भाजपच्या वाटचालीतील पडद्यामागील शिल्पकार

    20-Jun-2026   

Mukundrao Kulkarni

 
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी कार्यालयमंत्री मुकुंदराव कुळकर्णी यांचे दि. १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
 

पूर्वीच्या भाजप कार्यालयात कार्यालय मंत्र्यांच्या खुर्चीत एक गंभीर चेहर्‍याचे गृहस्थ बसलेले पाहायला मिळायचे. कार्यालयात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकावर त्यांची धारदार नजर असायची. हिशोबात अत्यंत काटेकोर. पक्षाचा प्रत्येक व्यवहार योग्य किमतीत आणि योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी ते कायम आग्रही असत. त्यामुळे वरकरणी स्वभावाने फटकळ वाटत. पण, पक्षाच्या पैशाचा, पक्षाच्या शिस्तीचा आणि कार्यपद्धतीचा अपार आदर बाळगणार्‍या त्या काटकसरी, प्रामाणिक आणि निःस्वार्थी कार्यकर्त्याचे नाव होते, मुकुंदराव कुलकर्णी. उबाठामधील संभाव्य फुटीच्या बातम्या सुरू असतानाच, अचानक एक दुःखद बातमी आली- आपले मुकुंदराव आपल्यात राहिले नाहीत.
 

भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी कार्यालयमंत्री मुकुंदराव कुळकर्णी यांचे दि. १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मुकुंदराव कुळकर्णी हे ‘जनसंघा’च्या काळापासून राष्ट्रवादी विचारांच्या कार्यात पूर्णवेळ सक्रिय होते. संघाच्या संस्कारातून घडलेल्या या कार्यकर्त्याने १९५८ सालापासून सुमारे ३५ वर्षे ‘प्रीमियर ऑटोमोबाईल’ या कंपनीत काम करताना उरलेला सर्व वेळ पक्षकार्यासाठी दिला. १९९० साली कंपनीने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली, तेव्हा त्यांनी १९९२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि पक्षाच्या कामाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. खासगी नोकरीचा मोह त्यागून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. पक्षाचे काम करताना अंधेरी-पार्ले भागातील कार्यकर्ते सुरुवातीला बैठकीसाठी त्यांच्याच घरी जमत असत.
 
नंतर त्यांनी पुढाकार घेत कार्यालयासाठी पार्ल्यात जागा पाहिली. सर्व कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून जागा विकत घेतली आणि कालांतराने अंबर महालशेजारी दीड हजार चौरस फुटांचे कार्यालय उभे राहिले. जिल्हाध्यक्ष काळातील ही त्यांची मोठी उपलब्धता होती. वैयक्तिक यशापेक्षा संघटन आणि राष्ट्रकार्य हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. पुढे जिल्ह्यामधून मुंबई प्रदेशसाठी त्यांची नियुक्ती झाली, तेव्हा त्यांनी दादर येथे ‘कथ्थक भवन’ची जागा शोधून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाच मजली इमारतीचे प्रशस्त कार्यालय उभे केले. त्यांच्यावर पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी नेटाने पार पाडली.
 

प्रदेश कार्यालयाच्या उभारणीत आणि संघटनात्मक बळकटीकरणातही त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. अनेक वर्षे त्यांनी प्रदेश कार्यालयप्रमुख म्हणून जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून ते मोठ्या संघटनात्मक उपक्रमांपर्यंत प्रत्येक बाबीत त्यांचा अभ्यास, शिस्त आणि नियोजन दिसून येत असे. म्हणूनच, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे. पडद्यामागे राहून त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी केली आणि कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. नवख्या कार्यकर्त्यांना ते अगदी आपुलकीने मार्गदर्शन करत असत. त्यांची साधी राहणी, अनुशासन आणि पक्षावरील निष्ठा अत्यंत उल्लेखनीय होती.
 

पडद्यामागे राहून कार्य करण्याची त्यांची वृत्ती विलक्षण होती. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी पक्षसंघटनेची मजबूत पायाभरणी केली. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवले, मार्गदर्शन केले आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित केले. नवोदित कार्यकर्त्यांशी ते अत्यंत आपुलकीने संवाद साधत असत. त्यांच्या सहवासातून अनेकांना संघटन, अनुशासन आणि निष्ठेचे धडे मिळाले. त्यांची साधी राहणी, स्पष्ट विचार, कामातील काटेकोरपणा आणि पक्षावरील अखंड निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू होते. कोणत्याही पदाचा किंवा प्रसिद्धीचा मोह न बाळगता, त्यांनी आयुष्यभर संघटन कार्यालाच प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले होते.
 

मुकुंदरावांचे निधन म्हणजे केवळ एका निःस्पृह कार्यकर्त्याचा अस्त नाही, तर भाजपच्या इतिहासातील एका समर्पित आणि मूक तपस्वीपर्वाचा समारोप आहे. जनसंघाच्या अत्यंत प्रतिकूल काळापासून ते आजच्या सत्ताधारी भाजपच्या सुवर्णकाळापर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत जवळून अनुभवला आणि त्या प्रवासात आपले सर्वस्व अर्पण केले. पक्षाची प्रशासकीय चौकट मजबूत करणे, नवनवीन कार्यकर्त्यांना आपुलकीचे मार्गदर्शन करणे आणि कडक अनुशासनाचा पायंडा पाडणे, हे त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. साधी राहणी, निःस्पृह वृत्ती आणि केवळ पक्षहिताचा ध्यास घेतलेले हे नेतृत्व सदैव स्मरणात राहील.


गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मुकुंदरावांशी दि. ६ एप्रिलला भाजपच्या स्थापना दिनानिमित्त त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. नव्या पिढीतील अनेक कार्यकर्त्यांना कदाचित त्यांची ओळख नसेल. भाजप सत्तेत नव्हता, तेव्हापासून त्यांनी पक्षासाठी काम केले. पक्ष सत्तेत आला, अनेकांना विविध पदे आणि जबाबदार्‍या मिळाल्या; पण मुकुंदरावांनी कधी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही, ना कधी काही मागितले.
 
त्यांच्या निधनाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली- पक्षाची खरी ताकद मोठ्या पदांमध्ये नसते; तर अशा निष्ठावान, प्रामाणिक आणि नि:स्वार्थ कार्यकर्त्यांमध्ये असते. मुकुंदरावांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. मात्र, त्यांनी जपलेली मूल्ये, घडवलेले कार्यकर्ते आणि उभे केलेले संघटन हेच त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक राहील. त्यांच्या निधनाने भाजप-परिवारातील एक शिस्तबद्ध आणि निःस्पृह नेतृत्व हरपले आहे. स्व. मुकुंदराव कुळकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

(लेखक भाजप प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)




केशव उपाध्ये

लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत.
संबंधित मजकूर