डोंगराळ गावातून सुरू झालेला प्रवास, मजुरीची वर्षे, शिक्षणासाठीची झुंज आणि विद्यार्थ्यांना घडवण्याची साधी, पण समृद्ध वाटचाल हीच सुधीर शेरे यांची खरी ओळख. त्यांच्याविषयी...
सातारा जिल्ह्यातील चवणेश्वर या डोंगराळ खेडेगावी जन्मलेल्या सुधीर हनमंत शेरे यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले. प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना घरापासून दूर जावे लागले. सुरूर (ता. वाई) येथील संस्थेच्या वसतिगृहात राहून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे सातार्यातील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलावे, ही त्यांची साधी अपेक्षा होती. मात्र, घरच्या परिस्थितीने त्यांना वेगळ्याच वळणावर आणून उभे केले.
कौटुंबिक जबाबदार्या वाढल्या आणि शिक्षण थांबवून त्यांना ठाण्यात मोठ्या बहिणीकडे यावे लागले. छोट्या कारखान्यातील काम, बिगारी, साफसफाई आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित विविध कामांचा अनुभव त्यांनी घेतला. एका ठिकाणी काम सुरू झाले की, काही दिवसांतच ते बंद पडायचे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागायची. मात्र, परिस्थितीशी लढताना त्यांनी कधीही हार मानली नाही.
दरम्यान, चवणेश्वरहून संपूर्ण कुटुंब ठाण्यात आले. अशा काळातही सुधीर शेरे यांच्या मनात एक स्वप्न कायम होते, ते शिक्षक होण्याचे! वर्तमानपत्रातील जाहिराती पाहून त्यांनी ‘डी.एड.’ करण्याचा निर्णय घेतला. पण, परिस्थिती इतकी बिकट होती की, सलग तीन वर्षे संधी मिळूनही त्यांना शिक्षण सुरू करता आले नाही. याच काळात त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आधार ठरल्या, त्या त्यांच्या आई आणि बहिणी. त्यांच्या पाठबळामुळे १९८९ मध्ये जव्हार येथे ‘डी.एड.’ला प्रवेश घेतला आणि संघर्षाला नवे उद्दिष्ट मिळाले. १९९१ मध्ये ‘डी.एड.’ पूर्ण झाल्यानंतर ऐरोली येथील राधिका मेघे विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. पुढे कोकण विभागीय निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण करून ग्रामीण भागात नियुक्ती मिळाली. मात्र, कुटुंब ठाण्यात असल्यामुळे त्यांनी पुन्हा शहराचा मार्ग निवडला आणि नोव्हेंबर १९९२ मध्ये सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे येथे रुजू झाले.
पुढील ३२ वर्षे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला नाही. विद्यार्थ्यांना घडवणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. मराठी आणि समाजशास्त्राबरोबरच हिंदी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांचेही अध्यापन त्यांनी केले.
शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा परीक्षा, इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच निबंध, वक्तृत्व, कथाकथन, अभिनय आणि वादविवाद स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी सलग चार वर्षे त्यांनी संहितालेखन केले. पथनाट्य, भारूड, पोवाडा आणि गोंधळ यांसारख्या लोककला प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला.
शिक्षक म्हणून काम करत असतानाच, त्यांनी स्वतःचे शिक्षणही सुरू ठेवले. ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा’तून ‘बी.ए.’, ‘बी.एड.’ आणि ‘एम.ए.’ (मराठी) या पदव्या संपादन केल्या. २००३ मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली आणि माध्यमिक विभागात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू ठेवले.शिक्षणाबरोबरच साहित्य ही त्यांची दुसरी आवड ठरली. ‘वेस’ या कवितासंग्रहाला ‘मराठी भाषा मंडळा’चा पुरस्कार मिळाला. ‘एक होती गंगा’ आणि ‘ओव्या दिनांच्या’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. विविध निबंध, कथा आणि लेखन स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळवली. उदगीर येथील ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त त्यांनी कविकट्ट्यावर कविताही सादर केल्या.
ठाण्यातील झोपडपट्टी भागातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. डोंबिवली परिसरातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठीही त्यांनी मार्गदर्शनाचे काम केले. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत देण्याचाही त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची दखल घेत, विविध संस्थांकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘दलित साहित्य अकादमी, दिल्ली’ यांच्याकडून प्रदान करण्यात येणारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप’ही त्यांना प्राप्त झाली.
दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून ते निवृत्त झाले. मात्र, निवृत्तीनंतरही मराठी विषयात मागे पडणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा संकल्प कायम आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न, हीच सुधीर शेरे मास्तरांच्या आयुष्याची खरी ओळख ठरते. आजही निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचे त्यांचे प्रयत्न कायम आहेत. त्यांच्या समाजोपयोगी आणि शैक्षणिक वाटचालीस आणि प्रयत्नांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
९१६७००५०७६