अभिषेक बॅनर्जी कुटुंबाच्या ४३ मालमत्तांवरून बंगालमध्ये खळबळ! भाजपचा तपशीलवार हल्लाबोल

    20-May-2026   

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोलकाता महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या कुटुंबाशी संबंधित मालमत्तांबाबत त्यांची आई लता बॅनर्जी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सुरुवातीला ही बातमी फक्त अवैध बांधकाम आणि बिल्डिंग प्लॅनच्या तपासणीसाठी नोटीस जारी झाल्यापुरतीच मर्यादित होती. परंतु, आता या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न त्या मालमत्तांवरून उपस्थित होत आहे, ज्यांचा तपशील भाजपने जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल भाजपने ४३ मालमत्तांची एक यादी जाहीर केली आहे. या मालमत्तांचा संबंध अभिषेक बॅनर्जी, त्यांचे कुटुंब, ममता बॅनर्जी, अमृता बॅनर्जी, सबिता बॅनर्जी, मिनाती बॅनर्जी, बाणानी बॅनर्जी आणि सायोनी घोष यांच्याशी असून, त्या संयुक्त मालकीच्या असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अर्पिता बॅनर्जी, सुदेष्णा बॅनर्जी, आकाश बॅनर्जी, सोमनथ बॅनर्जी आणि प्रियंका दास अशी अनेक नावेही वेगवेगळ्या मालमत्तांचे मालक किंवा 'पर्सन लायबल टॅक्स' म्हणून या यादीत समाविष्ट आहेत.

कोलकात्याच्या पॉश भागांत अनेक मालमत्ता
समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, कोलकात्याच्या पॉश भागांमध्ये जसे की, बराकपूर ट्रंक रोडवरील 'ऑर्बिट ल्युमियर', गरियाहाट रोडवरील 'समीरन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी', बेहलाच्या बेचराम चॅटर्जी रोडवरील 'साई भवन' अशा अचल संपत्तींमध्ये संयुक्त मालकी हक्क आहेत. याशिवाय कोलकात्याच्या डी गुप्ता लेन, धर्मतळा रोड, देवेंद्र घोष रोड, सर्व्हे पार्क, कालीपद मुखर्जी रोड आणि मोतीलाल गुप्ता रोड येथील मालमत्तांची स्थिती 'ॲक्टिव्ह' दाखवत आहे. यातील बहुतांश मालमत्तांच्या नोंदींमध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांकही नोंदवले गेले आहेत. यापैकी अनेक मालमत्ता अशा आहेत, ज्यांचे रेकॉर्ड आणि कराचा तपशील स्पष्ट नाही.

मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी दिले मालमत्ता चौकशीचे आदेश
बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी सांगितले की, भाजप सरकार या ४३ मालमत्तांच्या मालकी हक्काच्या तपशिलाची सखोल चौकशी करेल. ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या अहवालातून असे समोर आले आहे की, अभिषेक बॅनर्जी यांच्या मालकीच्या २४ मालमत्तांपैकी १४ मालमत्ता त्यांच्या 'लीप्स अँड बाउंड्स' या कंपनीच्या नावावर आहेत आणि ६ मालमत्ता त्यांच्या वडिलांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, भाजपकडे या मालमत्तांचा संपूर्ण तपशील उपलब्ध असून आगामी दिवसांत आणखी माहिती समोर आणली जाईल. सत्तेच्या प्रभावाचा गैरवापर करून या मालमत्ता तयार करण्यात आल्या आणि नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर