‘नो रुम फॉर गोल...’

    22-Jun-2026   

Eloy Room World Record
 
फुटबॉल विश्वचषकातील क्युरासाओ आणि इक्वेडोरच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर एका हॅशटॅगने चांगलाचा धुमाकूळ घातला; तो होता ‘नो रुम फॉर गोल...’ एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १५ गोलची आक्रमणे क्युरासाओचा गोलरक्षक एलॉय रुम याने आपल्या चपळाईने परतावून लावली. विश्वचषकाच्या इतिहासातील हा एक विक्रमच आहे. पण फुटबॉलमधील विश्वविक्रमासाठी त्याला फक्त एक बचाव कमी पडला. या अविस्मरणीय कामगिरीसाठी ३७ वर्षीय रूम इक्वेडोरविरुद्धच्या मॅचमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ९० मिनिटांच्या विश्वचषक सामन्यातील ही सर्वाधिक बचावांची नोंद ठरली आहे. १९६६ पासून ‘बचावा’ची अधिकृत नोंद ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतरचा हा विक्रम असून, एकूण विश्वचषक विक्रमापेक्षा तो फक्त एका बचावाने कमी आहे. हा विक्रम अमेरिकेचा गोलरक्षक टिम हॉवर्ड याच्या नावावर आहे. त्याने दि. १ जुलै २०१४ रोजी बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात १६ बचाव केले होते.
 
रुमच्या या कामगिरीमुळे क्युरासाओने फिफा विश्वचषकाच्या गट ‘ई’मधील सामन्यात इक्वेडोरला गोलशून्य अशा बरोबरीत रोखून धरले. मात्र, या निकालामुळे ‘ई’ गटालीत अन्य लढतीत आयव्हरी कोस्टवर २-१ असा विजय मिळवलेल्या जर्मनीचे बाद फेरीतील स्थानही निश्चित झाले.
 
गेल्या नोव्हेंबरमध्ये जमैकाला गोलशून्यबरोबरीत रोखून रूमने आपल्या देशाला पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, यंदा स्पर्धेच्या सुरुवातीलाच रुमची लय बिघडली. जर्मनीकडून क्युरासोवाला ७-१ अशा पराभव स्वीकारावा लागला.
 
कोणत्याही गोलकिपरसाठी हा पराभव लाजिरवाणाच; पण रुमने आपली कामगिरी उंचावली आणि विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत संस्मरणीय गोलरक्षणांपैकी एक कामगिरी साकारली.
 
गुरुवारी क्युरासाओचा सामना फिलाडेल्फियामध्ये आयव्हरी कोस्टशी होणार आहे; तर इक्वेडोरचा सामना न्यूयॉर्कमध्ये जर्मनीशी रंगणार आहे.
 
कॅन्सस सिटी चीफ्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रेक्षकगृहात इक्वेडोरला मोठा पाठिंबा मिळाला. पिवळ्या रंगाचे जर्सी परिधान केलेल्या चाहत्यांनी स्टेडियमचा बहुतांश भाग व्यापला होता, तर क्युरासाओच्या समर्थकांची उपस्थिती तुलनेने कमी होती, असे वृत्तसंस्था ‘एपी’ने म्हटले आहे. याआधी ‘आयव्हरी कोस्ट’विरुद्ध जर्मनीने उशिरा मिळवलेल्या विजयामुळे पराभव झाल्यास बाद फेरीच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो, याची जाणीव इक्वेडोरला होती. मात्र, क्युरासाओने संपूर्ण सामनाभर त्यांच्यावर दबाव कायम ठेवला. क्युरासाओसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला. या बरोबरीमुळे संघाला फिफा विश्वचषकातील पहिला गुण मिळाला आणि अखेरच्या साखळी सामन्यापूर्वी बाद फेरीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशा जिवंत राहिल्या.




संबंधित मजकूर