याऐवजी नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन महाजन यांनी केले. राज्यावर संकट आले असताना सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मिसिंग लिंक प्रकल्पावर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. "मिसिंग लिंक प्रकल्पाचे सात हजार कोटी रुपये पाण्यात गेले, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात प्रकल्पापासून शंभर ते दीडशे फूट अंतरावरून पाणी वाहत आहे. रस्त्याला कोणतेही नुकसान झालेले नाही. केवळ सरकारची बदनामी करण्यासाठी चुकीची माहिती पसरवू नये," असे त्यांनी स्पष्ट केले.
63 जणांचा मृत्यू; निकषांनुसार मदत
या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाजन यांनी दिली. यामध्ये भिंत कोसळून 6, झाड कोसळून 6, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 2, दरड कोसळून 6 आणि वीज कोसळल्याने सर्वाधिक 23 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत्यू विविध कारणांमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली असून ही मदत शासनाच्या निकषांनुसार दिली जात आहे. मदत वाटपात कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Heavy Rain Update)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर