सोनिया गांधींनी आत्मचरित्राच्या सवंग प्रसिद्धीसाठी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबरीपतनावर अश्रू ढाळल्याची दिलेली कबुली, हा काँग्रेसच्या तुष्टीकरणाचा विद्रूप चेहरा आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला जाणीवपूर्वक केलेला हा औचित्यभंग म्हणजे, त्यांच्या हृदयात आजही क्रूर आणि निर्दयी आक्रमणकर्ता बाबर जिवंत असल्याचेच लक्षण ठरावे!
सोनिया गांधी अलीकडे त्यांच्या आगामी आत्मचरित्राच्या प्रसिद्धीसाठी काम करत आहेत. त्यासाठीच त्या बरेच वर्षांनी ‘एस’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावरही डेरेदाखल झाल्या. तसेच, या प्रसिद्धीचा भाग म्हणून एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग त्यांनी ’एक्स’वर प्रसिद्ध केला. यातील मुक्ताफळांचा विचार करता आत्मचरित्राच्या निमित्ताने लोकांचे लक्ष वेधून, पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी केलेला हा निव्वळ सवंग प्रसिद्धीचाच प्रकार ठरावा. पुस्तकाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी उधळलेली मुक्ताफळे, देशातील हिंदूंच्या भावनांना डिवचणारी अशीच. "दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पडली, ते दृश्य दूरचित्रवाणीवर पाहताना आपल्या डोळ्यांतून अश्रू ओघळले,” अशी कबुलीच सोनिया गांधी यांनी दिली. देशातील बहुसंख्य जनता जेव्हा अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा करत होती, अशा दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाबरीपतनाचे मढे उकरून काढणे, हा औचित्यभंगच!
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील आगमनाचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या तोंडावर बाबराच्या नावे असलेल्या वास्तूच्या पतनाचा विलाप, काँग्रेसची वैचारिक बांधिलकी नेमकी कोणाशी आहे हेच सिद्ध करणारा आहे. भारतीय जनता पक्षाने केलेली टीकाही मर्मभेदी असून, काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत आहे, हेच सोनियांच्या या अश्रूंनी सिद्ध केल्याचे भाजपने म्हटले आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे केलेल्या तुष्टीकरणाच्या विषारी राजकारणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा हा संतापजनक पुरावा. स्वतःच्या पुस्तकाची चर्चा घडवून आणण्यासाठी, एका क्रूर आणि निर्दयी आक्रमणकर्त्याच्या नावे अश्रू ढाळणे, हे काँग्रेसच्या मानसिक दिवाळखोरीचे लक्षण का मानू नये?
सोनिया गांधींच्या डोळ्यांतील हे अश्रू अत्यंत सोयीचे आणि ‘सिलेटिव्ह’ असल्याचे देशाने यापूर्वीही अनेकदा अनुभवले आहे. "२००८ साली दिल्लीत झालेल्या ‘बाटला हाऊस’ चकमकीत जेव्हा भारतीय सुरक्षा दलांनी ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तेव्हा त्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाहून सोनिया गांधी रडल्या होत्या,” असा गौप्यस्फोट, खुद्द काँग्रेसचेच्या सलमान खुर्शीद यांनीच केला होता. ‘बाटला हाऊस’ चकमकीत प्राणांची आहुती देणार्या पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्याविषयी सोनियांच्या डोळ्यांत कधी पाणी आल्याचे ऐकिवात नाही. दहशतवाद्यांच्या मृत्यूवर सोनिया यांच्या डोळ्यांत पाणी येते, बाबरी मशीद पडल्यावर अश्रूंच्या धारा लागतात; मात्र १९८४ साली देशाच्या राजधानीत हजारो निरपराध शीख बांधवांचा निर्घृण नरसंहार झाला, तेव्हा मात्र या डोळ्यांतून एक थेंबही का गळला नाही? शीख बांधवांच्या गळ्यात जळते टायर टाकून त्यांना जिवंत जाळले जात असताना, त्यांच्या आक्रोशामुळे सोनियांचे हृदय का पिळवटून निघाले नाही? सलग तीन दिवस राजधानीत माणसांच्या रक्ताचे पाट वाहत होते, निष्पाप महिला आणि वृद्धांना आगीच्या भक्ष्यस्थानी ढकलले जात होते. त्या अमानुषतेबद्दल साधा ओलावाही तत्कालीन सत्ताधार्यांना आला नाही.
सर्वांत मोठा विरोधाभास म्हणजे, ज्या मुस्लीम समुदायाच्या आधारावर काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, त्या समुदायानेही आता बाबरीचा विषय मागे टाकला आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देशातील मुस्लिमांनी स्वीकारला असल्याचे, खुद्द बाबरी मशिदीचे मुख्य पक्षकार इबाल अन्सारी यांनीच सोनिया गांधींच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले. देशातील मुसलमानांनी न्यायालयाच्या निकालाचा आदर केला असून, अयोध्येतील हा वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता या मुद्द्याला कोणतीही प्रासंगिकता उरलेली नाही, असे अन्सारी यांनी सांगितले. त्यामुळे निव्वळ पुस्तकाच्या खपासाठी आणि ‘व्होट बँके’च्या लांगूलचालनासाठी जुनेच मढे उकरण्याचे काम सोनिया गांधी का करत आहेत?
तुष्टीकरणावरच थांबतील, त्या सोनिया गांधी कसल्या. याच मुलाखतीत त्यांनी १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीचेही अत्यंत निर्लज्जपणे समर्थन केले. आणीबाणी लागू करणे चुकीचे असले, तरी ती सांविधानिक होती, असा अजब युक्तिवादही त्यांनी केला. लाखो राजकीय विरोधकांना विनाचौकशी तुरुंगात डांबणे, प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणे, नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेणे आणि लोकशाहीचा गळा घोटणे, हे कोणत्या लोकशाहीत बसते? गांधी घराण्याच्या रक्तातच हुकूमशाही भिनलेली असून, आजही त्यांना लोकशाही मूल्यांपेक्षा स्वतःची सुलतानी मानसिकताच महत्त्वाची वाटते, हेच त्यांच्या आणीबाणीच्या समर्थनातून स्पष्ट होते.
इतका सगळा वैचारिक गोंधळ आणि देशाच्या मूळ अस्मितेशी असलेली नाळ तुटलेली असतानाही, याच मुलाखतीत सोनिया गांधी यांनी "देशात काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत येईल,” असा जो दुर्दम्य आशावाद व्यक्त केला आहे, त्याबद्दल खरोखरच त्यांचे अभिनंदन! ज्या पक्षाला देशातील बहुसंख्य समाजाच्या भावनांची कदर नाही, ज्यांना आक्रमक बाबराचा पुळका येतो, ज्यांना दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती वाटते आणि ज्यांना आणीबाणीसारखा काळाकुट्ट इतिहास सांविधानिक वाटतो, त्या पक्षाला देशातील जनता पुन्हा कधीही सत्तेच्या सिंहासनावर बसवणार नाही, हे उघड सत्य आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा जनाधार कमी होत असून, काँग्रेसचे एकेक बालेकिल्ले ढासळत आहेत. काँग्रेसला २०२९ मध्ये आपल्या अस्तित्वाचाच लढा लढायचा आहे. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांचा सत्तेवर परतण्याचा आशावाद हा म्हणूनच कौतुकास्पद असाच. सध्या समोर असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांच्या बेगमीसाठीच, सोनिया गांधी यांनी हिंदूंना दुखावले आहे. पुस्तकाच्या सवंग प्रसिद्धीसाठी उकरलेला बाबरीचा विषय काँग्रेसला रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाहीत, हे नक्की.