मुंबई (ओंकार मुळ्ये) : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या आता ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या छुप्या धर्मांतर मोहिमेचे केंद्र बनू लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हार्बर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) एसी लोकलमध्ये थेट ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणारी आणि प्रवाशांना आकर्षित करणारी पत्रके चिकटवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अशा प्रकारे धार्मिक प्रचारासाठी आणि धर्मांतराला प्रवृत्त करण्यासाठी केला जात असल्याने रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पनवेल-सीएसएमटी एसी लोकलच्या डब्यांमध्ये प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मराठी भाषेत छापलेली पत्रके लावण्यात आली आहेत. 'जीवनारेखा हवी आहे का?', 'येशू देव आहे', 'तुम्हाला प्रीती करण्यासाठी बनवले होते' अशा भावनिक आणि मानसिक दबावात असलेल्या व्यक्तींना आकर्षित करणाऱ्या मथळ्यांचा वापर या पत्रकांमध्ये करण्यात आला आहे. माणसाच्या वैयक्तिक अडचणी, नोकरी जाणे, कौटुंबिक समस्या आणि मानसिक थकवा यांचा गैरफायदा घेऊन, 'फक्त येशूच तुम्हाला वाचवू शकतो' अशा आशयाचा प्रचार या पत्रकांद्वारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला जात आहे. इतकेच नव्हे, तर 'www.ThisLoveStory.org' या संकेतस्थळाचा पत्ता देऊन प्रवाशांना अधिक माहितीच्या नावाखाली जाळ्यात ओढण्याचा थेट प्रयत्न सुरू असल्याचे दिसते आहे.
सामान्यतः रेल्वेमध्ये कोणत्याही व्यावसायिक किंवा धार्मिक जाहिराती लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाची अधिकृत परवानगी आवश्यक असते. मग अशा प्रकारची धर्मांतराला प्रवृत्त करणारी पत्रके एसी लोकलमध्ये लावण्याची हिंमत कोणाची झाली? रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे प्रशासन झोपले आहे का? असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना आणि नागरिक विचारत आहेत. या प्रकाराबाबत काही जागरूक प्रवाशांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
दोषींवर कारवाई केली जाईल!
या प्रकरणात कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची पत्रकं कोणी लावताना दिसल्यास तात्काळ सुजाण नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला त्याबाबत माहिती द्यावी. एसी लोकल असल्याने संबंधित प्रकार रेल्वे सुरु असतानाच घडला असणार हे निश्चित. त्यामुळे मुंबईची लोकल ही जनतेची संपत्ती असून तिचे विद्रुपीकरण करण्याचे काम कोणी करत असेल, तर त्यास रोखणे हे आपले कर्तव्य आहे.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रेल्वे धार्मिक प्रचाराचे मैदान नव्हे!
रेल्वे हे प्रवासाचे साधन आहे, धार्मिक प्रचाराचे मैदान नाही. एसी लोकलचे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा प्रकारे जाळ्यात ओढण्याचे कारस्थान तात्काळ थांबले पाहिजे. रेल्वे प्रशासनाने यावर सीसीटीव्ही फुटेज तपासून पत्रके लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
- अमित कुलकर्णी, प्रवासी