तस्करांची साखळी तुटणार! कल्याण पोलिसांचा मोठा प्रहार

    26-Jun-2026   
 
Kalyan Police
 
राज्यात बंदी असूनही गांजा, चरस, एमडी पावडर इत्यादी अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. म्हणूनच अमली पदार्थांच्या पुरवठादारांपासून ते व्यसनात गुरफटलेल्यांची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष टास्क फोर्स तैनात केले आहेत. या माध्यमातून ‘कल्याण परिमंडळ ३’चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनीदेखील ही साखळी तोडण्यासाठी कंबर कसली असून, त्यांची एकूणच दमदार कामगिरी पाहता, ‘अमली पदार्थ तस्करांचे कर्दनकाळ’ अशी त्यांची ओळख बनली आहे. तेव्हा, आज ‘आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती दिना’निमित्ताने डीसीपी झेंडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
 
आपण ‘कल्याण परिमंडळ ३’चे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून, अमली पदार्थविरोधी आजवर केलेल्या कारवाईविषयी काय सांगाल?
 
ऑटोबर २०२४ मध्ये ‘कल्याण परिमंडळ ३’च्या पोलीस उपायुक्तपदाचा पदभार मी स्वीकारला. त्यावेळी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी मोहीम ठाणे आयुक्तालयात हाती घेण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवलीत ही कारवाई करण्यात आली. ‘परिमंडळ ३’च्या स्तरावर अमली पदार्थविरोधी यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. एक ते दीड वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे १०० हून अधिक गुन्हे उघडकीस आणून तब्बल २०० आरोपी जेरबंद केले आहेत. यामध्ये केवळ कल्याण-डोंबिवलीतीलच नाही, तर राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोपीचा समावेश आहे. त्यामध्ये एमडी, चरस, गांजा, हेरॉईन असे विविध प्रकारचे ड्रग्ज या मोहिमेत पकडले आहेत.
 
ड्रग्जसारखे अमली पदार्थ यापूर्वी केवळ मुंबईसारख्या शहरी भागापुरते होते. पण, आता त्याची पाळेमुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली यांसारख्या भागांतही आढळतात. तेव्हा, नेमकी यामागची काय कारणे आहेत, असे तुम्हाला वाटते?
 
कल्याण हे जंशन आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक कोपर्‍यातून रेल्वेगाड्या या ठिकाणी येतात. त्यातून अमली पदार्थांची वाहतूक करणे सोपे जाते. आपण अशा प्रकारे रेल्वेमधून मादक पदार्थांची तस्करी करणार्‍या काही टोळ्यांची धरपकड केली आहे. मुंबईच्या तुलनेत कल्याण शहरातील घरांचे भाडे हे कमी दरात असल्याने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आलेले सहारा घेण्यासाठी अशा घरांचा वापर करतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या तिन्ही शहरांच्या जवळ कल्याण शहर असल्याने, तेथून अमली पदार्थांचा व्यापार करणे सहज शक्य होते.
 
कल्याण-डोंबिवली परिसरात कोणत्या विशिष्ट प्रकारच्या अमली पदार्थांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे कारवाईअंती समोर आले? त्यामागे काही मोडस ऑपरेंडी आहे का?
 
आतापर्यंत अमली पदार्थांच्या कारवाईत सर्वाधिक साठा हा गांजाचा आढळून आला आहे. आता नव्याने ‘एमडी पावडर’ हेदेखील पकडले गेलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. चरस, हेरॉईन हेदेखील काही प्रमाणात सापडले आहे. अमली पदार्थ मुंबईतून कल्याण मार्गे विविध ठिकाणी पोहोचविला जातात आणि काही अमली पदार्थांचा ओडिशातून रेल्वेचा वापर करून आपल्याकडे पुरवठा केला जातो. या प्रकरणी आरोपींना जेरबंद करून आतापर्यंत २५ ते ३० जणांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईदेखील करण्यात आली आहे. अमली पदार्थांचा माल आला कोठून आणि कुठे जाणार होता, याचा सखोल तपास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतो.
 
मध्यतंरी ‘नेस्को ड्रग्ज’ प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी चार आरोपी हे उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील, तर टिटवाळ्यात एका महिलेकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. तेव्हा या परिसरात अमली पदार्थांचा एवढा साठा आढळण्याचे कारण काय वाटते?
 
कल्याण हे रेल्वेचे जंशन असल्याने येथून आजूबाजूच्या शहरांत माल पुरविला जातो. माल कोठून आला, तो कोणाकडून आला, त्यांचा वापर कोण करणार होता, येथेपर्यंत आमचा तपास सुरू असून अमली पदार्थ तस्करांची ही साखळी तोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
 
शाळा, महाविद्यालयांबाहेरील परिसरात सर्रासपणे अमली पदार्थांची विक्री आणि खरेदी होत असल्याच्या बातम्या ऐकावयास मिळतात. यात कितपत तथ्य आहे? आपल्या विभागाकडून याबाबत काही कारवाई होत आहे का?
 
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मादक पदार्थांचे वाढते व्यसन पाहता, आतापर्यंत केलेल्या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी मुले जात असल्याचे दिसून आले. आतापर्यंत दोन हजारांहून अधिकजणांवर ‘कोप्ता’अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये शाळा परिसरात विक्री करणारे, ते खरेदी करणार्‍याबरोबरच त्या परिसरातील पान टपरीचालकांवर जे यात सहभागी आहेत, त्यांच्यावर ही आमची कारवाई सातत्याने सुरू असते.
 
व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांच्या पातळीवर काय उपाययोजना राबविण्यात येतात? त्याचे परिणाम प्रत्यक्षात किती दिसतात? असे काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का?
 
अमली पदार्थ तस्करीची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आम्ही घेतो. जे व्यसनांच्या आहारी गेले आहेत, त्यांच्यासाठी ‘एनजीओ’च्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्रेही चालविली जातात. यामध्ये ‘दिशा फाऊंडेशन’ मोलाची भूमिका बजावत आहे. याठिकाणी व्यसनातून मुक्त झालेल्यांचे मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांना दिले जात आहे, जेणेकरून या व्यसनांपासून मुले-मुली परावृत्त होतील, असा आमचा प्रयत्न असतो.
 
केवळ पोलिसी कारवाईने हे सगळं थांबणारं नाही. पालकांनी, शैक्षणिक संस्थांनीही याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
 
सरकारने अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. अमली पदार्थ तस्करीची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू असतात. मात्र, नागरिकांचे सहकार्यही तितकेच आवश्यक आहे. तरुण आणि शाळा महाविद्यालयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचे वाढत चाललेले व्यसन पाहता, आपली मुले कोणाच्या संगतीत राहतात? त्याची दिनचर्या काय असते? त्यांचे मोबाईल चॅटिंग याकडे पालकांचे विशेष लक्ष असले पाहिजे. मुलांचे वेळीच समुपदेशन करणेदेखील आवश्यक आहे.
 
अमली पदार्थांमुळे तरुणांचं किती नुकसान होतं, हे तुम्ही जवळून पाहता, अशा स्थितीत तरुणाईने यापासून दूर राहावं, यासाठी तुम्ही तरुण पिढीला काय आवाहन कराल?
 
सध्या नकारात्मक गोष्टी आत्मसात करण्याची प्रवृत्ती तरुणांमध्ये वाढत चाललेली दिसते. त्यांनी सकारात्मक विचारांकडे वळले पाहिजे. जर कोणी अमली पदार्थांचे व्यसन करत असेल, तर त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. यातून जे व्यसन करतात, याची माहिती त्यांच्या पालकांना समजेल. चांगला विचार घेऊन तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे, तरच समाज सुधारेल, असा विश्वास मला वाटतो.




संबंधित मजकूर