झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास साहित्य, रंगभूमी, पत्रकारिता आणि विद्यापीठीय नेतृत्वापर्यंत पोहोचला. सामाजिक बांधिलकीतून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या डॉ. सुनील रामटेके यांच्याविषयी...
डॉ. सुनील रामटेके यांचे नाव मराठी साहित्य, नाट्य आणि संशोधन क्षेत्रात तसे सुपरिचित. लेखक, नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक, संशोधक आणि प्राध्यापक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी गेली अनेक दशके सातत्याने काम केले आहे. मात्र, त्यांच्या प्रवासाची सुरुवात कोणत्याही अनुकूल परिस्थितीत झालेली नाही. नागपूरमधील जयभीमनगर या झोपडपट्टी परिसरात त्यांचे बालपण गेले. आर्थिक अडचणी, मर्यादित साधने आणि वंचित समाजघटकांचे वास्तव हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होते. याच वातावरणाने त्यांच्या संवेदनशीलतेला आकार दिला.
बालपणापासूनच त्यांचा आंबेडकरी चळवळीशी संपर्क आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि जीवनकार्य यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वार खोल प्रभाव पडला. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टीही त्यातून विकसित झाली. पुढे त्यांच्या लेखनात, नाटकांत आणि संशोधनात ही जाणीव सातत्याने दिसून येते.
शालेय जीवनात असतानाच त्यांना आकाशवाणीवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ‘बालविहार’ या कार्यक्रमातून त्यांनी अभिनय आणि लेखनाची सुरुवात केली. त्याकाळात ‘आकाशवाणी’च्या अनुराधा जोशी यांनी अनेक नवोदित मुलांना प्रोत्साहन दिले. झोपडपट्टीत राहणार्या मुलांनाही कला आणि अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळू शकते, याचा अनुभव डॉ. रामटेके यांनी प्रत्यक्ष घेतला. पुढे हा अनुभव त्यांच्या आत्मविश्वासाचा महत्त्वाचा आधार ठरला.
विदर्भातील पथनाट्य चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला. पथनाट्य हे त्यांच्यासाठी केवळ कलामाध्यम नव्हते, तर समाजाशी संवाद साधण्याचे साधन होते. प्रत्यक्ष चळवळीत काम करताना मिळालेले अनुभव त्यांच्या लेखनाला दिशा देत गेले. त्याच काळात त्यांनी विविध साहित्यप्रकारांचे वाचनही मोठ्या प्रमाणात केले. अनुभव आणि अभ्यासाची सांगड घालत, त्यांनी स्वतःची लेखनशैली विकसित केली.
त्यांच्या आयुष्याच्या प्रारंभीच्या काळातील एक प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे. नागपुरात झालेल्या ६५व्या ‘अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’त त्यांनी सहकार्यांसह पथनाट्य सादर केले होते. त्या प्रयोगानंतर संमेलनाध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांनीही त्यांना भेटून प्रोत्साहन दिले. नव्या कलावंतासाठी अशा प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात. या अनुभवांमुळे त्यांच्या कामाचा उत्साह आणखी वाढला.
‘आंतरराष्ट्रीय बालिका वर्षा’च्या निमित्ताने त्यांनी ‘बालिका’ हे पथनाट्य लिहिले आणि सादर केले. स्त्रीप्रश्नांवर भाष्य करणार्या या नाटकाची त्याकाळात चर्चा झाली. त्यानंतर ‘आम्ही सारे एक आहोत’, ‘मंडल’ आणि ‘भोलाराम इंडियन’ यांसारख्या पथनाट्यांमधून त्यांनी सामाजिक विषय मांडले. विदर्भातील पथनाट्य चळवळ आणि आंबेडकरवादी नाट्य-चळवळीच्या उभारणीतही त्यांचे योगदान दखलपात्र असेच.
पत्रकारितेतील त्यांचा दशकभराचा प्रवासही महत्त्वाचा ठरला. नागपूरमधील विविध दैनिकांमध्ये पत्रकार आणि उपसंपादक म्हणून काम करताना त्यांना समाजजीवनाच्या विविध पैलूंचा जवळून परिचय झाला. लोकांचे प्रश्न, सामाजिक बदल आणि सांस्कृतिक घडामोडी यांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढील लेखन आणि संशोधनासाठी हा अनुभव उपयुक्त ठरला.
यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. कळमेश्वर येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात अधिव्याख्याता आणि कार्यकारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. पुढे ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठात त्यांची नियुक्ती झाली. सध्या ते चर्चगेट येथील विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख आहेत. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली आहे.
शैक्षणिकदृष्ट्याही त्यांची वाटचाल उल्लेखनीय राहिली. मराठी विषयात ‘एमए’, ‘एमफिल’, ‘नेट’ आणि ‘पीएचडी’ पूर्ण करताना त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून तीन ‘सुवर्णपदके’ प्राप्त केली. नाट्यशास्त्रातील ‘मास्टर ऑफ फाईन आर्ट्स’ पदवीमुळे साहित्य आणि रंगभूमी या दोन्ही क्षेत्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.
डॉ. रामटेके यांच्या कार्याचा विचार करताना ‘महासूर्य’चा उल्लेख अपरिहार्य ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील हे पहिले महानाट्य मानले जाते. ‘जाणता राजा’ पाहिल्यानंतर डॉ. आंबेडकरांवरही अशाच स्वरूपाचे भव्य नाट्य निर्माण करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यातून ‘महासूर्य’ची निर्मिती झाली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी या महानाट्यासाठी आवाज दिला. दीडशेहून अधिक कलाकारांच्या सहभागातून साकारलेल्या या नाटकाने अनेक प्रेक्षकांपर्यंत डॉ. आंबेडकरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास पोहोचवला. यावर्षी या महानाट्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘समांशी’ हे सयामी जुळ्या मुलींवरील त्यांचे नाटकही विशेष गाजले. याशिवाय, ‘चवदार तळे’ हा कवितासंग्रह, विविध समीक्षा ग्रंथ, संशोधनपर लेखन आणि ‘मराठी व्याकरणातील वादस्थळे’ यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले. साहित्य, नाट्य आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत एकाच वेळी सक्रिय राहणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य. आज डॉ. सुनील रामटेके यांचा प्रवास पाहिला; तर त्यात संघर्ष आहे, सातत्य आहे आणि अभ्यासाची भक्कम पायाभरणी आहे. झोपडपट्टीतील वास्तवापासून विद्यापीठीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरतो.
आजवरचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. समाजाशी असलेली त्यांची नाळ आणि साहित्य, संशोधन व रंगभूमीशी असलेली बांधिलकी अशीच कायम राहो. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने त्यांच्या पुढील समाजाभिमुख प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा!
९९६७०२०३६४