‘जंतरमंतर’वरची जमवाजमवी...

    23-Jun-2026   
 
 
CJP
 
कुठलेही आंदोलन यशस्वी करण्याचे काही निश्चित ठोकताळे असतात. जसे की, आंदोलनाचा मुख्य हेतू, लोकप्रतिसाद आणि एकूणच आंदोलनाचे स्वरूप. पण, ‘सीजेपी’चे ‘जंतरमंतर’वरील हे आंदोलन नसून, केवळ उद्देशापासून भरकटत चाललेल्यांची जमवाजमवच!'
 
काल माझा रक्तदाब कमी झाला होता, पण, आज तो पुन्हा नियंत्रणात आहे. कारण, देशाची ताकद माझ्या पाठीशी आहे,” असे विचार अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलनावेळी मांडले होते. जनशक्तीच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे अण्णांच्या आंदोलनाने काँग्रेस सरकारला केवळ हादरवनूच सोडले नाही, तर त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणे सरकारला भाग पडले. आज अण्णांच्या आंदोलनानंतर १५ वर्षांनी त्याच दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या अभिजीत दीपकेचे आंदोलन सुरू आहे. दोघांमध्ये साम्य एकच-दोघेही महाराष्ट्राचे! पण, त्यापलीकडे दीपके याच्या आंदोलनाची कणभरही तुलना अण्णांच्या आंदोलनाशी होऊ शकत नाही. कारण, अण्णांच्या पाठीशी सर्वार्थाने देशवासीय दिल्लीत एकवटले होते, तर आज दीपकेला ‘आंदोलनात सहभागी व्हा,’ म्हणून वारंवार तरुणांसमोर हातापाया पडून आवाहन करण्याची वेळ ओढावलेली दिसते. त्यामुळे एकवेळ आंदोलन छेडणे जरी सोपे असले, तरी ते पूर्ण ताकदीने, न भरकटता तडीस नेणे, आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करवून घेणे, हे सर्वस्वी त्या नेतृत्वाचे कौशल्यच!
 
‘सीजेपी’च्या आंदोलनाची आणि दीपकेची पार्श्वभूमी वेगळी सांगायला नको. दीपके कोण आहे, त्याचे ‘आप’शी असलेले लागेबांधे हे आता देशासमोर आहेतच. मुद्दा सध्या ‘जंतरमंतर’वर सुरू असलेल्या तोंडदेखल्या आंदोलनाचा आणि त्याच्या भरकटलेल्या स्वरूपाचा. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी दीपके आणि टोळीची मागणी. त्यासाठी दीपके अमेरिकेतून भारतातही अवतरला. आल्या दिवसापासून कधी दिल्ली, तर कधी पुणे, बंगळुरु, लखनौ अशा आंदोलनांचाही अगदी सपाटा लावला. मुळात आंदोलनापेक्षा नुसती चार डोक्यांची जमवाजमवच ती! यादरम्यान रविवारी ‘नीट’ची पुनर्परीक्षाही निर्विघ्नपणे पार पडली. पण, तरीही दीपके प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी रेटण्यासाठी ‘जंतरमंतर’वर ठिय्या मांडून बसलेला. राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणे, यात मुळी गैर काहीच नाही. पण, हे आंदोलन मूळ उद्देशापासूनच दुरावणार नाही, आंदोलनाची दिशा बदलणार नाही, ही जबाबदारीसुद्धा मुख्य आंदोलक म्हणून दीपकेचीच. परंतु, अगदी पहिल्या दिवशी झालेल्या आंदोलनापासून ते कालपर्यंतचा घटनाक्रम पाहता, हे आंदोलन न राहता, सरकारविरोधी कंड शमवणार्‍या असंतुष्टांचा एक अड्डाच ठरलेला दिसतो.
 
दीपकेच्या आंदोलनात परवा व्यासपीठावरून ‘मेरा लिंग, मेरी मर्जी’च्या घोषणाही दिल्या गेल्या. मुळात, हे आंदोलन प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी असताना, इथे समलैंगिकांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करणे, हे अप्रस्तुतच. परंतु, या आंदोलनात ‘नीट’ परीक्षेशी काडीमात्र संबंध नसलेले ‘कॉकरोच’ सहभागी झाल्यामुळे, अगदी डफली-ढोलकीपासून ते मोदींना शिवीगाळ करणार्‍यांचाच भरणा अधिक! खरं तर, या आंदोलनाचा चेहरा म्हणून दीपकेने त्याच्या ‘जेन-झी’ साथीदारांना वेळीच समज देणे, आवर घालणे अपेक्षित होते. पण, तसे काहीही होताना दिसत नाही. उलट आंदोलनस्थळी दीपकेने ‘टाईमपास’ म्हणून क्रिकेट खेळणे, तिथेच बसून ‘जेन-झी’ने सिगारेटी फुंकणे, आसपास खाण्यापिण्याचे पदार्थ फेकून अस्वच्छता पसरविणे, हेच केविलवाणे चित्र ‘जंतरमंतर’वर दिसून आले. मुळात जर हे आंदोलन ‘नीट’ परीक्षेशी संबंधित आहे आणि ही पुनर्परीक्षा रविवारी होती, तर दीपके आणि त्याच्या साथीदारांनी ‘नीट’च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, अशी काही तसदी आजवर घेतली का? परीक्षेच्या दिवशी ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शहराशहरांत मदतीचा हात दिला का? तर नाही! तिकडे ‘जंतरमंतर’वर रविवारी हे ‘कॉकरोच’ आंदोलनस्थळी चकाट्या पिटत होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ताफ्यामुळे ‘नीट’च्या परीक्षार्थींच्या प्रवासात अडसर नको, म्हणून दिल्ली विमानतळावरच ४५ मिनिटे प्रतीक्षा करणे पसंत केले. पण, दिल्लीतच आंदोलन करणार्‍या दीपके आणि झुरळांच्या टोळीला ‘नीट’च्या परीक्षार्थींसाठी आपणही काही करावे, असे तसुभरही वाटले नाही.
 
केवळ चार डोकी गोळा करून विरोधात घोषणाबाजी केली, तरी हल्ली कुत्रंही विचारत नाही. म्हणूनच आंदोलनासाठी सर्वार्थाने जनशक्तीचे तगडे समर्थन हवे. राज्यशास्त्रात ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’च्या डॉ. एरिका चेनोवेथ यांनी विकसित केलेला ‘साडेतीन टक्क्यांचा नियम’ प्रसिद्ध आहे. त्यानुसार, कोणत्याही देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ साडेतीन टक्के लोक जर एखाद्या ध्येयासाठी एकत्र येऊन सातत्याने आणि पूर्णपणे अहिंसक मार्गाने (उदा. निदर्शने, संप, बहिष्कार) आंदोलन करत असतील, तर त्या देशातील सरकारला सहसा सत्तेवरून पायउतार व्हावे लागते किंवा तिथे मोठे राजकीय परिवर्तन घडू शकते. आता ‘सीजेपी’च्या आंदोलनाला ऑनलाईन उत्स्फूर्त प्रतिसाद असला, तरी जमिनीवर प्रत्यक्ष आंदोलकांची संख्याच महत्त्वाची ठरते. त्यामुळे सीडेतीन टक्के सोडाच, इथे ०.०००३ टक्केही (म्हणजे १४० अब्ज देशाची लोकसंख्या ग्राह्य धरली, तर ४ लाख, २० हजार) समर्थकांची उपस्थिती नाहीच!
 
मग काय, ‘जंतरमतर’वर जमवाजमवीसाठी दीपकेने थेट शेतकर्‍यांनाच या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. शेतकरी का? तर म्हणे, शेतकर्‍यांच्या आंदोलनावेळी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता त्याची परतफेड म्हणून शेतकर्‍यांनी या आंदोलनात सामील व्हावे, असा दीपकेचा अजब तर्कट! मुळात, आधीच मान्सूनने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबलेल्या; त्यात त्यांचा या आंदोलनाशी दुरान्वयाने संबंधही नाही. मग शेतकरी आंदोलक हवे कशाला? तर गेल्या वेळी शेतकरी आंदोलनामुळे अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. तेव्हा, आताही शेतकर्‍यांनी दिल्लीकडे कूच करावी आणि आंदोलनाचा भडका उडावा अन् सरकारने नमते घ्यावे, असे दीपकेचे अराजकवादी मनसुबे! शेतकरी आंदोलक सोडाच, विरोधकांनीही या आंदोलनाला तोंडदेखले समर्थन दिले असले, तरी आपली शक्ती दीपकेच्या मागे उभी केलेली नाहीच. अपवाद काय तो फक्त ‘आप’चाच!
 
‘मला अटक केली तर जेल-भरो आंदोलन करा’ अशीही कोल्हेकुई दीपकेने करून पाहिली. पण, पोलिसांनी अजून तरी त्याला साधा हातही लावलेला नाही. अटक केली की दीपके सहानुभूती लाटून ‘हिरो’ व्हायचा प्रयत्न करण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे आधीच भरकटलेल्या झुरळांची ही जमवाजमव शेवटी कुठे जाऊन आदळते, ते पाहायचे!




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर