मोहब्बत की सजा...

    25-Jun-2026   
 
Pune Mumbai Crime and Local Train Violence
 
सध्या समाजमाध्यमांपासून ते वृत्तवाहिन्यांवरही एक विचित्र हत्याकांडाचीच चर्चा रंगलेली दिसते. २० वर्षीय सिया गोयल आणि २६ वर्षीय केतन अग्रवाल. दोघेही श्रीमंता घरची, नामांकित उद्योगपतींची मुले. फेब्रुवारीमध्ये दोघांचा साखरपुडाही थाटात पार पडला आणि नोव्हेंबरमध्ये १७ कोटी खर्चून जयपूरला एका पॅलेसमध्ये शाही विवाहसोहळ्याची तयारीही जोरात सुरू होती. पण, तत्पूर्वीच प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने सियाने केतनला लोहगडावरून खाली ढकलून दिले आणि फोटो काढताना त्याचा पाय निसटून मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण, होणार्‍या पतीच्या मृत्यूनंतरही सियाची एकूणच प्रतिक्रिया पाहून, पोलिसांना संशय झाला आणि तपासाअंती सियाचा डाव उघडा पडला. त्यामुळे मुळात केतनशी लग्नच करायचे नव्हते, तर सियाने या लग्नाला होकार का दिला? असाच प्रथमदर्शनी प्रश्न उपस्थित होणे साहजिकच! त्याची कारणेही पुढील तपासाअंती स्पष्ट होतीलही. पण, सिया आणि चेतनच्या या कृत्याने एक नव्हे, तर तिन्ही कुटुंबे क्षणार्धात उद्ध्वस्त झाली आहेत.
 
सिया २० वर्षांची असली, तरी तिचा स्वत:चा बेकरीचा व्यवसाय. इतक्या कमी वयात कुटुंबाच्या साहाय्याशिवाय व्यवसाय उभारणे शक्य नाहीच. म्हणजेच, तिला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा होता आणि स्वातंत्र्यही होतेच. मग तरीही, केतनवर प्रेम नसून त्याच्याशी लग्न करायचे नाही, हे आपल्या आईवडिलांना सांगण्याची हिंमत सियाने का दाखवली नाही? कदाचित, आईवडिलांचा दबाव असेलही, मग हीच बाब सियाने थेट केतन आणि त्याच्या कुटुंबीयांना जरी सांगितली असती, तरी हा विषय विवाहापर्यंत पोहोचलाच नसता. मुळात सिया एवढी आज्ञाधारक आणि कौटुंबिक अब्रू जपणारी सुकन्या होती, तर केतनच्या हत्येचा कट चेतनबरोबर थंड डोक्याने रचणारीही हीच सिया! दि. १८ जूनपूर्वी दि. १४ जूनलाही तिने लोहगडावरूनच केतनला एकटीने संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो अयशस्वी ठरला. म्हणून पुन्हा प्रियकरासोबत डाव आखला आणि दोघेही फसले. मुळात जी मुलगी प्रियकरासोबत होणार्‍या नवर्‍याच्या हत्येचा कट रचू शकते, तीच मुलगी तिच्या आईवडिलांना ‘मला हे लग्न करायचे नाही’ एवढेही ठामपणे सांगू शकत नाही, हे अनाकलनीयच. असो. एक शायर म्हणून गेला आहेच- ‘मोहब्बत की सजा उसने कुछ ऐसी दी हँसते हुए, आशिक की रूह तक छीन ली!’

लोकलवादाचे बळी
 
रेल्वे रूळ ओलांडताना, गर्दीमुळे लोकलमधून पडून, फलाट आणि लोकलमधील अंतराचा अंदाज न आल्याने, अशा काही कारणास्तव आतापर्यंत हजारो मुंबईकरांना जीव गमवावा लागला. पण, आता यामध्ये लोकलवादाच्या बळींचीही संख्या वाढताना दिसते. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये गर्दीमुळे होणारे वाद तसे नित्याचेच. दरवाजात उभे राहण्यापासून ते अगदी ‘फोर्थ सीट’पर्यंत वादाची ठिणगी कधीही पडू शकते. अगदी चुकून एखाद्याचा धक्का लागणे, पाय लागणे यामुळे तर शिव्यांच्या अक्षरश: लाखोल्या वाहिल्या जातात. महिलांच्या डब्यातही दीदीगिरी करणार्‍या, एकमेकींच्या झिंज्या उपटणार्‍या महिलांचे प्रकार घडले आहेत, घडत असतात. पण, आता लोकलवादाचे पर्यवसान थेट सहप्रवाशांच्या हत्येपर्यंत गेल्याने मुंबईच्या ‘सुरक्षित शहर’ या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसते.
 
मंगळवारी रात्री चर्चगेटवरून नालासोपार्‍याला जाणार्‍या लोकलमध्ये बोरिवली-कांदिवली स्थानकादरम्यान पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून वाद उफाळून आला. याच वादात मंदार लोहार या २२ वर्षीय तरुणावर रोशन सुवर्णा याने चाकूहल्ला केला. यावेळी अन्य सहप्रवाशांनीही बघ्याची भूमिका घेतली आणि चाकूहल्ला करून रोशन पसार झाला. नंतर पोलिसांनी रोशनला ताब्यात घेतले. पण, या प्रकरणामुळे हल्ली रागावरील पटकन सुटणारे नियंत्रण आणि त्यातून होणारा रक्तपात हे सर्वस्वी गंभीरच. जानेवारी महिन्यात लोकलमधील भांडणानंतर ३० वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. आता अवघ्या काही महिन्यांत पुन्हा असाच प्रकार समोर आल्याने रेल्वेप्रवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
 
मग, असे प्रकार टाळण्यासाठी उपाय तरी काय? तर, मेट्रोप्रमाणेच उपनगरीय रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवणे, प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवणे, ते २४ तास कार्यान्वित ठेवणे गरजेचे. साहजिकच, लोकलमधील प्रवाशांचा लोढा बघता, रेल्वे स्थानकांची सुरक्षा राखणे हे आव्हानात्मकच. पण, असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनालाही सक्रिय पावले उचलणे क्रमप्राप्तच. मुंबईकरांची जीवनवाहिनी ही मृत्यूची वाहिनी ठरू नये, हीच किमान अपेक्षा!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर