वसंत बहार...

    06-Apr-2026   

युद्धकाळात एकच गोष्ट शाश्वत असते, ती म्हणजे अनिश्चितता. वर्तमानाचे आकलन करता करता, भविष्याचे सावट अधूनमधून डोकावते आणि आता पुढे काय? हा प्रश्न सतावत राहतो. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला पूर्णविराम मिळेल, अशी आशा त्या-त्या देशांतील सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केली जात असतानाच, दुसरीकडे मात्र दोन्ही बाजूने युद्धातील विजयाची जोरदार तयारी सुरू आहे. 21व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच छोट्या-छोट्या संघर्षातून वर्तमान आकार घेत होते. मात्र, महासत्तांच्या थेट सहभागामुळेच ठिणगीचे रूपांतर वणव्यामध्ये झाले. मात्र, अशा या परिस्थितीमध्येसुद्धा जगाच्या दुसऱ्या टोकावर ऋतू बदलताना, निसर्ग कात टाकतो आहे. लोकांना आजही फुलांचा सुगंध हवाहवासा वाटतो आणि काही राष्ट्रांना याच सुगंधातून अर्थकारणसुद्धा सुरळीत चालवता येते.

वसंत ऋतूचे आगमन झाले आणि चीनमधील फ्लॉवर इकोनॉमी चर्चेत आली. 2025च्या अखेरपर्यंत चीनच्या फूलावरील आधारित उद्योगाचा आकार 100 अब्ज युआन इतका झाला आहे. युनान हे चीनमधील फुलांचे सर्वात मोठे केंद्र. 2025 मध्ये युनान प्रांताने 1.22 अब्ज युआन किमतीच्या फुलांची, जगातील 64 देशांमध्ये निर्यात केली. चीन आता केवळ साधी फुलेच नाही, तर फुलांपासून बनवलेली औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि सुगंधी द्रव्यदेखील मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतातील युनचेंग शहरात, बहरलेल्या फुलांच्या शेतांमधून जाणारे नवीन मार्ग पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. वसंत ऋतूचा सुगंध हवेत दरवळत असताना, इथल्या ऐतिहासिक स्थळांनादेखील नवचैतन्य प्राप्त झाले आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनच असंख्य नवनवीन संधीही निर्माण होत आहेत.

एका बाजूला तापमानवाढीचा सामना करीत असताना, दुसऱ्या बाजूला चीनच्या शहरी आणि ग्रामीण भागातील फुलांच्या बाजारपेठा पुनरुज्जीवत झाल्या आहेत. नवीन प्रकल्प, अनुकूल धोरण, सक्षम प्रशासन यांच्या संयोगातून हे जमल्याचे मत इथल्या स्थानिकांनी व्यक्त केले. युनचेंगच्या सांस्कृतिक आणि पर्यटन प्राधिकरणांच्या मते, मार्च ते मे हा फुलोऱ्यांचा हंगाम असल्याने पर्यटकांसाठी विशेष प्रवास योजना आखल्या जातात, त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. पारंपरिक वसंत ऋतूतील सहलींचे रूपांतर, विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्येसुद्धा झाले आहे.

चीनमधील एक प्रमुख ऑनलाईन प्रवास सेवा प्लॅटफॉर्म असलेल्या ‌‘फ्लिगी‌’ने अहवाल दिला आहे की ‌’स्प्रिंग आऊटिंग‌’, ‌’फ्लॉवर व्हिव्हिंग‌’ आणि ‌’स्प्रिंग ट्रॅव्हल‌’ यांसारख्या ‌‘कीवर्ड्स‌’च्या शोधसंख्येत, महिन्यागणिक 380 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता यामागच्या अर्थकारणाची खोली जाणून घेऊया. हेझसारख्या शहरामध्ये पियोनी फुलांपासून चहा, तेल आणि विविध औषधी उत्पादने तयार करुन 10-13 अब्ज युआनची उलाढाल केली जाते. मार्च महिन्यात, दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांताने इतर प्रदेशांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, निवास आणि प्रेक्षणीय स्थळांच्या खर्चाचा समावेश असलेले 20 दशलक्ष युआन किमतीचे व्हाऊचर बंडल जारी केले. पूर्व-चीनमधील फुजियान, मध्य-चीनमधील हेनान, हुबेई आणि नैऋत्य-चीनमधील युनान यांसारख्या प्रांतांनीही याचेच अनुकरण केले. चीनच्या अनेक प्रदेशांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्याथ, वसंत ऋतूतील सुटीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनालादेखील मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे.

चीनचा विचार करायचा झाल्यास असे लक्षात येईल की, हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक सभ्यता आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरेच्या संयोगातून, या देशाने परिवर्तनाचे वारे पचवले. आज महासत्ता म्हणून जागतिक पटलावर राष्ट्रांना आव्हान देत असताना, चीनच्या भू-राजकीय हालचालींकडे अनेक देश बारीक नजर ठेवून असतात. चीन देशांतर्गत धोरणे कशा पद्धतीने राबवतो, तिथल्या समाजमनाचे अंतरंग कसे आहेत, याची खोलात माहिती मिळू शकत नाही. चीनने स्वतःभोवती संदिग्धतेचे कवच तयार करून ठेवले आहे, त्यामुळे बऱ्याचदा आडाखे बांधणे कठीण होऊन बसते. मात्र, पुष्प उद्योगाचे हे आगळेवेगळे प्रारुप निश्चितच अनेक देशांना मार्गदर्शक ठरू शकते. प्रगतिपथावर चालताना बऱ्याचदा अशा काही छोट्या-छोट्या गुंतवणुकींच्या माध्यमातून मोठा परतावा मिळतो, याचा धडा यानिमित्ताने विकसनशील देशांनी घ्यायला हवा.





मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर