शिवगौरवाचा साहित्यिक अविष्कार...

    20-Jun-2026   

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शिरोमणी हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचा लोककल्याणकारी राजा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! कला, साहित्य, नाट्य, चित्रपट अशा विविध माध्यमांतून आजवर शिवपराक्रमगाथा घरोघरी पोहोचली आणि यावच्चंद्रदिवाकरौ शिवचरित्रही असेच तळपत राहील. याच शिवशृंखलेच्या निरंतर प्रवाहात दोन मौल्यवान साहित्यकृतींची भर पडणार आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकथी शैलीतील ‌‘कथा शिवचरित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या!‌’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे दि. 23 जून रोजी, तर ‌‘संस्कृतभारती‌’च्या माध्यमातून डॉ. गिरीश आफळे लिखित ‌‘राष्ट्रपुरुष: छत्रपति:श्रीशिवाजिमहाराज:‌’ या संस्कृत शिवचरित्राचे आज पुणे येथे प्रकाशन संपन्न होईल. त्यानिमित्ताने दोन्ही लेखकांशी संवाद साधून, साहित्यकृतींचा परिचय करुन देण्याचा केलेला हा प्रयत्न...

शिवकर्तृत्वाला साजेसे शिवस्मारक निर्माण व्हावे : सुहास बहुळकर

‌‘संस्कार भारती‌’, ‌‘लोकमान्य सेवा संघ‌’ आणि ‌‘भारतीय इतिहास संकलन समिती‌’ कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने कला अभ्यासक तथा ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या ‌‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या!‌’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मंगळवार, दि. 23 जून रोजी सायंकाळी 5.45 वाजता विलेपार्ले (पूर्व) येथील टिळक मंदिराच्या पु. ल. देशपांडे सभागृहात संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुहास बहुळकर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...

‘कथा शिवचित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या!‌’ या विषयावर आपल्याला का लिहावेसे वाटले?

अरबी समुद्रामध्ये 2010 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची कल्पना मांडण्यात आली होती. या स्मारकाला विरोध करणारा पहिला लेख मी लिहिला. त्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. वाद-प्रतिवाद झाले. तत्कालीन विरोधी पक्षातल्या लोकांनी भाषणे केली. मला असे वाटते की, आपण नक्कल का करत आहोत? अमेरिकेतील‌‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर आपल्याला हे करावेसे वाटत आहे का? एका कृत्रिम बेटाची निर्मिती करून हे स्मारक उभारले जाणार होते. या योजनेचा मी ज्यावेळी अभ्यास केला, त्यावेळी मला त्यातील फोलपणा लक्षात आला. याचदरम्यान माझ्या मनात ‌‘शिवछत्रपतींची चित्रशिल्पे‌’ हा विषय घोळू लागला आणि त्या अनुषंगाने मी अभ्यासाला सुरुवात केली. नंतरच्या काळात तीन प्रकाशकांनी मला माझ्या या प्रकल्पाविषयी विचारले आणि अखेर ‌‘राजहंस‌’च्या माध्यमातून हे पुस्तक लोकांसमोर आले. पुस्तकाच्या पहिल्याच आवृत्तीला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि आता दुसरी आवृत्ती लोकांसमोर येत आहे.

या ग्रंथासाठी आपण मौलिक संशोधन केले. तेव्हा आपल्या संशोधनाच्या प्रवासाबद्दल सांगा.

संशोधनानिमित्त मी खूप ठिकाणी फिरलो. यानिमित्ताने अनेकांचे काम बघता आले. माझा हा अभ्यास मागची 15 वर्षे सुरू होता. 2010 साली लेख छापून आला आणि मागच्या वर्षी पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिवकाळातील समकालीन चित्रे, नंतर काढलेली चित्रे, शिल्पे, महाराज युद्धभूमीवर होते त्यांची चित्रे, छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवाजी महाराजांचे मंदिर, त्यानंतर अगदी ब्रिटिशांच्या काळात अभ्यासकांनी जे संशोधन केले आणि जी चित्रे काढण्यात आली, त्यांचासुद्धा अभ्यास केला. 1928 साली करमरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारले; मात्र त्यापूर्वी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून र. कृ. फडके यांनी शिवाजी महाराजांचा भव्य असा संगमरवरी अर्धपुतळा साकारला. त्या काळातील कागदपत्रांचा अभ्यास यानिमित्ताने करता आला. नंतरच्या काळात दलालांनी काढलेली चित्रे, तयार करण्यात आलेली शिल्पे यांचा मागोवा घेतला. या प्रवासामध्ये चित्र-शिल्पकारांना कुठल्या व्यथांना सामोरे जावे लागले, हेसुद्धा ध्यानात आले. हा प्रवास मी माझ्या पुस्तकातून लोकांसमोर ठेवला आहे.

बऱ्याच चित्रकारांनी शिवरायांची ऐतिहासिक चित्रे रेखाटली आहेत. त्याविषयी काय सांगाल?

शिवकाळामध्ये महाराजांना पाहून त्यांची चित्रे काढण्यात आली. हा आदर्श नंतर अनेक चित्रकारांनी घेतला आणि त्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या. त्या काळामध्ये दख्खनी-मुघलाई शैलीमध्ये महाराजांचे चित्र साकारण्यात आले. निकोलो मनुची याने महाराजांचे चित्र काढून घेतले; त्याच्या अनेक प्रतिकृती नंतरच्या काळात निर्माण झाल्या. मागच्या शतकामध्ये एम. व्ही. धुरंधरांनी खूप मोठे काम करून ठेवले आहे. यावरून आपल्याला शिवकाळाची व्याप्ती कळते. त्याचबरोबर स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स 1790च्या दरम्यान भारतात आला होता. त्याने सवाई माधवराव पेशवे, नाना फडणीस, महादजी शिंदे इत्यादी मराठा साम्राज्यातील तत्कालीन राज्यकर्त्यांची चित्रे चितारली होती, ज्यांमधून इतिहासाचा पट उलगडला आहे.

शिवस्मारके उभारताना केवळ भव्यतेवर भर दिला जातोय का? त्यामागील कलात्मकता आणि ऐतिहासिक अचूकतेकडे दुर्लक्ष होते आहे, असे तुम्हाला वाटते का?

नक्कीच दुर्लक्ष होते आहे, असे मला वाटते. आपल्याकडे मोठ्या उंचीचे पुतळे बांधण्याची चढाओढ लागलेली असते. केवळ पुतळ्यांचे आकार मोठे करून काही होणार नाही, तर त्या महान व्यक्तिमत्त्वांचे जीवन सांगणे जास्त महत्त्वाचे. त्याचबरोबर शासनानेसुद्धा लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. एकच शिवस्मारक करा; मात्र ते उत्तम दर्जाचे करा, जेणेकरून जगभरातील लोक आपला इतिहास समजून घेतील.

भारतीय ज्ञानशाखांचे मूळ संस्कृतमध्येच : डॉ. गिरीश आफळे

अखंड हिंदुस्थानाचे राष्ट्रपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! जगभरातील विविध भाषांमध्ये महाराजांच्या शौर्याचा विचार पोहोचवण्याचे कार्य आज युवा इतिहासकार करत आहेत. अशातच, आता राष्ट्रविचारांचा जागर करणाऱ्या ‌‘संस्कृतभारती‌’च्या माध्यमातून ‌‘राष्ट्रपुरुष: छत्रपति:श्रीशिवाजिमहाराज:‌’ या पुस्तकाचे दि. 20 जून रोजी पुण्यातील पेरूगेट भावे स्कूल (सदाशिव पेठ) शाळेच्या प्र. ल. गावडे सभागृहात प्रकाशन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुस्तकाचे लेखक डॉ. गिरीश आफळे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...

संस्कृतमध्ये शिवचरित्र लिहिण्याचा विचार आपण कधी केला?

2021 साली माझी नियुक्ती ‌‘संस्कृतभारती‌’च्या पिंपरी-चिंचवड जनपदाचा (जिल्ह्याचा) अध्यक्ष म्हणून झाली. 2023 साली पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विविध ठिकाणी संस्कृत जनपद संमेलने झाली. त्यांना अनुसरून ‌‘शिवकल्याणराजा‌’ नावाची एक स्मरणिका करण्यात आली. त्याच्या संपादकपदाचे दायित्व माझ्यावर होते. या कामात प्रांतमंत्री विनयराव दुनाखे आणि तत्कालीन अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीषराव भेडसगावकर यांनी मला खूप प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विचारांविषयी मी यापूवच अनेक पुस्तके लिहिली होती आणि ती सुप्रसिद्ध अशा ‌‘भारतीय विचार साधना‌’ या संस्थेने प्रकाशित केली होती. याचदरम्यान मी ‌‘संस्कृतभारती‌’च्या आठ षण्मासिक (सेमीस्टर) परीक्षा उत्तीर्ण झालो. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर भारताचेही राष्ट्रपुरुष आहेत, असे संस्कार माझ्यावर बालपणापासूनच झाले होते. आंतरजाल माध्यमांतून मला महाराजांविषयी लिहिलेली 12 पुस्तके सापडली. यातूनच अडीच वर्षांत हा ग्रंथ सज्ज झाला. अनेकांनी तो ग्रंथ वाचून बहुमूल्य सूचना दिल्या आणि आता दि. 20 जून या दिवशी ‌‘संस्कृतभारती‌’ ही संस्था हा ग्रंथ प्रकाशित करत आहे. माझ्या मते, जुजबी ज्ञान असलेल्या व्यक्तीलाही कळेल, अशा सरळ-सोप्या व गद्य संस्कृत भाषेत हा ग्रंथ लिहिला आहे. मला विनामूल्य संस्कृत भाषेचे ज्ञान देणाऱ्या संस्थेच्या शिक्षकांचा मी सदैव ऋणी राहीन.

शिवकाळामध्ये भाषा म्हणून संस्कृतचे किती महत्त्व होते?

शिवकाळामध्ये संस्कृत ही व्यवहारातली व बोलण्या-चालण्यातील भाषा उरली नव्हती. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतला प्रोत्साहन दिले, ते का, हे विचार करण्यासारखे आहे. महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतच होती. त्यांच्या कार्यकाळात संस्कृत भाषेत कोरले गेलेले अनेक शिलालेख आजही बघायला मिळतात. फारसी, उर्दू व अरबी शब्दांचा मराठी भाषेत प्रचंड प्रमाणात शिरकाव झाला होता. त्यांच्या जागी सुयोग्य असे संस्कृतनिष्ठ शब्द योजून राज्यव्यवहार कोश निर्माण करण्याची आज्ञा महाराजांनी रघुनाथ हनुमंते या सचिवाला दिली. त्यामुळे भाषेचे शुद्धीकरण बऱ्याच प्रमाणात झाले. नंतरच्या काळात हेच काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. महाराजांच्या आज्ञेवरूनच गागाभट्ट यांनी ‌‘समयनय‌’ आणि ‌‘कायस्थधर्मप्रदीप‌’ हे ग्रंथ लिहिले; तर कृष्ण नावाच्या ज्योतिर्विदाने ‌‘करणकौस्तुभ‌’ हा ग्रंथ लिहिला. या घटनांनंतर महाराजांना खूपच अल्प आयुष्य मिळाले, हे आपले दुर्दैव होय.

यानिमित्ताने ‌‘संस्कृतभारती‌’तर्फे सुरु असलेल्या कार्याविषयी काय सांगाल?

‌‘संस्कृतभारती‌’ देशामध्ये संभाषण शिबिरांच्या माध्यमातून संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करते. सामाजिक कार्यकर्ते स्वतः वेळ देऊन संस्कृत शिकतात व समाजामध्ये अन्य मंडळींना विनामूल्य संस्कृत शिकवतात. पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये लहान मुलांकरिता संस्कृतमधून संस्कार देणारी 50 पेक्षा अधिक बालकेंद्रे चालविली जातात, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‌‘सरला केंद्रां‌’च्या माध्यमातून ‌‘सरला‌’, ‌‘सुगमा‌’, ‌‘सुखदा‌’ आणि ‌‘सरसा‌’ अशा शाळाबाह्य परीक्षा घेतल्या जातात, 160 पेक्षा अधिक शाळांमधले संस्कृतचे शिक्षक हे कार्य ‌‘संस्कृतभारती‌’चे कार्यकर्ते म्हणून करतात, तसेच सुभाषित अभियानाच्या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांच्या प्रांत स्तरीय स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना संस्कृतची गोडी लावण्याचे काम केले जाते. पत्राचारद्वारा संस्कृत, गीताअध्ययन केंद्र, लेखकानुवादक वर्ग, काव्य वर्ग या प्रगत संस्कृत अध्ययन उपक्रमांद्वारे ‌‘संस्कृतभारती‌’ संस्कृत प्रचार आणि प्रसाराचे काम करत असते.







मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर