फुटबॉलच्या महासत्तेला आव्हान देण्याची जिद्द

    23-Jun-2026   

Cape Verde Football Miracle 
 
जिंकण्यासाठी काय लागते? तुमचा देश भौगलिकदृष्ट्या किती मोठा आहे? तुमची लोकसंख्या किती आहे? तुमच्या देशाची अर्थव्यवस्था किती आहे? तर याचे उत्तर आहे, यांपैकी काहीही लागत नाही. अगदी थोडयात सांगायचे झाले, तर आपल्या मुकेश अंबानीची श्रीमंतीही या देशापेक्षा मोठी आहे, तर हा देश आहे, केप व्हर्डे. स्पेनपाठोपाठ उरुग्वेलाही त्यांनी बरोबरीत रोखल्यामुळे वर्ल्डकपची बाद फेरी गाठण्याची त्यांची शक्यता वाढली आहे.
 
केप व्हर्डेच्या जिद्दी आणि लढाऊ कामगिरीने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये खर्‍या अर्थाने अंडरडॉग स्टोरीची निर्मिती केली आहे. पश्चिम आफ्रिकेच्या किनार्‍याजवळील हे छोटेसे बेटराष्ट्र, ज्याची लोकसंख्या अवघी सव्वा पाच लाख आहे, अद्याप या विश्वचषकात पराभूत झालेले नाही.
 
माजी विश्वविजेते स्पेन आणि उरुग्वे, तसेच सातव्यांदा विश्वचषक खेळणार्‍या सौदी अरेबियाचा समावेश असलेल्या गट ‘एच’मध्ये पदार्पण करणार्‍या केप व्हर्डेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
पहिल्याच सामन्यात त्यांनी २०१०च्या विश्वविजेत्या स्पेनला ०-० असे बरोबरीत रोखले. या सामन्यात गोलरक्षक व्होझिन्हा याने केलेल्या अप्रतिम बचावांमुळे जगभरातील फुटबॉलप्रेमी त्याच्याकडे आकर्षित झाले. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे ५० हजार फॉलोअर्स होते; मात्र स्पेनविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर त्याचे फॉलोअर्स तब्बल १.५ कोटींवर पोहोचले.
 
दुसर्‍या सामन्यात दोन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वेविरुद्ध त्यांनी २-२ अशी बरोबरी साधली. केविन पिनाने ‘फ्री-किक’वरून गोल करत केप व्हर्डेसाठी विश्वचषक इतिहासातील पहिलाच गोल नोंदवला, तर हेलिओ वरेलाने बरोबरीचा गोल झळकावला. विस्तारित ४८ संघांच्या या विश्वचषकातील सर्वांत मोठ्या आश्चर्यांपैकी एक म्हणून आता केप व्हर्डेकडे पाहिले जात आहे आणि त्यांच्याकडे बाद फेरीत प्रवेश करण्याचीही वास्तववादी संधी आहे. स्पेनने एक विजय आणि एक बरोबरीच्या जोरावर चार गुण मिळवत पात्रतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. नव्या ४८-संघीय विश्वचषक प्रारूपानुसार प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ थेट अंतिम ३२ संघांच्या फेरीत प्रवेश करतील. याशिवाय १२ गटांतील सर्वोत्तम आठ तृतीय क्रमांकाचे संघही पुढे जातील.
 
केप व्हर्डेने दोन सामन्यांतून दोन गुण मिळवले असून, ते गटात तिसर्‍या स्थानावर आहेत. अंतिम फेरीतील सामन्यांमध्ये स्पेनचा सामना उरुग्वेशी होणार आहे, तर केप व्हर्डेची गाठ सौदी अरेबियाशी पडणार आहे.
 
केप व्हर्डेसाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पराभव टाळावा लागेल. पराभव झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
 
बरोबरी साधल्यास आणि उरुग्वेने स्पेनविरुद्ध विजय मिळवला नाही, तर केप व्हर्डेला अव्वल दोन संघांत स्थान मिळण्याची संधी राहील. तसेच ते किमान तिसर्‍या स्थानावर तरी राहतील आणि सर्वोत्तम तृतीय क्रमांकाच्या संघांमध्ये स्थान मिळवण्याची आशा कायम राहील.
 
मात्र त्यांच्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती म्हणजे, सौदी अरेबियावर विजय मिळवणे. अशा वेळी उरुग्वे पराभूत झाल्यास ‘केप व्हर्डे’ थेट अव्वल दोनमध्ये पोहोचू शकतात. उरुग्वे जिंकले, तरी चांगल्या गोलफरकाच्या आधारे केप व्हर्डेला पुढील फेरीत प्रवेश मिळू शकतो. विजय मिळाल्यास सर्वोत्तम तृतीय क्रमांकाच्या संघांमध्ये स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता आणखी मजबूत होईल.
अवघ्या सव्वा पाच लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा देशाने फुटबॉल महासत्तांना दिलेले आव्हान हेच विश्वचषकाचे खरे सौंदर्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.




संबंधित मजकूर