फुटबॉलच्या इतिहासात काही विक्रम असे असतात की, ते केवळ आकडे राहात नाहीत, तर एका युगाची ओळख बनतात. अर्जेंटिनाचा महानायक लिओनेल मेस्सी याने सोमवारी असाच एक इतिहास रचला. ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात दोन गोल झळकावत त्याने ‘विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू’ होण्याचा मान पटकावला.
जर्मनीचा दिग्गज मिरोस्लॉव्ह क्लोस याच्या १६ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर मेस्सीने आता १८ गोलसह नवे शिखर गाठले आहे. डॅलस येथे झालेल्या गट ‘ज’ सामन्यात अर्जेंटिनाने ऑस्ट्रियाचा २-० असा पराभव केला आणि गतविजेत्या संघाचे बाद फेरीतील स्थानही निश्चित झाले.
२० वर्षांपूर्वी दि. १६ जून २००६ रोजी अवघ्या १८ वर्षांचा असताना मेस्सीने विश्वचषकातील पहिला गोल केला होता. सर्बिया आणि माँटेनेग्रोविरुद्धच्या त्या गोलपासून सुरू झालेला प्रवास आज विश्वचषकाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. दोन दशकांनंतरही तो विक्रम मोडत आहे, नवे विक्रम घडवत आहे आणि फुटबॉलप्रेमींना थक्क करत आहे.
अर्जेंटिनाचा फुटबॉल इतिहास हा दिएगो मॅराडोनाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अर्जेंटिनाच्या ‘सुपरस्टार’ हा किताब यापूर्वी मॅराडोनाच्या ‘मालकीचा’ होता. मेस्सीने आपल्या कर्तृत्वाने हा किताब पटकावाला. मॅराडोनासारखे त्याने देशाला वर्ल्डकप (२०२२) जिंकून दिला आणि आजच्या या वर्ल्डकपमधील सर्वाधिक गोलच्या विश्वविक्रमामुळे देशालाही नवी उंची गाठून दिली.
या स्पर्धेतील अर्जेंटिनाचे सर्व पाच गोल मेस्सीच्या नावावर आहेत. वयाच्या ३५ वर्षांनंतर त्याने विश्वचषकात तब्बल १२ गोल केले आहेत. बुधवारी ३९ वर्षांचा होणारा हा ‘महानायक’ अजूनही तरुणांना लाजवेल, अशी कामगिरी करत आहे.
याच स्पर्धेत मेस्सी पुरुषांच्या विश्वचषकाच्या सहा आवृत्त्यांमध्ये खेळणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. अर्जेंटिनासाठी त्याच्या नावावर आता १२२ आंतरराष्ट्रीय गोल जमा झाले असून, केवळ पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (१४३) त्याच्या पुढे आहे.
विशेष म्हणजे, सामन्याच्या सुरुवातीलाच मेस्सीला इतिहास घडवण्याची संधी मिळाली होती. नवव्या मिनिटाला मिळालेली ‘पेनल्टी’ त्याने गमावली. चेंडू गोलपोस्टच्या उजव्या बाजूने बाहेर गेला आणि काही क्षणांसाठी संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झाले. पण महान खेळाडूंची खरी ओळख त्यांच्या पुनरागमनात असते. निराशेला शरण न जाता, मेस्सीने ३८व्या मिनिटाला शानदार गोल करत विक्रमाच्या दिशेने पाऊल टाकले. त्यानंतर दुखापत वेळेतील शेवटच्या क्षणी त्याने दुसरा गोल झळकावला आणि इतिहासाच्या पुस्तकात स्वतःचे नाव आणखी गडद अक्षरांनी कोरले.
मेस्सीचा हा प्रवास केवळ गोलांचा नाही, तर जिद्दीचा, समर्पणाचा आणि स्वप्नांवर अखंड विश्वास ठेवण्याचा आहे. मेस्सी हा केवळ एक खेळाडू नाही; तो एका पिढीच्या स्वप्नांचा, भावनांचा आणि अमरत्वाचा चेहरा बनला आहे.